म्हारी छोरी...!

‘महिला महाराष्ट्र केसरी’ची पहिली गदा सांगलीला मिळवून देत प्रतीक्षा बागडी हिने क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले
Pratiksha Bagdi sports history first Mace of Women Maharashtra Kesari
Pratiksha Bagdi sports history first Mace of Women Maharashtra Kesari sakal
Summary

‘महिला महाराष्ट्र केसरी’ची पहिली गदा सांगलीला मिळवून देत प्रतीक्षा बागडी हिने क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले

‘महिला महाराष्ट्र केसरी’ची पहिली गदा सांगलीला मिळवून देत प्रतीक्षा बागडी हिने क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे. प्रतीक्षाचं गाव मिरज तालुक्यातील तुंग. हे गाव हिंदकेसरी मारुती माने यांच्या कवठेपिरानच्या सीमेवरचं.

हा सारा परिसर ‘वारणे’च्या काठावरचा. इथल्‍या मातीत अनेक कुस्तीगीर घडले. इथल्या खेडोपाड्यातल्या तालमीत आता पूर्वीइतकी गर्दी नसली, तरी या तालमी आजूबाजूच्या छानछोकीच्या वातावरणातही तग धरून आहेत.

आता गेल्या काही वर्षांत मुलांच्या बरोबरीने मुलीही दिसू लागल्या आहेत. ऑलिंपिकमध्ये, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंची नावे दिसू लागली, तशी सांगली जिल्ह्यात ‘कृष्णा’काठावरील गावागावांत तुरळक संख्येने का असेना, मुलींना पुढे आणण्यासाठी पूर्वाश्रमीची कुस्तीगीर कुटुंबे धाडसी निर्णय घेताना दिसत आहेत.

त्यातले तुंगचे हे बागडी कुटुंब आहे. ‘तालेवारच्या नव्हे, तर गरिबाच्या पोटीच कुस्तीगीर जन्म घेतो,’ असं कुस्तीचे प्रसिद्ध समालोचक शंकर पुजारी प्रत्येक मैदानात ठणकावून सांगत असतात. प्रतीक्षाच्या बाबतीतही ते खरं ठरलं आहे.

कोणताही मोठा जमीनजुमला नसतानाही गावातल्या बागडी कुटुंबांनी गेल्या चार पिढ्यांपासून पोटाला चिमटा काढून घराघरांत मल्ल घडवले आहेत. प्रतीक्षाचे वडील रामदासही कुस्तीगीर. सध्या ते सांगली जिल्हा पोलिस दलात हवालदार आहेत. आजोबा व्यंकू आणि पणजोबा भीमसेनही पैलवान.

आता प्रतीक्षाचा भाऊ प्रतीक, चुलत भाऊ, बहिणीही कुस्ती करतात. त्यामुळे प्रतीक्षासाठी कुस्ती नवी नसली, तरी तिला मात्र बॉक्सिंगमध्ये अधिक रस होता. ऑलिंपिकवीर मेरी कोम यांच्यावरील चित्रपट पाहिल्यानंतर वर्ष-दीड वर्षे ती बॉक्सर व्हायच्या वेडातच दौडत होती. मात्र खेड्यात त्यासाठी तितक्या सुविधा मिळणार नाहीत, असा वडिलांचा व्यवहारी सल्ला मानून तिने २०१४पासून आखाड्यात उडी घेतली.

तसं तिनं कुस्तीत उतरावं, असं वातावरण गावात आधीपासूनच तयार होतंच. गावातल्या किमान आठ-दहा मुली तालमीत खेळणाऱ्या मुलांच्या पंजाला पंजा भिडवत होत्या. त्यासाठी त्यांना बाईपण आडवं येणार नाही, याची दक्षता गावातील जाणकार मल्ल, वस्ताद यांनी घेतली होती.

आजही गावातील संजना बागडी, प्रमिला बागडी, गायत्री घाटगे या मुली प्रतीक्षाच्या बरोबरीने गावात शड्डु घुमवतात. असं गावातलं पूरक वातावरण. शिवाय वडील रामदास यांचा मोठा आधार यामुळे प्रतीक्षा अल्पावधीत जिल्हास्तरावर चमकू लागली. मग तिच्यासाठी घराच्या गच्चीवर छोटा आखाडा तयार करण्यात आला. १० बाय १२ च्या मॅटवर ती भावांबरोबर वडिलांशीही दोन हात करू लागली.

तिच्या या सरावाला आत्मविश्‍वासाची जोड मिळाली. २०१६मध्ये सब ज्युनिअर राज्य महिला कुस्ती स्पर्धेत तिने रौप्यपदकाने. त्यानंतर जिल्हा आणि राज्य पातळीवरील डझनभर स्‍पर्धांत पदके मिळवली. या दरम्यान वडिलांनी तिला सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्रात दाखल केले होते. प्रशिक्षक राहुल नलवडे यांनी तिला मार्गदर्शन केले. अगदी अलीकडे तिने आसाममधील ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

७६ किलो वजनी गटात खेळणाऱ्या प्रतीक्षाने समोरच्या राज्यभरातून स्पर्धकांशी कधी ना कधी दोन हात केले होते. अंतिम फेरीत तिने अवघ्या चार मिनिटांत चार-चार गुणांच्या बरोबरीनंतरही स्पर्धक वैष्णवी पाटील हिला चितपट करीत पुन्हा एकदा आपला आक्रमक खेळ केला आणि सांगलीचा झेंडा रोवला. प्रतीक्षाची प्रगती पाहताना ‘दंगल’मधील ‘म्हारी छोरी छोरों से कम से कै...!’ (आमची मुलगी मुलग्यांपेक्षा कमी नाही) हा संवाद आठवल्याशिवाय राहात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com