esakal | फोन खणखणला आणि पलीकडून आवाज आला, राजाभाऊ गेले...

बोलून बातमी शोधा

null

बुद्धानुयायी राजाभाऊ! : प्रेमानंद गज्वी

फोन खणखणला आणि पलीकडून आवाज आला, राजाभाऊ गेले...
sakal_logo
By
प्रेमानंद गज्वी

फोन खणखणला आणि पलीकडून आवाज आला, राजाभाऊ गेले. हा एक जबरदस्त धक्का होता. 15 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी गेलो होतो. कारण होतं, त्यांनी अलीकडेच लिहिलेला मराठी भोषेसंदर्भातील लेख. शीर्षक होतं "बहता नीर.' हा लेख मागच्या वर्षी एका दिवाळी अंकासाठी द्यायचा होता; पण तेव्हा तो पूर्ण झाला नव्हता. अर्धाच राहिला होता. तो लेख आता संबंधित संपादकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती. वयपरत्वे अलीकडे त्यांना कुठेही येणं-जाणं जमत नव्हतं. त्यामुळे त्यांना मी "हो' म्हणालो होतो आणि आज सकाळी ते गेल्याची बातमी. तातडीने घरी गेलो. ढाले वहिनी (दीक्षा) आणि त्यांची मुलगी गाथा होत्या घरात. अखंड संवाद साधणारा राजा ढाले यांचा निष्प्राण देह मी पाहात फक्त उभा होतो. या शांततेत अनंत आठवणी गर्दी करत होत्या.

राजा ढाले आणि माझी ओळख "पॅंथर'च्या काळापासून. पहिली भेट झाली ती माझगाव येथील माझगाव डॉककडे जाणाऱ्या लोखंडी ब्रिजवर. अत्यंत लोभस, देखणं व्यक्तिमत्त्व. त्यावेळचं त्यांचं ते रूप कुणालाही मोहात पाडेल असं. ते केवळ लोभस रूप घेऊनच नव्हते, तर विचारांची समृद्ध बैठक असणारा एक उमदा तरुण होता. पॅंथरच्या काळातील त्यांचा झंझावात, मोर्चे, भाषणं, आंदोलनं आणि लोकांना कृतीप्रवण करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती.

राजा ढाले सांगलीतून ज्ञानार्जनासाठी मुंबईत आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वडाळ्याच्या सिद्धार्थ होस्टेलमध्ये राहात असत. पॅंथरची स्थापना प्रत्यक्ष राजाभाऊ ढाले यांनी केली नसली तरी (संस्थापक ज. वि. पवार आणि नामदेव ढसाळ) या पॅंथरची सगळी वैचारिक धुरा, आंदोलनाची दिशा सांभाळण्याचं मोठं काम ढाले यांनी केलं आहे. ढाले आंबेडकरवादी विचाराचे पुरस्कर्ते. या विचारात इतर कुठल्याच विचारांची भेसळ नको, यासाठी ते प्रचंड आग्रही होते. म्हणूनच आंबेडकरवाद की मार्क्‍सवाद असा प्रश्‍न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी "दलित पॅंथर' बरखास्त केली आणि स्वत:ची "मास मूव्हमेंट' सुरू केली. त्यानंतरही "पॅंथर' सुरू राहिली, पण तो जोश नव्हता. कुठलीही चळवळ कुणा एकाच्या खांद्यावर उभी नसते. अनेक कार्यकर्ते येतात आणि ज्यांच्यात क्षमता असते, असे लोक नेतेपदी पोहचतात. हे सगळे खरे असले तरी राजा ढाले यांच्याकडे स्वत:ची अशी एक ऊर्जा होती. त्यातूनच सत्यकथेचे अंक जाळण्याची किमया त्या काळात घडली. अशा बंडखोर वातावरणात घडत असणाऱ्या राजा ढाले यांचं संपूर्ण जीवन अत्यंत धगधगत राहिलं.

पॅंथरच्याच काळात 1974 मध्ये वरळीमध्ये पेटलेली दलित विरुद्ध सवर्ण अशी दंगल. यात एक पॅंथर कार्यकर्ता शहीद झाला. त्याचे दु:ख आयुष्यभर राजा ढाले यांना बोचत राहिले. पॅंथरच्या चळवळीच्या काळात दंगलीमध्ये एकदा राजा ढाले यांचेही डोके फुटले. "अन्यायाचा बदला अन्यायानेच घेतला पाहिजे', ही भूमिका घेऊन पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते दलितांवरील अत्याचारांच्या विरोधात गावखेड्यापर्यंत गेले. अत्याचार करणाऱ्यांना चोख धडा शिकवत होते. त्याची एक दहशत निर्माण झाली होती. या सर्व प्रकारात नेतृत्वाला दोषी धरून जात होते. परिणामी राजा ढाले यांच्यावर महाराष्ट्रातील विविध कोर्टात 60-70 केसेस पोलिसांनी दाखल केल्या होत्या. असं एक दमदार नेतृत्व आंबेडकरी विचारधारेला प्राप्त झालं होतं.

वेश्‍या व्यवसाय करणे अधिकृत करा, असे म्हणणाऱ्यांना सुनावलेले बोल असो किंवा "साधना'मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त लिहिलेला लेख असो, त्यांनी थेट प्रहार केले आहेत. साहित्यिक, विचारवंत, चित्रकार असणारा बुद्धानुयायी गेला, याचं दु:ख कायमच राहणार आहे.