ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले राजकारणातील निष्ठावंत व तळमळीचे कार्यकर्ते, नेते म्हणून परिचित होते. सरपंच ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा सुमारे सहा दशकांचा सार्वजनिक जीवनात सक्रिय वावर होता.
Prataprao Baburao Bhosale
Prataprao Baburao Bhosalesakal
Updated on

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले राजकारणातील निष्ठावंत व तळमळीचे कार्यकर्ते, नेते म्हणून परिचित होते. सरपंच ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा सुमारे सहा दशकांचा सार्वजनिक जीवनात सक्रिय वावर होता. त्यांचे रविवारी (ता. १९) निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी...

पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी, कुशल संघटक म्हणून प्रतापराव भोसले ऊर्फ भाऊ यांची ओळख. ते आमच्या सातारा जिल्ह्यातील भुईंज गावचे सुपुत्र. भुईंज हे कृष्णाकाठावरील कृषी-समृद्ध गाव. प्रतापरावांचे कुटुंब हे उत्तम शेती करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. भाऊंना स्वतःला शेतीची आवड होती.

शालेय शिक्षणापेक्षा शेतीकडे त्यांचा कल जास्त. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांना शेतीत मदत करण्यात धन्यता मानली. अशी पार्श्‍वभूमी असलेल्या प्रतापरावांच्या राजकीय वाटचालीत शेती, सहकार आणि ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब उमटले, तर त्यात काय नवल!  रोखठोक, सडेतोड बोलणे, परखड स्वभाव आणि कणखर नेतृत्व ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये.  नीटनेटके राहणीमान, परीटघडीच्या धोतरातील त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व आणि हात उंचावून बोलण्याची भाषणशैली याची समाजमनावर विशेष छाप होती. सामान्य कुटुंबातील व्यक्ती प्रभावी राजकीय  कार्यकर्ता कसा घडतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रतापरावभाऊ!

भुईंजचे सरपंच, वाई विधानसभा मतदारसंघाचे चारदा आमदार, महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आणि साताऱ्याचे तीनदा खासदार, असा प्रतापरावांचा अतिशय दीर्घ राजकीय अनुभव राहिला. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. सत्तर व ऐंशीच्या दशकात देशात ग्रामीण भागाच्या विकासाच्या नवनवीन योजना राबविल्या जात होत्या. सातारा जिल्ह्याच्या कृषी औद्योगिक विकासात महत्त्वाचे ठरलेले धोम व कण्हेर धरण प्रकल्प याच काळात पूर्ण झाले. त्यांच्या उभारणीत व तेथील धरणग्रस्तांच्या सुयोग्य पुनर्वसनाच्या कामात त्यांचे विशेष योगदान होते.

किसान फोरमचे नेतृत्व

१९८५च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे साताऱ्याचे उमेदवार होते; पण उमेदवारी अर्ज भरण्याआधीच त्यांचे निधन झाले. काँग्रेसने प्रतापराव भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेथून संसदीय कारकीर्द सुरू झाली. त्यावेळी (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण कराडच्या खासदार होत्या.

या काळात भाऊंची व माझी ओळख झाली. पुढे १९९१मध्ये राजीव गांधी यांनी मला कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. तेव्हापासून प्रतापरावांचे संसदेतील काम मला जवळून पाहता आले. ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, हे त्यांचे ठाम मत होते. यासाठी सर्वपक्षीय खासदारांचा दबावगट निर्माण करण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा ठरला. परंपरागत शेतीत शाश्वत सुधारणांसाठी सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, यासाठी ते प्रचंड आग्रही असत. स्वतः केलेल्या शेतीच्या अनुभवातून कृषी क्षेत्राकडे पाहण्याची त्यांची एक विशिष्ट भूमिका असे. त्यामुळेच खासदारांच्या ‘किसान फोरम’चे नेतृत्व आपोआप त्यांच्याकडे गेले. 

ग्रामसुधारणांबद्दल सूचना

लोकसभेच्या सभागृहापेक्षा सेंट्रल हॉल आणि संसदेची लॉबी येथेच प्रतापरावांचा वावर जास्त असे. त्यांच्या अवतीभवती आठ-दहा खासदारांचा घोळका असायचा. त्यांचा शेतीविषयक चर्चा आणि राजकीय गप्पा हा आवडता छंद. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले कितीतरी खासदार ‘किसान फोरम’चे सदस्य झाले. कृषी धोरणे ठरविताना सरकारवर दबावासाठी या फोरमचा उपयोग व्हायचा.

त्यावेळी नरसिंह राव हे पंतप्रधान व मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. भारतातील आर्थिक सुधारणांचा कालखंड होता. दूरगामी परिणाम करणारे आणि तत्कालीन अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवणारे अनेक कायदे, निर्णय त्यावेळी घेतले गेले. त्या सगळ्या प्रक्रियेचा फटका शेतकरी आणि कृषीअर्थव्यवस्थेला बसू नये, यासाठी प्रतापराव नेहमी दक्ष असत. त्या वेळी त्यांच्याकडे संसदेच्या ग्रामीण विकास स्थायी समितीचे अध्यक्षपद होते.

त्या समितीचा मी देखील काही काळ सदस्य होतो. त्यावेळी त्यांनी ग्रामसुधारणांबद्दल अनेक सूचना केल्या होत्या. खतांच्या किमती निश्चितीसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. त्यावेळी देशातील शेती व शेतीउत्पादनावर खतांच्या किमतीचा होणारा परिणाम याचा अभ्यासपूर्ण अहवाल त्यांच्या समितीने तयार केला. त्याबाबत त्यांनी दाखवलेले प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगे होते.

काँग्रेस नेतृत्वाने प्रतापरावांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, त्यावेळी केंद्रात व राज्यात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांची सरकारे होती. अशा अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. १९९९ मध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष स्थापन केला. या संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर १९९९ मध्ये झालेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवली. सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस विधानसभेतील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला. भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होऊ नये, म्हणून प्रतापरावांनी स्वतःच्या नेतृत्वाचा आग्रह न धरता समविचारी पक्षांशी आघाडी करून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापण्यात पुढाकार घेतला होता. 

उल्लेखनीय शैक्षणिक कार्य

प्रतापरावांनी १९६७ ते १९९६ या काळात आमदार व खासदार असताना वाई तालुक्यातील सहकारी व शिक्षण संस्था यांच्या निकोप वाढीसाठी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्याचे नेते, स्वातंत्र्यसैनिक किसन वीर (आबा) यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. आबांनी स्थापलेल्या वाईतील जनता शिक्षण संस्था व भुईंज येथील सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.

आबांच्या पश्चात जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद प्रतापरावांनी समर्थपणे सांभाळले. वाई महाविद्यालयाला व साखर कारखान्याला किसन वीर यांचे नाव देऊन त्यांची स्मृती चिरंतन ठेवल्या. केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांनी वाई येथे सुरू केलेल्या आणि पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विस्तारित केलेल्या प्राज्ञपाठशाळेच्या कामकाजातही त्यांचे मोठे योगदान राहिले. आज वाईतील किसन वीर महाविद्यालयात खेड्यापाड्यातील व विशेषतः डोंगरी भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेताहेत. राजकारणाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतापरावांचे हे काम उल्लेखनीय आहे. 

(लेखक माजी मुख्यमंत्री आहेत.)

भाऊ की खानावळ

दिल्लीत सातारा जिल्ह्याची विशिष्ट ओळख आहे. दिल्लीत यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या कामाचा मोठा दरारा होता. त्या परंपरेला अनुरूप काम करण्याचे मोठे आव्हान प्रतापरावांनी यशस्वीपणे पेलले.  ते केंद्रात कधीही मंत्री नव्हते; परंतु खासदारांमध्ये लोकप्रिय होते. खासदारांना खास सातारा पद्धतीचे जेवण घालण्याचा छंद भाऊंना होता. संसदेतही ते विविध सहकाऱ्यांना सोबत घेऊन चहा, नाश्‍ता, जेवण करीत. त्यावेळी संसदेच्या सेंट्रल हॅाल परिसरातील एक कोपरा ‘भाऊ की खानावळ’ म्हणून ओळखला जाई. एका अर्थाने साताऱ्याची सहभोजन संस्कृतीच भाऊंनी दिल्लीत जपली असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com