esakal | विज्ञानाला हवाय लोकसन्मान!
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञानाला हवाय लोकसन्मान!

अमेरिकेतील दोन लायगो आणि युरोपातील व्हर्गो असे तीन डिटेक्‍टर आपल्याकडे आहेत. जपानमध्ये कागरा डिटेक्‍टर सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. पण लायगो इंडिया सर्वार्थाने वेगळा असेल.

विज्ञानाला हवाय लोकसन्मान!

sakal_logo
By
सम्राट कदम

कृष्णविवर आणि गुरुत्वीय लहरी ही केवळ गणितीय आकडेमोडीतील समीकरणे नसून, अस्तित्वात असलेले अवकाशीय घटक आहेत, यावर निवडक शास्त्रज्ञांचा विश्‍वास होता. त्यातील एक प्रा. डॉ. संजीव धुरंधर! त्यांना अमेरिकन फिजिकल सोसायटीने मानद सदस्यत्व दिलेय. त्यांच्याशी ‘सकाळ’चे प्रतिनिधी सम्राट कदम यांनी साधलेला संवाद... 

प्रश्‍न - गुरुत्वीय लहरींमुळे खगोलशास्त्राचे नवे पर्व सुरू झाले का? लायगो इंडियाची जागतिक संशोधनातील भूमिका काय? 
प्रा. धुरंधर - गॅलिलिओने गुरूच्या उपग्रहांचा शोध लावण्यापूर्वी दुर्बिणी अस्तित्वातच होत्या; पण त्याने ती आकाशाकडे फिरवली आणि प्रकाशित खगोलशास्त्राचे नवे युगच सुरू झाले. त्यानंतर अवकाशातून येणाऱ्या रेडिओ, अल्ट्रा व्हायोलेट, इन्फ्रारेड, क्ष-किरणे आदी विद्युतचुंबकीय लहरींची निरीक्षणे घेणाऱ्या दुर्बिणी आल्या. त्यातून जोड तारे, पल्सार, दीर्घिका, मायक्रोवेव्ह बॅग्राउंड आदींचा शोध घेतला गेला. गुरुत्वीय लहरींचे नवयुग आता कुठे सुरू झालेय. लायगोच्या माध्यमातून २०१५नंतर आतापर्यंत तीनदा निरीक्षणे घेतली. त्यात गुरुत्वीय लहरींचे पन्नासवर स्त्रोत सापडले. पुढे शंभरवर वर्षे यातील संशोधने होतच राहतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आयुका’शी जोडून घेण्याचा मुख्य उद्देश गुरुत्वीय लहरींसंबंधीचे संशोधन हाच होता. गुरुत्वीय लहरींचा डिटेक्‍टर (लायगो इंडिया) भारतात उभारण्यासाठीचा प्रस्तावही मी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला पाठविला. त्यावेळी मोठा खर्च करून गुरुत्वीय लहरींचा डिटेक्‍टर उभारण्याबद्दल लोकांनी माझ्यावर टीकाही केली. असो. आता भारतात लायगो उभारण्यात येतोय. अमेरिकेतील दोन लायगो आणि युरोपातील व्हर्गो असे तीन डिटेक्‍टर आपल्याकडे आहेत. जपानमध्ये कागरा डिटेक्‍टर सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. पण लायगो इंडिया सर्वार्थाने वेगळा असेल. कारण आपले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान. अवकाशात गुरुत्वीय लहरींच्या स्रोतांचे अचूक ठिकाण शोधण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. युरोप आणि अमेरिकेतील संग्राहकांमुळे गुरुत्वीय लहरींच्या स्त्रोताची निश्‍चित ठिकाणे शोधता येत नाहीत. पण आपल्या लायगोमुळे मोठी बेसलाईन मिळेल. त्यामुळे अधिक अचूकपणे म्हणजे किती तरी कमी पटीने कमी स्त्रोतांचे अवकाशातील ठिकाण निश्‍चित करता येईल. 

प्रश्‍न - लायगोमुळे प्रचंड प्रमाणावर खगोलशास्त्रीय विदाचे (डाटा) संकलन होईल. त्याच्या विश्‍लेषणासाठी कुशल मनुष्यबळ आहे का? 
प्रा. धुरंधर - हो, निश्‍चितच! १९९१पासून प्रा. बी. एस. सत्यप्रकाश यांच्यासोबत मी गुरुत्वीय लहरींवर संशोधन करतोय. आमचे संशोधक विद्यार्थी, त्यांचेही विद्यार्थी असा मोठा समूह तयार झालाय. सध्या देशात पन्नासवर शास्त्रज्ञ यावर संशोधन करताहेत. ते अमेरिकेतील लायगोच्या विदावर काम करत आहेत. १९८९ पासून आपण ‘आयुका’मध्ये यावर काम करत आहे. रामन इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. बाला अय्यर यांचे विद्यार्थीही काम करताहेत. लायगो उभारण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अभियंते, लेझर, व्हॅक्‍युम, कंट्रोल सिस्टीम, सिस्मिक आयसोलेशन, संगणक आदी विषयातील तज्ज्ञांची आवश्‍यकता आहे. 

प्रश्‍न - देशात लोकांचा संशोधनाकडे  कल कमी दिसतो, समाज म्हणून आपण विज्ञानाला न्याय देतो का? 
प्रा. धुरंधर - खरं तर संशोधनात पुर्वीपासून पैसे कमी मिळतात, पण मानसन्मान खूप होता. जनमानसात प्राध्यापक, शिक्षक आणि संशोधक यांना आदराचे स्थान होते. आता कुठेतरी ते कमी झाल्यासारखे वाटते. सर्वच हुशार विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल असेलच असे नाही. संशोधनातल्या संधी, निधीची उपलब्धता हा प्रश्‍न आहेच. आता मोठ्या पॅकेजची नोकरी हीच विद्यार्थ्यांसह शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाची भूमिका आहे. त्यामुळे सध्या संशोधनाचे गणित बिघडलंय. तरीही देशातील काही भागांमध्ये वैज्ञानिकांची परंपरा निर्माण होते, हे आशादायक चित्र आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधनासाठी निधीचा कमतरता नेहमीच असते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत आपण फार कमी खर्च संशोधनावर करतो. अमेरिका, चीनसारखे देश दोन टक्‍क्‍यांवर खर्च करतात. एखाद्या विषयाचा पुर्वी देशात एखादा दुसरा शास्त्रज्ञ असायचा, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, नवकल्पना आणि परस्पर सहकार्य यांचा अभाव होता. अशा चर्चेतूनच विज्ञान पुढे जातंय. याबाबत अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञांप्रमाणे आपणही परस्पर सहकार्य आणि चर्चेतून संशोधन पुढे न्यावे. 

प्रश्‍न - भारताला विज्ञानात नोबेल मिळेल का? त्यासाठी काय तयारी हवी? 
प्रा. धुरंधर - निश्‍चितच. परंतु त्यासाठी आपली चांगली तयारी लागेल. डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रूपाने देशातच काम केलेल्या पहिल्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाले. त्यानंतर अजूनही भारतात राहून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल मिळालेले नाही. त्या दिशेने प्रवास सुरू आहे. परंतु पुरेसे प्रोत्साहन हवे आहे. प्रयोगांसाठी निधीपासून शिक्षणातील मूलभूत बदलांपर्यंत आपल्याला काम करावे लागेल. मूलभूत विज्ञानाचा नवनीतम संशोधनाशी संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट केला पाहिजे. संशोधनासाठी निधी हवाच पण विज्ञानाला लोकसन्मानही पाहिजे. विज्ञानात रुची निर्माण करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचावा लागेल. संशोधकांनीही ‘कटिंग एज’ म्हणजे नवीनतम संशोधनात स्वत-ला गुंतवावे. तेव्हा कुठे आपण नोबेलविजेत्या संशोधनाकडे वाटचाल करू. 

बालगंधर्वांचे लाभले सान्निध्य
प्रा. धुरंधर यांच्या घरी १८८५ मधील ऑर्गन दिसला. विशेष म्हणजे ऑर्गनवर प्रा. धुरंधर यांचे वडील विष्णू जगन्नाथ धुरंघर यांनी बालगंधर्वांना साथ केली होती. बालगंधर्वांचे सान्निध्य प्रा. धुरंधरांना लाभले आहे. ते स्वत- ऑर्गन, सिंथेसायझर, ॲकॉर्डीयन आदी वाद्य वाजवतात. त्यांना क्रिकेटची आवड असून टाइम्स शिल्डमध्ये ते क्रिकेट खेळले होते. एकदा रामनाथ पार्कर आणि पद्माकर शिवलकर यांच्याविरुद्ध लीग क्रिकेटसुद्धा खेळलेत. 

loading image