आक्रमक बनत चाललेल्या भावना

prof raja aakash
prof raja aakash

सर्व प्राण्यांमध्ये आपण माणूस म्हणून श्रेष्ठ आहोत. याचे कारण आपल्याला लाभलेली विचारशक्ती व विविध प्रकारच्या भावना. इतर प्राण्यांमध्ये स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या भावनाच दिसून येतात. उदा. भीती - शेळी जर वाघासमोर उभी असेल, तर भीतीने थिजून जाते. त्या भावना पूर्णपणे बॉयोलॉजिकल स्वरूपाच्या असतात. पण माणसात २०० ते ३०० प्रकारच्या भावना असतात. उदा. माया, जिव्हाळा, आपुलकी, करुणा, प्रेम, हेवा, मत्सर, तिरस्कार, असूया, चिंता, काळजी इत्यादी. माणूस म्हणून इतर प्राण्यांपेक्षा हे आपलं वेगळेपण. दोन प्राण्यांमध्ये होणारी लढाई ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई असते. दुसऱ्याला मारलं तरच आपण जिवंत राहणार आणि तो जिंकला तर आपण मरणार ही आक्रमकता त्यांच्या अस्तित्वाशी निगडित असते. म्हणजे ती आक्रमकता बॉयोलॉजिकल पातळीवर असते. पण जीवन-मरणाचा प्रश्न नसतानासुद्धा क्षुल्लक कारणांसाठी माणूस आक्रमक होतो. लहानशा कारणासाठी दुसऱ्याचा जीव घेतो. यामागे केवळ आक्रमकता नसते, तर इतरही अनेक भावनांचे विविध रंग एकमेकांमध्ये गुतंलेले असतात व ते माणसात असलेल्या आक्रमकतेची तीव्रता वाढवत असतात. अन्यथा १० रु. दिले नाहीत म्हणून कुणी जीव घेतला नसता.

जशी आक्रमकता, तशाच इतर भावना. माणसाच्या बाबतीत या भावना एकट्या कधीच येत नाहीत. विविध भावनांची सरमिसळ होऊन त्या येतात. त्यातल्या एखाद्या भावनेची तीव्रता वाढते व माणसाचं स्वतःवरचं संतुलन त्या क्षणाला हरवून बसतं व त्यातून त्या व्यक्तीचं स्वतःचं किंवा त्याच्यामुळे इतरांचं अस्तित्व धोक्‍यात येतं.
निरपेक्षपणे पाहिलं तर नापास होणं, कमी मार्कस्‌ मिळणं, प्रियकर किंवा प्रेयसीने प्रेमात नकार देणं... या गोष्टी आत्महत्या करण्याइतक्‍या भयंकर आपल्याला वाटणार नाहीत.
‘‘नापास झालास. त्यात काय मोठं! पुन्हा चांगला अभ्यास करायचा व पास होऊन दाखवायचं.’’
‘‘तिनं तुझं प्रेम नाकारलं. ठीक आहे. जगात असंख्य सुंदर व सद्‌गुणी मुली आहेत. दुसरी शोधता येईल.’’
इतर लोक नापास होणं व प्रेमभंग होणं याचं विश्‍लेषण या स्वरूपात करतील; पण जो प्रत्यक्ष या गोष्टी अनुभवतो आहे, तो मात्र या गोष्टी इतक्‍या सहजतेने घेणार नाही. कारण अपयश किंवा प्रेमभंग यामागे केवळ ‘नैराश्‍य’ ही एकमेव भावना नाही. यासोबत अनेक भावनांची गुंतागुंत त्या व्यक्तीच्या मनात झालेली असते.
भावनांवरचं हे संतुलन सुटण्याचं प्रमाण आज समाजात दिवसेंदिवस वाढतं आहे. त्यामागचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सोशल मीडिया आणि टीव्ही व त्यावर दाखवले जाणारे विविध चॅनेल. आपण त्यातल्या विविध गोष्टींकडे आकर्षित होतो. त्यात भावनांच्या विविध छटा जास्त तीव्र स्वरूपात ठासून भरलेल्या असतात. त्या कशा योग्य व न्याय्य आहेत हे ठळकपणे बघणाऱ्याला पटवून दिलं जातं. तेच लॉजिक माणसाच्या अंतर्मनात सतत कोरलं जातं व तेच लॉजिक आपण आपल्या दैनंदित जीवनात घडणाऱ्या घटनांना लावायला लागतो. त्यामुळे आपल्या मनातल्या भावंनांची तीव्रता अनेक पटींनी वाढते व आपण स्वतःच व स्वतःसोबतच इतरांचंदेखील नुकसान करून बसतो. अर्थातच, भावनांच्या या तीव्रतेला इतरदेखील घटक आहेतच.
भावनांवरचं संतुलन माणसाला यशाकडे नेतं, तर असंतुलन विनाशाकडे नेतं. पूर्वीच्या काळी आम्ही मानसशास्त्रज्ञ असं मानायचो, की माणसाचं यश- अपयश त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं. पण आज मात्र आम्ही भावनिक संतुलन हे जास्त महत्त्वाचं मानायला लागलो आहे.
म्हणून आपल्याला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, तर स्वतःच्या भावनांवर संतुलन कसं मिळवायचं हे शिकायला हवं. त्यामुळे आपण इतरांसोबत चटकन नातं जोडायला शिकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com