येस, आय कॅन!

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 27 जून 2019

जिथं घाट सुरू होतो, तिथं एक बोर्ड लावायचा. तो बोर्ड लावल्यावर मात्र तेथून एकही गाडी मागे फिरली नाही. त्या बोर्डवर फक्‍त तीन शब्द लिहिले होते- "येस, यू कॅन!' "होय! तुम्हाला शक्‍य आहे. तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता.' हा बोर्ड प्रत्येक ड्रायव्हरचा आत्मविश्‍वास वाढवायचा.

अमेरिकेत एका डोंगराळ भागात खूप मोठा घाटाचा रस्ता आहे. प्रत्येक ड्रायव्हर त्या घाटाच्या वळणाजवळ येऊन समोरचं भयानक घाटाचं दृश्‍य बघायचा. त्याच्या मनात विचार यायचे, "बापरे, इतकी खोल दरी. पडलो तर हाडेदेखील शिल्लक राहणार नाहीत. नको, ती रिस्क कशाला घ्यायची? वेळ लागला तर चालेल; पण सुरक्षित रस्त्यानं जाऊ.' त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक तेथूनच मागे फिरायचे आणि 500 किलोमीटर लांबच्या मार्गाने जाणं पसंत करायचे.

अमेरिकी प्रशासनासमोर मोठाच प्रश्‍न निर्माण झाला, की त्या घाटाच्या रस्त्याने जाण्यासाठी लोकांचं मन कसं वळवायचं? तज्ज्ञ मंडळींची बैठक बोलावली गेली आणि दोन- तीन तासांच्या चर्चेनंतर असं ठरलं की, जिथं घाट सुरू होतो, तिथं एक बोर्ड लावायचा. तो बोर्ड लावल्यावर मात्र तेथून एकही गाडी मागे फिरली नाही. त्या बोर्डवर फक्‍त तीन शब्द लिहिले होते- "येस, यू कॅन!' "होय! तुम्हाला शक्‍य आहे. तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता.' हा बोर्ड प्रत्येक ड्रायव्हरचा आत्मविश्‍वास वाढवायचा. "मी मेलो तर? मला जमेल काय? मी ऍक्‍सिडेंट तर करणार नाही नं? या भयानक घाटातून गाडी चालवणं अशक्‍य आहे...' अशा विचारांची मालिका हा बोर्ड वाचल्यानंतर खंडित व्हायची. त्याचा आत्मविश्‍वास वाढायचा. 

तो घाटाचा रस्ता म्हणजे आपल्यावर येऊन पडणारी कामे, जबाबदाऱ्या. एका शिक्षकाचा मला फोन आला. "सर, मला एनसीसीची जबाबदारी घेता काय, असे माझे मुख्याध्यापक विचारत आहेत. मला टेंशन आलंय, मी काय करू?' मी म्हणालो, "जबाबदारी का टाळता आहात?' त्यांचं म्हणणं होतं, "मला अनुभव नाही, मला जमणार नाही, माझा खूप वेळ त्यात खर्च होईल.' "उद्या दुसरी जबाबदारी टाकतील, परवा तिसरी टाकतील. किती वेळा टाळाल? हा माणूस कामं टाळतो, हा आपल्या संस्थेत काहीच कामाचा नाही, अशी त्यांची भावना झाली, तर याच पगाराची दुसरी नोकरी मिळेल काय?' आता ते निरुत्तर झाले. हा विचार तर आपण केलाच नव्हता, हे त्यांच्या लक्षात आलं व नवी जबाबदारी घेण्यास ते तयार झाले. 

नोकरी करताना किंवा शिक्षण घेताना असे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. प्रत्येक वेळी पळवाट शोधत गेलात, तर आयुष्यात मागेच पडाल. आपण पास होऊ काय? आपल्याला चांगलं गुण मिळतील काय? आपल्याला परीक्षेत आठवेल का? असे अडथळे प्रत्येक माणसाला पावलोपावली येत असतात. त्या वेळी कारणं सांगणं, टाळणं, माघारी फिरणं म्हणजे रस्ता बदलण्यासाठी केलेलं पलायन. तेव्हा तुम्हीच ठरवा की तुम्हाला पळपुटा व्हायचं आहे, की "येस, आय कॅन !' हा बोर्ड स्वत:च्या मनात टांगून हिमतीनं सामोरं जायचं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof Raja Akash writes about self confidence