पाकिस्तानातील दलितांची होरपळ

prof rajesh kharat
prof rajesh kharat

पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे.

पा किस्तानातील सिंध प्रांतात रीना आणि रवीना या दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर तर करण्यात आलेच, पण त्यांचा विवाह अपहरणकर्त्या मुस्लिम तरुणांशी करण्यात आला. ही बातमी सर्वसामान्य भारतीयांसाठी उद्वेग आणि चीड आणणारी असली, तरी पाकिस्तानातील हिंदूंसाठी ही बाब नित्याचीच आहे. गेल्या आठवड्यातील या अपहरणाच्या काही दिवसआधी आणखी काही अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले, परंतु त्यांची बातमी झाली नाही. उदा. कोमल (तांडो अल्ल्यार), लक्ष्मी(कराची), सोनिया (कराची), सोनिया भील
(हैदराबाद), पर्मिला मेहेश्वरी (तांडो), माला मेघवार (बादिन), गैनी कोल्ही (गोलाराची), लक्ष्मी, गौरी आणि चंपा (तराई बादिन) आणि सोनिया (मिरपूर खास) अशी ही न संपणारी यादी आहे. विशेष म्हणजे या मुली दलित समाजातील आहेत. सांगण्याचा उद्देश असा की गेली कित्येक वर्षे, भारताच्या फाळणीनंतर हे प्रकार अव्याहतपणे चालू आहेत.

 पाकिस्तानातील स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणाशी निगडित असणाऱ्या ‘औरत फाउंडेशन’आणि ‘पाकिस्तान मानवी हक्क आयोग’ यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात दिवसागणिक सरासरी तीन-चार हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जाते, तसेच धर्मांतर केल्यानंतर ‘घरवापसी’ अथवा ‘धर्मवापसी’ होऊ नये म्हणून त्यांचे लग्न लावले जाते. एकदा का मुस्लिम धर्म स्वीकारला, की पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार कोणालाही धर्म बदलता येत नाही. कारण पाकिस्तानची राज्यघटना कायदा आणि प्रशासन इस्लामवर आधारित आहे. पाकिस्तानातील नागरी समाज हा बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक आहे, असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तेथील सामाजिक आणि राजकीय व्यवस्था इस्लामी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. परिणामी, इस्लाम धर्म वाढविण्यासाठी जे मुस्लिम नाहीत, त्यांचे धर्मांतर करून मुस्लिम बनविणे हे त्यांच्या दृष्टीने ‘पुण्या’चे काम होय आणि या ‘पुण्य’कार्यास पाकिस्तान सरकारचा छुपा आणि मुस्लिम धर्मगुरूंचा उघड पाठिंबा असतो. त्याशिवाय हिंदू तरुणींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. अशा या दुर्दैवी धर्मांतराच्या प्रक्रियेला बळी पडणाऱ्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि दमन याची कल्पना न केलेलीच बरी! या सर्व प्रक्रियेत तरुण मुलीच का? आणि त्याही हिंदू दलितच का? हिंदू दलित मुली आणि त्या समाजावर अशी परिस्थिती ओढवण्यास जबाबदार कोण? अशा काही प्रश्नांची चर्चा करणे अप्रस्तुत ठरू नये.

पाकिस्तानात विविध प्रांतांमध्ये वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याक समाज विखुरलेला आहे. पैकी पश्‍तून, बलुच, सिंधी, मुहाजिर, हझारा हे वांशिक अल्पसंख्याक आहेत, तर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये हिंदूबरोबरच ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारसी यांचा समावेश होतो. यातील हिंदू आणि ख्रिस्ती हे धार्मिक अल्पसंख्याक सिंध आणि काही प्रमाणात बलुचिस्तानच्या ग्रामीण भागात आढळतात. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे सात-आठ टक्के लोक हिंदू आहेत. त्यापैकी अंदाजे ९६ टक्के हिंदू हे सिंध प्रांतात, विशेषतः गुजरात आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील रहिवासी आहेत. हिंदूप्रमाणेच ख्रिस्ती समाजदेखील येथे आहे; पण मुळात ते हिंदू दलित होते आणि काळाच्या ओघात ख्रिस्ती झाले. परिणामी, सिंधमधील धर्मगुरू पीर आयुब याच्या फतव्यामुळे ख्रिस्ती आणि हिंदू या दोन्ही समाजांना हिंसाचाराची झळ पोहोचत असते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या हिंसाचाराचे स्वरूप वेगवेगळे आहे. ख्रिस्ती समुदायावर हिंसक हल्ला करून त्यांना जिवे मारले जाते किंवा त्यांची स्थावर मालमत्ता आणि चर्च उद्‌ध्वस्त केले जाते. गेल्या काही वर्षांत अनेकदा चर्चमध्ये घुसून प्रार्थनेच्या वेळी लोकांना ठार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हिंदूंच्या बाबतीत तेरा ते सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जाते आणि नंतर मुस्लिम तरुणाशी लग्न लावले जाते. विशेषतः पाकिस्तानातील हिंदू दलित समाज हा ख्रिस्ती समाजापेक्षा जास्त शोषित आणि असुरक्षित आहे. कारण दलितांपैकी ७८ टक्के लोक निरक्षर असून, ते ग्रामीण भागात राहतात. बहुतांश दलित भूमिहीन मजूर असल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांना वीटभट्टीवर रोजंदारीवर कामाला जावे लागते किंवा स्थानिक सरंजामदाराकडे वेठबिगारी पद्धतीने कुटुंबच्या कुटुंबाला कामाला जुंपावे लागते. सामाजिक आणि आर्थिक पत नसल्याने पाकिस्तानात होणाऱ्या अशा अत्याचारांबाबत ते कोणाकडे न्याय मागणार? त्यामुळे सिंधमधील ‘वडेरा-राज’ या सरंजामदारी पद्धतीत दलितांचे सर्व बाजूंनी शोषण होते. त्यांच्या बाजूने तेवढ्याच ताकदीचा समाज आणि संसाधने नसल्याने त्यांना तसा कोण वाली नाही. अशा वेळी तेथील मुलींना स्थानिक तरुणांच्या मदतीने सापळ्यात अडकवले जाते. या मुलींचे अपहरण करून नंतर धर्मांतर आणि त्यानंतर लग्न या दुष्टचक्रात त्यांना अडकवतात.

पाकिस्तानात हिंदू दलितांवर ओढवलेली ही वेळ इतर अल्पसंख्याकांवर का आली नाही, हे समजून घेण्यासाठी भारताच्या फाळणीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा नव्याने अभ्यास करणे आवश्‍यक आहे. फाळणीनंतर पाकिस्तानच्या पंजाबमधील हिंदूंसाठी भारतातील पंजाब होता, तर सिंध प्रांतातील सवर्ण हिंदू, ब्राह्मण, कायस्थ, क्षत्रिय आणि बनिया यांच्यासाठी स्वतंत्र भारतातील मुंबई प्रांत होता. तत्कालीन सरकारने या हिंदू निर्वासितांना दिल्ली आणि मुंबई येथे भरभरून मदत केली, त्यामुळे सिंधी निर्वासित गुजरात, तसेच मुंबईतील दक्षिण मुंबई, खार व पार्ले, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथे सुस्थितीत आहेत. काही ठिकाणी तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्यांचे वर्चस्व आहे. पाकिस्तानात मागे राहिलेले हिंदू दलित होते. त्यांना स्वतंत्र भारतात आणि पाकिस्तानात कोणी तारणहार नव्हता. त्यांच्या दुःस्थितीबाबतचे संशोधनात्मक लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी Thoughts on Pakistan ध्ये लिहून पाकिस्तानातील हिंदू दलितांची होणारी छळवणूक आणि धर्मांतराविषयी इशारा दिला होता. पण त्यांच्या अकाली निधनाने पाकिस्तानातील दलितांचा प्रश्न तसाच अधांतरीच राहिला. कारण भारतातील तत्कालीन सरकार आणि धोरणकर्ते भारतातील दलितांऐवजी पाकिस्तानातील दलितांचा कैवार का घेतील, हा सहज उद्भवणारा प्रश्न आहे. तेव्हापासून आजपर्यंत लाखोंच्या संख्येने हिंदू दलितांचे तेथे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आहे आणि आजही होत आहे. फरक एवढाच की सामाजिक माध्यमांमुळे रिना आणि रविना यांची बातमी जगासमोर आली आणि नाइलाजास्तव का होईना भारतातील सध्याच्या सरकारने हिंदूंचा कैवारी म्हणून पाकिस्तानला याबाबत जाब विचारला आणि दलितांच्या धर्मांतराविरोधात आग्रही भूमिका घेतली, हे उल्लेखनीय ! म्यानमारमधील रोहिंग्या आणि बांगलादेशातील स्थलांतरित यांना आपण आश्रय देत असू, तर पाकिस्तानातील हिंदू दलितांना का नको?  त्यांना भारतात येऊ देण्याचे धोरण स्वीकारल्यास सरकारची या संदर्भातील भूमिका स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com