esakal | सावरकरांचे समाजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकरांचे समाजकारण

महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या परंपरेचा स्वातंत्र्यवीर सावरकर एक भाग होते. अस्पृश्‍यता निवारणाची चळवळ हाती घेताना सामाजिक सुधारणांकरिता सात ‘स्वदेशी बेड्या’ तोडण्याचे आवाहन त्यांनी केले होते. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर दृष्टिक्षेप. 

सावरकरांचे समाजकारण

sakal_logo
By
प्रा. संतोष शेलार

महाराष्ट्राला समाजप्रबोधनाची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरही याच प्रबोधन परंपरेचा एक भाग होते. अगदी बालपणापासून जरी आपण सावरकरांचे जीवन पाहिले, तरी असे दिसते, की बालपणीही सावरकर अतिशय प्रागतिक भूमिका घेत. तेव्हाही ते जातिभेद मानत नसल्याचे पुरावे आहेत. बालपणापासून त्यांचे मित्र सर्व जातींचे होते. स्त्रियांच्या बाबतीतही अशीच उदार भूमिका त्यांनी लहानपणापासून घेतल्याचे दिसून येते. उदा. त्यांच्या वहिनींना त्यांनी आग्रह करून शिकण्यास भाग पाडले. तसेच त्यांनी व त्यांच्या बंधूंनी स्त्रियांची संघटना उभारली होती. ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ असे त्या संघटनेचे नाव होते. वयाच्या १९ व्या वर्षी लिहिलेली ‘विधवा दु:स्थिती कथन’ ही १०२ ओळींची कविताही याचीच साक्ष देते. सावरकरांच्या क्रांतिकार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना शिक्षा देऊन अंदमानला पाठविले. अंदमानातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य करू नये, असे त्यांच्यावर बंधन घालण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतील वास्तव्यात मुख्यत: सामाजिक स्वरूपाचे कार्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

समाजकारणाचे वैचारिक स्वरूप 
महाराष्ट्रात विविध प्रकारचे समाजसुधारक झाले आहेत. काही सुधारकांना धर्मात राहून हळूहळू धर्मसुधारणा करायच्या होत्या, तर काहींना ही धर्मव्यवस्था पूर्णपणे मोडून पर्यायी धर्मव्यवस्था स्थापावयाची होती; तर काही सुधारकांना धर्माची चिकित्सा करून पूर्णपणे धर्ममुक्त व्हायचे होते. सावरकर या तिसऱ्या परंपरेतील सुधारक होते. सावरकरांनी या संदर्भात तीन मुद्दे मांडलेले आहेत. १) धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत. २) धर्मग्रंथ हे प्राचीन काळी त्या काळाच्या सोयीनुसार व गरजेनुसार निर्माण झालेले असले, तरी आज ते कालबाह्य व टाकाऊ झालेले आहेत. ३) धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून, समाजसंस्था आपल्याला बुद्धिवादाच्या नव्या तत्त्वावर म्हणजे विज्ञान ग्रंथांवर उभी केली पाहिजे. सावरकरांनी सामाजिक सुधारणांकरिता सात ‘स्वदेशी बेड्या’ तोडण्यास सांगितले. त्या पुढीलप्रमाणे- वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी.

अस्पृश्‍यता निवारणाची चळवळ 
रत्नागिरी हे गाव त्या काळी तसे सनातनी मानले जात असे. सावरकरांनी तेथे प्रथम अस्पृश्‍यता निवारणाची चळवळ हाती घेतली. त्यात अस्पृश्‍यांच्या वस्तीत जाऊन भजन करणे, सहभोजनाचे कार्यक्रम, सर्वजातीय स्त्रियांचे हळदी-कुंकू, अस्पृश्‍य मुलांना शाळेत सरमिसळ पद्धतीने बसविणे आदी कार्यक्रमांचा समावेश होता. अस्पृश्‍यांच्या मंदिर प्रवेशासाठीही त्यांनी प्रयत्न केले. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर त्यांनी चर्चा व वादविवाद करून कसे मुक्त केले, याची तपशीलवार माहिती धनंजय कीर आणि शेषराव मोरे यांच्या ग्रंथांतून मिळते. अशी जुनी-नवी सुमारे ४०० ते ५०० मंदिरे त्यांनी सर्वांसाठी मुक्त केली. तसेच त्यांच्या पुढाकाराने बांधल्या गेलेल्या पतितपावन मंदिराचा उपयोग त्यांनी प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून केला. वेगवेगळ्या जातींचे कीर्तनकार तिथे कीर्तन करीत. सार्वजनिक सभा, नाटके, सत्यनारायण अशा ठिकाणी सवर्णाबरोबरच अस्पृश्‍यांचीही उपस्थिती असण्यावर सावरकरांचा कटाक्ष असे. त्यांचे रत्नागिरी येथील कार्य पाहून ‘आपले उर्वरित आयुष्य ईश्वराने सावरकरांना द्यावे,’ अशी इच्छा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी व्यक्त केली होती. सहभोजनाचे कार्यक्रम सावरकरांनी अतिशय हिरिरीने राबविल्याचे दिसते. त्यातून बऱ्याच वेळा मारामाऱ्या व वाळीत टाकण्याचे प्रकारही घडले होते. वाळीत टाकल्यामुळे त्यांच्या कित्येक कार्यकर्त्यांच्या घरी लग्नासारखी कार्ये व्हायला अडचण निर्माण होई. त्या वेळी सावरकर त्यांना प्रायश्‍चित्त घेण्याचा सल्ला देत. घरचे कार्य उरकले की ही मंडळी परत सामाजिक कामात भाग घेत.

परिणामी प्रायश्‍चित्त या प्रकाराचा फोलपणाही लोकांच्या लक्षात येऊ लागला. सावरकरांनी पुरुषांबरोबरच स्त्रियांचीही सहभोजने सुरू केली. सहभोजनातील स्त्रियांची संख्या वाढत जाऊन ती चारशेपेक्षाही जास्त झाल्याची माहिती मिळते. त्यातून जातींना तर तडे जातच, पण स्त्रियांनाही घराबाहेर पडून समाजकार्यात पडण्याची संधी मिळे. सावरकरांच्या स्त्रीविषयक लेखनात त्यांनी योनिशुचितेला स्पष्ट विरोध केल्याचे दिसते. जातिभेदाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरजातीय विवाह होय. सावरकरांनी असे किमान १० ते १५ विवाह यशस्वीरीत्या घडवून आणल्याची माहिती मिळते.

सावरकरांच्या समाजकारणात हिंदूंबरोबरच मुस्लिमांचे प्रबोधन अभिप्रेत आहे. त्यासाठी त्यांनी काही लेखही लिहिले. मुस्लिम समाजात सुधारणा व्हाव्यात म्हणून प्रबोधन करणारे ते पहिले हिंदू सुधारक होत. सावरकरांनी मांडलेल्या विचार व केलेल्या कार्यावरून दिसून येते, की सावरकरांचे विचार मानवतावाद व बुद्धिवाद दोन महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर केंद्रित झालेले आहेत. या खेरीज उदारमतवाद, उपयुक्ततावाद, व्यक्तिवाद आदी मूल्ये सावरकर महत्त्वाची मानत. कोणताही विचार हा प्रत्यक्ष कृतीत आणला पहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्या काळाच्या मानाने सावरकरांचे हे कार्य क्रांतिकारकच म्हटले पाहिजे.