जुळवाजुळवी नि दबावाची खेळी (राजधानी दिल्ली)

अनंत बागाईतकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

निवडणुका जवळ येत असल्याने कॉंग्रेस व भाजपने प्रादेशिक पक्षांबरोबर आघाड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 
अशा वेळी दबावतंत्राचा अवलंब करून अधिकाधिक राजकीय लाभ उठविण्याचा या प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे. वेळापत्रकाप्रमाणे लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश आणि ओडिशा यांच्या विधानसभा निवडणुका तर होणारच आहेत. कदाचित महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंड यांच्याबाबतही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे राजकारणाने आता निवडणुकीच्या दिशेने गती पकडली आहे. 

लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीची आपापली वैशिष्ट्ये असतात. सतराव्या लोकसभेसाठी होणारी निवडणूकही याला अपवाद नाही. या निवडणुकीत "भारतीय जनता पक्ष विरुद्ध बाकीचे सर्व' असे चित्र निर्माण केले जात आहे. असे असले तरी या "जनमत-महोत्सवा'ला अनेक पदर आणि पैलू आहेत, असे आजच्या घडीला दिसून येते. हळूहळू निवडणुका जवळ येत जातील, त्याप्रमाणे त्यांचे रंग-रूपही पालटत जाईल. आताच्या घडीचे राजकीय चित्र पाहता भाजप हा केंद्रस्थानी असलेला पक्ष आहे आणि त्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपच्या बरोबर सध्या असलेल्या राजकीय मित्रपक्षांमध्ये शिरोमणी अकाली दल, शिवसेना (अजूनही ते राज्य व केंद्रात सत्तेत सहभागी आहेत.), नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, झारखंडमधील काही राजकीय गट व पक्ष आणि ईशान्य भारतातील लहान प्रादेशिक पक्ष यांचा समावेश आहे. संभाव्य आघाडी-मित्रांमध्ये तमिळनाडूतील अण्णा द्रमुक आणि आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेस (जगनमोहन रेड्डी) यांचा समावेश केला जात आहे. महाराष्ट्रातही काही स्थानिक गट व पक्ष आहेत. 

विरोधी पक्षांमध्ये कॉंग्रेस हा मुख्य पक्ष असला, तरी या पक्षाबरोबर असलेले प्रादेशिक मित्रपक्ष बलवान आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा "यूपीए' म्हणून असलेल्या आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष), फारुख व ओमर अब्दुल्ला या पिता-पुत्रांची नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग आणि तमिळनाडूत द्रमुक हे पक्ष आहेत. महाराष्ट्र व तमिळनाडूत अनुक्रमे राष्ट्रवादी कॉंग्रेस व द्रमुकबरोबर कॉंग्रेसची आघाडी होत आहे. त्यांच्या जागावाटपाचे तपशील लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय राजकारणात आणि भाजपच्या विरोधात एकत्र असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीत काही उपगटही आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वोसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसच्या बरोबर असल्या, तरी पश्‍चिम बंगालमध्ये मात्र कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांचे सख्य नाही आणि या राज्यात कॉंग्रेसला "एकला चलो रे' या रवींद्रनाथांच्या काव्यपंक्तींचाच आधार घ्यावा लागणार आहे. तीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीत कॉंग्रेसला स्थान दिलेले नाही. यामागे विशिष्ट व्यूहरचनेचा भाग आहे. आंध्र प्रदेशातही तेलुगू देशम आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी न करण्याचे ठरविण्यात आले आहे. तेलंगणातदेखील कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे पारडे जड आहे. तेथे कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी जुनी आहे. परंतु, बिहारमध्ये या आघाडीत जीतनराम मांझी, डावे पक्ष आणि नव्याने सहभागी झालेले उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष यांचा समावेश आहे. यामुळे जागावाटपात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे.

हे सर्व चित्र पाहिल्यानंतर हे लक्षात येते, की भाजप आघाडीच्या विरोधात दोन वेगवेगळ्या आघाड्या किंवा गट असतील. एक कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए' आणि दुसऱ्या पातळीवर उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल व आंध्र प्रदेशात तेथील प्रमुख प्रादेशिक पक्ष असे या लढतींचे स्वरूप असेल. भाजपने मात्र त्यांच्या वर्तमान आघाडीतील मित्रपक्षांबरोबर जागावाटपाचे समझोते करून आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी भाजप आघाडीत काही वेगळ्या हालचालीही सुरू आहेत. संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष, निवडणूक व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञ किंवा "आधुनिक चाणक्‍य' म्हणून प्रसिद्धी मिळालेले प्रशांत किशोर ऊर्फ पीके यांनी वेगळी मोहीम सुरू केलेली आहे. त्यांच्या या मोहिमेत भाजपबरोबर असलेल्या मित्रपक्षांची एक उपआघाडी किंवा गट स्थापन करण्याची योजना आहे. त्यांनी यासंदर्भात अकाली दल, शिवसेना या सर्व घटक पक्षांशी चर्चा केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत भाजपच्या किमान 80 ते 90 जागा कमी होतील, असा अंदाज प्रशांत किशोर यांच्यातर्फे वर्तविला जात असल्याचे समजते. त्यांच्या नव-सिद्धांतानुसार संयुक्त जनता दल, शिवसेना, अकाली दल, अण्णा द्रमुक, तेलंगण राष्ट्रसमिती, वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल यांचा गट स्थापन करायचा. या गटाला शंभरच्या आसपास जागा मिळाल्यास या गटातर्फे नितीशकुमार यांच्यासारख्या नेत्याचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करायचे किंवा या गटासाठी भाजपकडून जास्तीत जास्त राजकीय लाभ उठविण्यासाठी "बार्गेनिंग पॉवर' म्हणजेच "दबाव गट' स्थापन करावयाचा. केवळ सैद्धांतिक पातळीवरील या पुस्तकी कल्पनेचा पाठपुरावा "पीके' करीत आहेत. यामध्येदेखील सुप्त असा भाजपविरोध आणि महानायक-विरोध दडलेला आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीला समांतर अशा या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

वरील राजकीय शक्‍यता विचारात घेता निवडणुकीपूर्वीचे आणि निकालांनंतरचे राजकीय मुद्दे बदलू शकतात आणि त्यानुसार राजकीय समीकरणेही बदलू शकतात. अतिशय तरल राजकीय परिस्थितीच्या दिशेने भारतीय राजकारणाची वाटचाल सुरू आहे. विविध तज्ज्ञांनी वर्तमान स्थितीच्या आधारे व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी निवडणुकीत भाजपच्या संख्याबळात घट होण्याची शक्‍यता आहे. निश्‍चित किती संख्या कमी होईल याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. परंतु, प्रामुख्याने हिंदीभाषक प्रदेशातच भाजपच्या जागा घटणार आहेत आणि ती देशाच्या अन्य राज्यांतून भरून काढण्याची धडपड पक्षातर्फे सुरू आहे. म्हणजेच ही तज्ज्ञ मंडळी भाजपचे त्यांच्या मित्रपक्षांवरील परावलंबित्व वाढण्याची शक्‍यता सूचित करीत आहेत. कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीमध्येही याहून वेगळी स्थिती नाही.

कॉंग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय स्वरूपाचे पक्ष मानले जातात. परंतु, या पक्षांनी विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी आघाडी केलेली आहे. आता हे पक्ष प्रबळ झाले आहेत व त्यातून राष्ट्रीय पक्षांचे या प्रादेशिक शक्तींवरील परावलंबित्व वाढल्याने तरल म्हणजेच काहीशा अस्थिर व अनिश्‍चित राजकीय स्थितीची शक्‍यता वाढत चालली आहे. घोडामैदान जवळच आहे !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Current Political Situations