कोलकाता कॉलिंग ! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019


चित्त जेथा भोयशून्यो उच्छो जेथा शिर 
ग्यॅन जेथा मुक्‍तो, जेथा ग्रिहेर प्राचीर 
आपोनो प्रानगोनतोले देबोशोशोर्बोरी 
बोशुधारे राखेनाय खोंडो खुद्रो कोरी 

....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (पक्षी : मन) उचंबळले होते. डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहात होते. अंगावर रोमांच उभे राहिले होते... 

लाखोंचा जनसमुदाय आणि शेकडो नेत्यांची ती मांदियाळी आमच्या नेत्रांची धणी तृप्त करीत होते. मिटमिट्या डोळ्यांनी आम्ही इकडे तिकडे पाहात होतो. मनात आले, एकाच वेळी इतके नेते आणि इतके कार्यकर्ते एकाच ठिकाणी बघायला मिळत नाहीत. -म्हंजे हल्ली हल्ली मिळत नाहीत! "एकच नेता आणि बाकी सारे भक्‍त' हे (गुजरात) मॉडेल आता नाही म्हटले तरी जुने झाले आहे. आता बदलायला हवे. दिवस सुपर मार्केटचे आहेत. चार जिन्नसांसाठी चार दुकानांत हिंडण्याचे दिवस गेले. इथे तर एकाच दुकानात सारी खरेदी झाल्याचे समाधान आमच्या मुखावरून रोशोगुल्ल्याच्या पाकासारखे ओघळत होते. 

"नोमोश्‍कार!,'' पाठीमागून आवाज आल्याने आम्ही चमकून वळून पाहिले. हात जोडून साक्षात ममतादी उभ्या होत्या. ममतादी नेहमी रागावलेल्या असतात. कध्धी कध्धी म्हणून हसत नाहीत. पण आज हसत होत्या. आम्हीही आजवर खाल्लेल्या पानतंबाखूला जागून ओठ आवळत हसलो. 

"बोशुन बोशुन!'' त्यांनी आर्जवाने सांगितले. बोशुन बोशुन म्हणजे (बंगाली भाषेत) बसा, बसा! खाली हांतरलेल्या जाजमावर आम्ही बसकण मारली. 
""उठून उठून!'' त्या गडबडीने म्हणाल्या. आम्ही गडबडून उठून उभे राहिलो. आता काय नवीन? 

"हे जाजम पंतप्रधानपदाच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. तुम्ही पलीकडे मैदानात बोशुन घ्या!'' त्यांनी खुलासा केला. जाजमावर बरीच माणसं बसली होती. त्यातल्या एक-दोघांकडे ढोलकी, बाजा अशी वाजंत्रीही होती. आम्हाला वाटले की रंगमंचाच्या विंगेकडे वाजंत्रीवाल्यांची बैठक घालतात, तसे काहीसे असेल. पण नाही! ढोलकीच्या गळ्याचा मालक थोडासा शत्रुघ्न सिन्हांसारखा दिसत होता आणि बाजावर यशवंत सिन्हांची झुळझुळीत बोटे फिरत होती. आम्ही तेथून निमूटपणे उठलो. 

तब्बल पंचवीस नेते आणि त्यांचे उपनेते, काही स्वयंभू नेते आणि काही नुसतेच नेते ह्यांचा कळपच्या कळप मंचावर उपस्थित होता. पहिल्या वक्‍त्याने सभा सुरू केल्यानंतर मंचावर उपस्थित नेत्यांची नावे घेण्यास सुरवात केली. दीडेक तासाने तो पाणी पिण्यासाठी थांबला. नेत्यांची यादी अजूनही अपूर्णच होती. शेवटी ममतादींनी ध्वनीक्षेपक हातात घेऊन सूत्रसंचालनाची सूत्रे स्वीकारली. आम्हाला आपोआप आमचे मित्र सुधीर गाडगीळ ह्यांची आठवण आली. वाटले, आमच्या महाराष्ट्रात हे काम गाडगीळांचे असते. असो. 

"कुठल्याही परिस्थितीत देश वाचवलाच पाहिजे' ह्या मतावर सर्वांचे एकमत होते. आम्हीही त्याला अनुमोदन दिले. देश वाचवण्यासाठी इतके लोक जमल्यावर आता देश वाचल्याशिवाय राहात नाही, ह्या भावनेने आम्ही अंतर्बाह्य निश्‍चिंत आणि निर्भय झालो. 

काही नेते तामीळ भाषेत बोलले. आम्ही टाळ्या वाजवल्या. काही बंगालीत बोलले. त्यालाही टाळ्या वाजवल्या. मुद्दा देश वाचवण्याचा होता. भाषेचा नव्हे! भारताच्या भाषिक विविधतेचे अनेक आविष्कार दाखवल्यानंतर सभा संपली. 

सभा संपल्यानंतर दिल्लीचे अरविंदस्वामी केजरीवाल आमच्या कानाला लागले. म्हणाले, ""बघा हं, हिटलरच्या ताब्यात द्यायचाय का देश? देश वाचवा हं का!'' पण त्यांनी मनात घातलेली भीती आम्ही झुगारून देत "चित्त जेथा भोयशून्य...चित्त जिथे भयशून्य, उंच जिथे शिर...' हे रोबिंद्रगीत गुणगुणत निघालो, कारण आम्ही खरोखरच भोयशून्य झालो होतो. 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Dhing Tang