esakal | डर अच्छा है! (ढिंग टांग!)
sakal

बोलून बातमी शोधा

डर अच्छा है! (ढिंग टांग!)

"डर अच्छा होता है. जो डर किसी को भ्रष्टाचार करने के लिए रोंकता हैं तो, वो डर अच्छाही है...'' आम्हाला तंतोतंत पटले. 
""जो डर हमकू डरानेवालों को डराता है, वो डर अच्छा होता है...'' हेही आम्हाला तंतोतंत पटले. 

डर अच्छा है! (ढिंग टांग!)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

"नया भारत नीडर, निर्भीक अने निर्णायक छे...सांभळ्यो?'' आमचे तारणहार (आमचे काय, सर्वांचेच!) श्रीमान नमोजी ह्यांनी अभिमानाने सांगितले, आणि आम्ही एकदम सांभळलो. छाती फुगून आली. नजरेत आत्मविश्‍वास तरळला. पायात बळ आले. पण हा इफेक्‍ट जेमतेम तीनेक मिनिटेच टिकला. तीन मिनिटांनंतर आम्ही पुन्हा मूळ अवस्थेत आलो. नव्या भारताचे सध्या हे असे झाले आहे, हे आम्हाला माहीतच नव्हते. 
""काय झालं नव्या भारताला?'' आम्ही उत्सुकतेने विचारले. 

"काय झ्याला? अरे, गधेडा, नवा भारत कुणालाज डरत नाय ने गिनत नाय! ज्यादा आवाज केला ने तो पछी-,'' नमोजींनी डोळे गरागरा फिरवत आम्हाला हातवारे करुन सौम्य भाषेत तंबी दिली. त्या हातवाऱ्यांचा अर्थ लागला नाही. पण जादा आवाज केल्यास काहीतरी भयंकर घडू शकेल, एवढे कळले. नव्या भारताचे हे रूप आम्हाला एकदम नवीन होते व आहे. इतकी वर्षे आपण उगीच डरपोक आणि बेंबट्यासारखी काढली ह्याचे भारी वाईट वाटले. "निर्णय न लेना भी एक निर्णय होता है' हे सुभाषित ऐकून ऐकून आमचा पिंड तयार झालेला. आता एकदम निर्भीड जगायचे म्हटले की थोडे जड जाणारच.

तसे पाहू गेल्यास आम्ही पापभीरूटाइपचे आहोत. भय ही एक आदिम भावना असून त्यायोगे मानवाचे संरक्षण आणि विकास झाला आहे, हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकू. कां की आम्ही झुरळासदेखील घाबरतो. झुरळाचे भय वाटल्याने आम्ही सदोदित सुसज्ज व सावध असतो. भयाच्या पुढे विजय असतो, असे एक सुभाषित आम्हाला तोंडपाठ आहे. ते आम्ही एका शीतपेयाच्या बाटलीवर पहिल्यांदा वाचले होते. असो. 
""नव्या भारतमधला हरेक माणस एक सोल्जर हाय...सांभळ्यो के?'' नमोजींनी आमचे बखोट खेचून बजावले. आम्ही "हो' म्हटले खरे पण...

"आम्ही कसले सोल्जर? अजून साधं आमलेट खायला जमलं नाही आम्हाला!'' आम्ही संकोचाने म्हणालो. 
""तुमी डरपोक हाय के?'' नमोजींनी विचारले. आम्ही होकारार्थी मान डोलावली. काय करणार? जे आहे ते आहे!! 
""डरना अच्छा होता है!'' आमच्या (पडेल) खांद्यावर हात ठेवून नमोजींनी आम्हाला दिलासा दिला.

"खरंच?'' सद्‌गदित होत्साते आम्ही विचारले. डरना अच्छा असेल तर आम्ही घरी आलेल्या उंदरास हुसकावण्याची जिम्मेदारी अभिमानाने झटकू शकू, असा एक स्वार्थी विचार मनात तरळला. आगांतुक आलेल्या उंदरास हुसकावण्यासाठी आम्हाला खूप कष्ट पडतात. ती एक झुरळापेक्षाही विदारक अशी वेगळीच ष्टोरी आहे. असो. 

"डर अच्छा होता है. जो डर किसी को भ्रष्टाचार करने के लिए रोंकता हैं तो, वो डर अच्छाही है...'' आम्हाला तंतोतंत पटले. 
""जो डर हमकू डरानेवालों को डराता है, वो डर अच्छा होता है...'' हेही आम्हाला तंतोतंत पटले. 
""जो डर अपने देशवासीयों को विकास के रास्ते से बहकानेवालों को डराता है, वो डर अच्छा है...'' हेही आम्हाला डिट्‌टो पटले. थोड्या वेळाने आम्हाला शब्दांची सरमिसळ होऊन फक्‍त "डराव डराव' एवढेच ऐकू येऊ लागले. डराव डराव ध्वनीमुळे आमची तंद्रा भंगली. कारण आम्ही झुरळे, पाली, उंदीर ह्यांप्रमाणेच बेडकालाही घाबरतो!! 

शतप्रतिशत नमन करून आम्ही "शूर अम्हि सरदार अम्हाला, काय कुणाची भीती?' हे गाणे गुणगुणतच तेथून निघालो. आम्ही आता नीडर, निर्भीक आणि निर्णायक आहो. समजले? 

- ब्रिटिश नंदी

loading image