लावणीचे सिंहासन रिते (श्रद्धांजली)

श्रीकांत कात्रे
बुधवार, 16 मे 2018

"चौकाची लावणी' सादर करणे ही यमुनाबाईंची खासीयत. बैठकीच्या लावणीत संगीत व शब्दांचा भाव, अदाकारी ही महत्त्वाची स्थाने. या लावणीच्या एकेका ओळीवर यमुनाबाईंची अदाकारी म्हणजे मूळ लावणीचा भावार्थ आपल्या पद्धतीने समोरच्या माणसाला पटविण्याची ताकद ठरली.

शब्दांना सूर, लय आणि ताल मिळाला की त्यात मन गुंतून जाते. यमुनाबाई वाईकर यांची लावणी अशाच ताकदीची होती. म्हणूनच त्यांचा आवाज आणि अदाकारीला भरभरून दाद मिळत गेली. सूर-तालांच्या संगतीत लावणी खुलते. यमुनाबाईंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून लावणी खुलविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली.

"रसिकांनी त्यांना "लावणीसम्राज्ञी' किताब कधीच बहाल करून टाकला होता. लोकप्रिय असूनही लावणी या कलाप्रकाराला प्रतिष्ठा नव्हती. ती मिळवून देण्याचे काम यमुनाबाईंनी केले. यमुना विक्रम जावळीकर हे त्यांचे मूळ नाव. अठराविश्व दारिद्य्र असलेल्या कोल्हाटी (डोंबारी) या समाजात दारिद्य्राच्या झळा सोसतच त्यांचा प्रवास सुरू झाला. लहानपणी डोंबाऱ्याचे खेळ करीत त्यांची गावोगावी भटकंती सुरू झाली. आई तुणतुणं वाजवायची आणि छोटी यमुना पायात चाळ बांधून नाचायची. ही कला सादर केल्यावर भिक्षा म्हणून मापटंभर जोंधळं, तांदूळ मिळायचे; पण कलेचे प्रेम आणि जिद्द असेल तर माणूस कुठच्या कुठे मजल मारू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. आईकडून त्यांना लावणी गाण्याचे व अदाकारीचे धडे मिळाले.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या लावणी सादर करू लागल्या. तमाशाचे कार्यक्रम करू लागल्या. मुंबईतील रंगू- गंगू सातारकर पार्टीत त्यांना काम मिळाले. या संगीत बारीत असताना त्यांनी आपल्या कानामनात लावणी साठवली. गाणं, नाच आणि भाव सादर करण्याची कला शिकल्या. फक्त 15व्या वर्षी त्यांनी स्वतःची "यमुना- हिरा- तारा' या नावाने संगीत पार्टी काढली. 

मुंबई गाजवली. महाराष्ट्रात सर्वदूर तमाशा थिएटरांतून कला सादर केली. प्राथमिक शास्त्रीय संगीताबरोबर गजल, ठुमरी त्या शिकल्या. संगीत नाटकांत कामे केली. लावणीच्या परंपरागत चालीत त्यांनी स्वतःचे रंग भरले. सुरेल आवाज व जोडीला अदाकारी यामुळे त्यांची लावणी खुलत गेली. "पंचकल्याणी घोडा अबलख', "तुम्ही माझे सावकार' या यमुनाबाईंच्या लावण्या अनेकांच्या ओठावर आल्या. 

"चौकाची लावणी' सादर करणे ही यमुनाबाईंची खासीयत. बैठकीच्या लावणीत संगीत व शब्दांचा भाव, अदाकारी ही महत्त्वाची स्थाने. या लावणीच्या एकेका ओळीवर यमुनाबाईंची अदाकारी म्हणजे मूळ लावणीचा भावार्थ आपल्या पद्धतीने समोरच्या माणसाला पटविण्याची ताकद ठरली.

1995 मध्ये संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी पटकावला. जे हात एकेकाळी भिक्षेसाठी पुढे येत होते, त्या हातांनी विविध पुरस्कार स्वीकारले. या क्षेत्रातील उच्च स्थान त्यांनी मिळवले; पण लावणीचा सूर सामान्य माणसासाठी असतो, हे त्या विसरल्या नाहीत. 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on lavniche Sinhasan rite