पुनर्वाचन

आसावरी काकडे
सोमवार, 21 मे 2018

ती म्हणते, "आठ आणे डझन. सुटी हवी तर दोन आण्याला तीन.' घासाघीस करण्याच्या पवित्र्यात नायक म्हणतो, "दो आने के तीन..? ना बाबा.. तीन आने के दो..' केळेवाली म्हणते, "फुकटचा माल आहे का? घ्यायची तर दोन आण्याला तीन घे. नाही तर चालायला लाग...' एक केळेवाली आणि गिऱ्हाईक यांच्यातला हा टिपिकल संवाद. 

आपल्याला रंग... रूप... स्वभाव... लकबी... सर्व आई-वडिलांकडून मिळतं. इतकंच काय विचार करण्याची शैलीही त्यांच्याकडून आपल्यात संक्रमित झालेली असते. यात आई- वडिलांइतकाच आपल्या भोवतीच्या सामाजिक स्थितीचा आणि ज्या काळात आपण जन्माला आलो त्या काळाचाही वाटा असतो. रूढ विचार-पद्धती ओलांडून सहसा विचार केला जात नाही... आपल्या विचारांना ठराविक, रूढ पद्धतीनं "चालायची' कशी सवय लागते ते एका ट्रेनिंग 

कोर्समध्ये मजेशीर रीतीनं समजलं. सरांनी एक अगदी सोपं गणित सोडवायला सांगितलं. सगळ्यांनी ते लगेच सोडवलं. मग त्याच फॉर्म्युल्यानं सुटतील अशी आणखी चार-पाच गणितं दिली गेली. तीही जरा आकडेमोड करून सगळ्यांनी पटकन सोडवली. नंतरचं गणित सोडवायला बराच वेळ लागायला लागला. फॉर्म्युला माहीत झाला असला, तरी आकडेमोड बरीच मोठी होत होती. पण एकानं पहिल्याइतकं लगेच उत्तर दिलं. सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं. त्याला विचारलं गेलं, की त्यानं कसं सोडवलं गणित इतक्‍या लवकर? त्यानं कसं ते सांगितलं. त्यानं फॉर्म्युला वापरलाच नव्हता. फक्त दोन आकड्यांचा गुणाकार केला होता ! 

उत्तर ऐकून सगळ्यांना हसू आलं. वाटलं, अरे खरंच की किती साधं होतं हे. आपण गरज नसताना उगीचच फॉर्म्युल्यात अडकलो. एकाच तऱ्हेनं सलग गणितं सोडवत गेल्यावर लगेच सगळ्यांना फॉर्म्युल्याची सवय झाली. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विसरून सगळे त्या साच्यात अडकले. रोजच्या जगण्यात आपलं असंच होतं. आपण बऱ्याच गोष्टी मागील पानावरून पुढे चालू ठेवतो. ठरलेल्या साच्यात विचार करतो.

माणसांकडेही स्वतंत्र व्यक्ती म्हणून न बघता त्यांच्या भूमिकेतच बघतो. रिक्षाचालक, दुकानदार, वॉचमन, भाजीवाले, पोलिस... अशा सगळ्यांना आपण त्या त्या वर्गात घालतो. त्यांच्याविषयी अनेकांच्या अनुभवांतून आलेला एक सामायिक ग्रह करून घेतो आणि त्यांच्याशी व्यवहार करताना या पूर्वग्रहातूनच वागतो. माणसं समजून घेताना पूर्वग्रहांच्या साच्यातून बाहेर येऊन स्वतंत्र विचार केला तर माणसं नव्यानं कळतात. 

कवितेतल्या प्रतिमांचा अर्थ आपण लावू, त्यानुसार कवितेच्या आशयाचा पैस बदलत जातो. कवितेतले शब्द तेच असतात. तरी प्रत्येक वाचनात कविता वेगळी होऊन जाते. कवितेसारखी प्रत्येक व्यक्ती, घटना, समस्या पुन्हा पुन्हा वाचावी. असं स्व-तंत्र "पुनर्वाचन' आपली समज सुंदर करणारं ठरू शकतं. या संदर्भात एका जुन्या हिंदी चित्रपटातला एक सीन आठवला. त्यात सुरवातीला गरीब नायक केळेवालीला केळ्यांचा दर विचारतो.

ती म्हणते, "आठ आणे डझन. सुटी हवी तर दोन आण्याला तीन.' घासाघीस करण्याच्या पवित्र्यात नायक म्हणतो, "दो आने के तीन..? ना बाबा.. तीन आने के दो..' केळेवाली म्हणते, "फुकटचा माल आहे का? घ्यायची तर दोन आण्याला तीन घे. नाही तर चालायला लाग...' एक केळेवाली आणि गिऱ्हाईक यांच्यातला हा टिपिकल संवाद. 

घासाघीस करावीच लागते... गिऱ्हाईक भाव पाडूनच मागणार... या पूर्वग्रहातून झालेला ! नायक निघून चालल्यावर तिच्या लक्षात येतं की "तीन आने के दो' म्हणजे जास्तच पैसे देतोय हा. येडाच दिसतोय म्हणत ती त्याला परत बोलावते आणि म्हणते, "तीन आने के दो पाहिजे ना, घे.' पण नायकाकडे प्रत्यक्षात पैसेच नसतात.

खिशात पैसे नाहीत म्हणून परत चाललेल्या नायकाला मग ती पैसे न घेताच दोन केळी देते. म्हणते, "पैसे दे नंतर.' गोंधळून तो म्हणतो, "पण मी पैसे दिलेच नाहीत तर?' त्याच्याकडं प्रेमानं बघत ती म्हणते, "समजेन माझ्या मुलानं खाल्ली.' फार निरागस होते आपापल्या भूमिकांमधून बाहेर येऊन माणूस झालेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव ! 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on rereading Asavari Kakade