उत्तमतेचा ध्यास (नाममुद्रा)

भक्ती परब
सोमवार, 21 मे 2018

शिष्यवृत्ती कार्यक्रम, चित्रप्रदर्शने आणि इतर माध्यमांतून कलेला, कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे हे हक्काचे व्यासपीठ. त्यावर कला क्षेत्रात स्वयंतेजाने प्रकाशमान असणाऱ्या उत्तम पाचारणे या मराठमोळ्या कलावंताची निवड होणे ही अभिमानाची बाब! राजधानीतील कलेच्या दरबारात महाराष्ट्राची मान यामुळे उंचावली आहे.

प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार उत्तम पाचारणे यांची "ललित कला अकादमी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी "एफटीआय'च्या संचालकपदावरून झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर एका सच्च्या कलावंताची अकादमीच्या अध्यक्षपदी झालेली ही निवड सकारात्मकतेवरचा, उत्तमतेवरचा विश्‍वास पुनःस्थापित होण्यासाठी उपयुक्त ठरते. नवी दिल्लीची "ललित कला अकादमी' भारतीय कलांना देशात आणि परदेशात प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असते. 

शिष्यवृत्ती कार्यक्रम, चित्रप्रदर्शने आणि इतर माध्यमांतून कलेला, कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे हे हक्काचे व्यासपीठ. त्यावर कला क्षेत्रात स्वयंतेजाने प्रकाशमान असणाऱ्या उत्तम पाचारणे या मराठमोळ्या कलावंताची निवड होणे ही अभिमानाची बाब! राजधानीतील कलेच्या दरबारात महाराष्ट्राची मान यामुळे उंचावली आहे. अंदमान येथील स्वातंत्र्यज्योतीची प्रतिकृती, विधानसभेतला शाहू महाराजांचा पुतळा, बोरिवली येथील सावरकरांचा पुतळा, दहिसर येथील शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारखी त्यांनी साकारलेली शिल्पे त्यांच्या कलाजाणिवेची प्रचिती देतात. त्यांचा उल्लेख भारतातील आघाडीच्या शिल्पकारांमध्ये होतो. चित्र, शिल्प अशा कलांमध्ये रमलेल्यांना प्रशासनासारख्या काहीशा गद्य कामांमध्ये रस नसतो, असे आढळते. पण पाचारणे मात्र याला अपवाद आहेत. त्यांना प्रशासनाचाही उत्तम अनुभव आहे. 

सर जे जे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून कलेची पदवी घेतलेल्या पाचारणे यांनी यापूर्वीही कलाक्षेत्रात विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते गोवा कला अकादमीचे सदस्य आणि सल्लागार समिती सदस्य, पु. ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आणि बोरिवली येथील जनसेवा सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

एक कलाकार म्हणून आणि एक प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी करणारे उत्तम पाचारणे "ललित कला अकादमी'चे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळतील आणि उत्तमतेची समृद्ध परंपरा जपतील, याविषयी शंका नाही. 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Uttamtecha Dhyas