प्रतिमांचा आविष्कार (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मला जळगावच्या मूस संग्रहालयातील कृष्णधवल चित्रांची आठवण झाली. हा चित्रकार म्हणजे गेल्या शतकातील नामवंत केकी मूस. तो टेबलावर माती, रेती, दगड यांच्या मदतीने दृश्‍य तयार करीत असे व त्याचे फोटो काढीत असे.

पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळा रंग किंवा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग या दोन्हींचं सौंदर्य भावतं. आज नवनवीन शोधांमुळे रंगांची उधळण सर्वदूर वाढली आहे. मधल्या काळात घराला रंग द्यायला म्हणून रंगांच्या दुकानात गेलो होतो, तिथं विक्रेत्याने संगणकासमोर बसवलं आणि म्हणाला, ""आम्ही एक लाख प्रकारच्या रंगांच्या छटा देऊ शकतो. संगणकावर बघा व निवडा. आम्ही तसा रंग बनवून देऊ.'' शाळा-कॉलेजमध्ये असताना काळ्या क्रेयॉनने चित्रं काढली होती, त्यामुळे असेल पण पांढऱ्यावरची काळी व काळ्यावरची पांढरी चित्रं अजूनही मला भावतात. 

परवा एका चित्रप्रदर्शनाला गेलो होतो. कलाकार होता माझा मित्र डॉ. प्रमोद कोलवाडकर. जुन्या काळाचा क्ष-किरणतज्ज्ञ. प्रमोद व्यवसायाने क्ष-किरणतज्ज्ञ असला, तरी एक रसिक त्याच्या अंतरंगात दडला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत त्याची हजेरी निश्‍चित असे. त्याने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये क्ष-किरणशास्त्रावर व्याख्यानं दिली होती व प्रबंध सादर केले होते. त्याचबरोबर व्यवसायातील अनुभवांवर कथाही लिहिल्या होत्या.

पण, याच काळात त्याने काही वेगळे प्रयोग केले होते. त्याचा शोध या प्रदर्शनाच्या निमित्ताने लागला. त्याने क्ष-किरणांचा वापर मानवी शरीराव्यतिरिक्त पानं, फुलं, शंख, मासे आणि इतर सजीव व निर्जीव वस्तूंवर करून कृष्णधवल रंगात प्रतिमा तयार केल्या होत्या. त्याच्या फोटोंचं हे प्रदर्शन होतं. गेल्या 40 वर्षांमध्ये केलेल्या प्रतिमांमधील निवडक 15 प्रतिमांचा खजिना त्याने या प्रदर्शनाद्वारे रसिकांसमोर सादर केला होता.

मला जळगावच्या मूस संग्रहालयातील कृष्णधवल चित्रांची आठवण झाली. हा चित्रकार म्हणजे गेल्या शतकातील नामवंत केकी मूस. तो टेबलावर माती, रेती, दगड यांच्या मदतीने दृश्‍य तयार करीत असे व त्याचे फोटो काढीत असे. त्या काळातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची अशी चित्रं प्रदर्शनात होती. एखादा धबधबा किंवा हिमालयातील बर्फाच्छादित शिखर असो; ते फोटो इतके हुबेहूब असत, की ते त्या पर्यटनस्थळाचं चित्र आहे, असा संभ्रम पडावा.

कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार दाखवण्यासाठी विविध माध्यमं व साधनं हवी असतात. काही कलाकार प्रचलित माध्यमांचा व उपलब्ध साहित्याचा उपयोग करतात, तर काही वेगवेगळ्या माध्यमांचा व साहित्याचा उपयोग करतात. प्रमोदने असंच वेगळं माध्यम निवडलं. निदान भारतात तरी क्ष-किरणांच्या मदतीने कुणी चित्रं काढलेली नाहीत व प्रदर्शन भरवलेलं नाही.

वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतर बहुतेकांचा उत्साह कमी झालेला असतो; पण प्रमोदची ऊर्मी आजही कायम आहे. आयुष्याच्या शेवटच्या इनिंग्जमध्ये त्याने स्वतःमधला लेखक व कलाकार जागृत ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी यावरून बोध घ्यावा असा हा मित्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Pahatpaval