समाजऋण (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे 
सोमवार, 25 मार्च 2019

बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो.

बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो. यातील पुष्कळशी मंडळी आपल्या मिळकतीचा काही हिस्सा कुटुंबीयांसाठी मायदेशी पाठवतात. यातल्या काही मंडळींना भारतात येणं शक्‍य नाही; पण देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. काही लोकांकडून आपलं 

शिक्षण ज्या संस्थेत झालं, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तींच्या स्वरूपात पैसे वा साधनांच्या स्वरूपात मदत दिली जाते. परवा फैज वाहिद या तरुणाची भेट झाली. तो अशाच काही तरुणांसारखा. मायभूमीसाठी काही करण्याच्या मानसिकतेचा. तो काही काळ बाहेरदेशी राहून आलेला; पण नेहमीसाठी परत आला आहे. "नागपूर फर्स्ट' या संस्थेचा तो सचिव आहे. "नागपूर ग्लोबल सिटी बाय 2020' असा या संस्थेचा कार्यक्रम आहे. 2003 मध्ये अमेरिकास्थित दिनेश जैन या तरुणाच्या मनात आपल्या शहरासाठी काही करावं असा विचार आला. मूळचा नागपूरवासी असलेला हा तरुण जपान व अमेरिकेत नोकरी करून अमेरिकेत स्थायिक झाला होता. सचिन जागीरदार, निनाद सोमलवार व शशांक राव, तनवीर मिर्झा, मिर्झा, कीर्ती शाह, ऋषी सराफ, श्‍वेता सिंग या व इतर मित्रांसोबत विचारविनियमय करून "नागपूर प्लस' हा व्हॉट्‌सऍप ग्रुप त्यानं तयार केला. त्यावर पुरेसा प्रतिसाद मिळाल्यावर 2008 मध्ये संस्थेची स्थापना केली. 2009 मध्ये फैज अमेरिकेत गेला असताना दिनेश जैन यांच्याशी त्याची भेट झाली. भारतात परत आल्यावर फैजने या संस्थेत रस घ्यायला सुरवात केली. 2012 पासून परदेशी स्थायिक असूनही नागपूरसाठी काही करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दरवर्षी परिषद आयोजित केली जाते.

"Give back to city' असं या संस्थेचं ब्रीदवाक्‍य आहे. शहरासाठी काय करता येईल, याबद्दल परिषदेत विचारमंथन होतं. काही स्थानिक संस्थांची मदत घेऊन विविध कार्यक्रम राबवले जातात. अशाच एका उपक्रमात नागपूरमधील सोमलवार शाळेतील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील "नासा'मध्ये पाठविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. "हरित नागपूर' चळवळीचा भाग म्हणून त्यांनी सुमारे सात हजार वृक्षांची लागवड केली आहे.

जगातील काही मोठ्या शहरांना "नागपूर-मित्र शहरे' म्हणून जोडून सहकार्याने कार्यक्रम राबविले जातात. स्वत: सुबत्तेमध्ये जीवन जगताना आपल्या कुटुंबाच्या पलीकडचा विचार करणं, आपल्या मातृभूमीची आठवण ठेवणं, ज्या शहरानं आपल्याला मोठं केलं, त्या शहराला मोठं करण्याचा विचार करणं हे समाजऋणाची परतफेड करणं आहे. अशा सुहृदांची संख्या वाढली तर भारतातील सगळी शहरं व परिणामी सगळा देश "सुजलाम्‌ सुफलाम्‌' व्हायला निश्‍चितच मदत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Pahatpaval