पहाटपावलं : ऐशा कळवळ्याच्या जाती

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 20 मे 2019

नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात.

नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या विचारानं काही मंडळी अंगणात, गच्चीवर पाण्याची भांडी ठेवतात.

माझे मित्र तन्वीर मिर्झा यांनी तर छोटी लाकडी घरटी तयार केली, ज्यात चिमण्या घरकुल थाटतील. बाजूला दाणे व पाणी ठेवायला छोटी भांडी, असं हे घरकुल सुबक, सुंदर आहे. यंदा तर शालेय मुलांसाठी त्यांनी अशी घरटी बनवण्याचं शिबिर घेतलं व त्यांनी तयार केलेली घरटी त्यांना देऊन टाकली. लहान मुलांमध्ये हा कळवळ्याचा संस्कार पेरण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. 

अशीच एक व्यक्ती जतिंदरसिंग पाल. त्यानं आगळीवेगळी रुग्णवाहिका तयार केली आहे व ती घेऊन तो नागपूर परिसरात फिरतो. ही रुग्णवाहिका वृक्षवल्लींसाठी आहे. कुठे खुरटलेलं झाड दिसलं, पाण्याअभावी सुकणारं झाड दिसलं, तर तो जमेल तसा इलाज जागीच करतो. स्वत: वृक्षारोपण करतो आणि इतरांनी लावलेली झाडंही जगवतो. जमेल तिथे जागोजागी पाणी देतो किंवा ते झाड रुग्णवाहिकेतून घरी घेऊन येतो आणि ते जगविण्यासाठी उपचार करतो. ही भूतदया कौतुकास्पद नाही, असं कोण म्हणेल?

अमरावतीमधील एक सद्‌गृहस्थ मोटारसायकलवर पाण्याचे मोठे प्लॅस्टिक जग घेऊन फिरतात व पांथस्थांची क्षुधाशांती करतात. यात कुठलाही बडेजाव नाही. फक्त आतून असलेली भूतदयेची ऊर्मी शमविण्यासाठी हा उपक्रम आहे. नागपुरातही एक गृहस्थ आहेत. त्यांचं नाव अशोक खंडेलवाल. 2016च्या उन्हाळ्यापासून त्यांनी एक उपक्रम सुरू केला वाहतूक पोलिसांसाठी. नागपुरातला उन्हाळा, त्यात चौकाचौकांत उभं राहून वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस असतात.

तळपणारा सूर्य व उन्हाने तापलेले रस्ते, अशा स्थितीत घाम पुसत आपलं कर्तव्य निभावणाऱ्या हवालदारांबद्दल त्यांना कणव आली. नागपुरातील बारा चौकांमधील वाहतूक पोलिसांना खंडेलवाल थंडगार पन्हं पाजून त्यांची तहान भागवतात. एकदा दुपारी बारा वाजता 45 अंश तापमानात एका महिला हवालदार कार्यरत असल्याचं पाहून त्यांचं मन द्रवलं आणि त्यातून त्यांना ही कल्पना सुचली. त्यांची पत्नी पौर्णिमा, सोहम, साईशा व अंश ही नातवंडंही पन्हं बनविण्यात त्यांना मदत करतात. 

अशा या व्यक्ती कुठलीही अपेक्षा न ठेवता भूतमात्रांची सेवा करतात. त्यांना पैशाची हाव नाही, प्रसिद्धीची अपेक्षा नाही. श्रीरामाच्या खारीसारखं यांचं व यांच्यासारख्या अनेकांचं कार्य मोठं नसेल; पण निश्‍चितच प्रेरणादायी आहे आणि माणुसकीवरील विश्‍वास वाढवणारं आहे. 
ऐशा कळवळ्याच्या जाती। 
लाभाविण करिती प्रीती।। 
हे संतवचन किती सार्थ आहे, असं यांच्याकडे पाहून वाटतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on PahatPawal