बदलावा लागेल गुगल मॅप अन्‌ दिशादर्शन प्रणाली (सायटेक)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पृथ्वीचे ध्रुव :

- भौगोलीक परिस्थितीचा अभ्यास करून निश्‍चित केलेला भौगोलीक ध्रुव. 
- उपलब्ध चुंबकीय माहितीच्या आधारे गणिती प्रक्रिया करून निश्‍चित केलेला भू-चुंबकीय ध्रुव. 
- चुंबकीय बलाच्या मापनातून निश्‍चित केलेला चुंबकीय ध्रुव. 

पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांत बदल होत आहे. हा बदल अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने होत आहे. त्यातही चुंबकीय उत्तर ध्रुव अधिक वेगाने सरकत आहे. उत्तर ध्रुवाच्या स्थितीबाबतची घोषणा शास्त्रज्ञ दर पाच वर्षांनी करत असतात. या वेळी मात्र एक वर्ष आधीच त्याची दखल शास्त्रज्ञांना घ्यावी लागली. या बदलामुळे जीपीएस आधारित प्रणालींमध्ये बदल करावे लागतील. 

जगाच्या पाठीवर विस्मयकारक बदल होत आहेत. पृथ्वीचा चुंबकीय उत्तरध्रुव वेगाने कॅनडापासून सैबेरियाकडे सरकत आहे. बदलाचा हा वेग दरवर्षी 55 किलोमीटर एवढा आहे. "नेचर' या जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतचे सविस्तर संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. टोकियो येथील आंतरराष्ट्रीय भू-चुंबकीय माहिती संकलन केंद्राच्या "जागतिक चुंबकीय प्रणाली' अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. जगातील सर्व दिशादर्शक प्रणाली पृथ्वीच्या चुंबकीय केंद्राच्या स्थानावरून निश्‍चित केल्या जातात. चुंबकीय ध्रुवाच्या स्थानामध्ये अचानक झालेल्या या मोठ्या बदलामुळे जहाजांच्या दिशादर्शक प्रणालीपासून ते "गुगल मॅप'पर्यंत जीपीएसवर आधारित प्रणांलींत मोठे बदल करावे लागतील. चुंबकीय उत्तर ध्रुव वेगाने सरकत असला तरी दक्षिण ध्रुव मात्र फारसा सरकलेला नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 

पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाच्या स्थानात सातत्याने बदल होत असतो. परंतु, गेल्या शंभर वर्षांत चुंबकीय ध्रुव ज्या वेगाने सरकला त्यापेक्षा जास्त वेगाने तो गेल्या वीस वर्षांत सरकला आहे. ""भू-गर्भातील लाव्हारसाच्या फिरण्याच्या गतीमधील बदलामुळे पृथ्वीच्या चुंबकीय केंद्रात सातत्याने बदल होत असतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून होणारा बदल लक्षणीय आहे. या बदलाचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होणार नाही. परंतु, वैज्ञानिक उपकरणांत यांच्यात मात्र आवश्‍यक ते बदल करावे लागतील,'' अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भू-विज्ञान विभागाचे प्रा. डॉ. सतीष सांगोडे यांनी दिली. 

जगाची भू-चुंबकीय प्रणाली 2015 मध्ये अद्ययावत करण्यात आली होती. आता ती 2020मध्ये बदलणे अपेक्षित होते. परंतु 2018 च्या सुरवातीपासून या प्रणालीत दोष वाढण्यास सुरवात झाली. याची दखल घेत ब्रिटिश वैज्ञानिकांनी पडताळणीला सुरवात केली असता चुंबकीय उत्तर ध्रुव मोठ्या प्रमाणात सरकत असल्याचे दिसून आले. चुंबकीय ध्रुवाच्या स्थानामधील या बदलाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. आता सर्व चुंबकीय प्रणालींमध्ये बदल करून प्रत्यक्ष त्याचा वापर सुरू होण्यास वर्षभराचा कालावधी लागू शकतो. 

पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव यापूर्वी अनेकदा बदलले आहेत. यापूर्वी सात लाख 80 हजार वर्षांपूर्वी हे चुंबकीय ध्रुव पूर्णपणे बदलले गेले होते. गेल्या 8.3 कोटी वर्षांत 183 वेळा चुंबकीय ध्रुवांनी एकमेकांची जागा घेतली आहे. 

ध्रुवीय बदलामुळे होणारे गैरसमज : 

चुंबकीय ध्रुवाच्या बदलामुळे पृथ्वीवर मोठ्या नैसर्गिक आपत्ती येऊन मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीचे स्थलांतर होईल, असा गैरसमज आहे. या नैसर्गिक बदलामुळे सामान्य माणसावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. या प्रकारच्या आपत्ती चुंबकीय बलाच्या कमी होणाऱ्या शक्तीमुळे होतात तसेच हा बदल दीर्घकालीन असू शकतो. 

पृथ्वीचे ध्रुव :

- भौगोलीक परिस्थितीचा अभ्यास करून निश्‍चित केलेला भौगोलीक ध्रुव. 
- उपलब्ध चुंबकीय माहितीच्या आधारे गणिती प्रक्रिया करून निश्‍चित केलेला भू-चुंबकीय ध्रुव. 
- चुंबकीय बलाच्या मापनातून निश्‍चित केलेला चुंबकीय ध्रुव. 

विस्मयकारक चुंबकीय ध्रुव : 

- संबंधित कालखंडातील खडकाच्या अध्ययनावरून तसेच वर्तमानात चुंबकीय दिशादर्शकाच्या सहाय्याने चुंबकीय ध्रुवाचे स्थान निश्‍चित करता येते. 
- जेम्स क्‍लार्क यांनी प्रथम 1831 मध्ये चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान शोधले. तेव्हा तो कॅनडियन आर्क्‍टिक समुद्रात होता. 
- 1990 च्या मध्यात चुंबकीय ध्रुवाचा सरकण्याचा वेग 15 किलोमीटर प्रतिवर्ष होता. सध्या तो प्रतिवर्षी 55 किलोमीटरपर्यंत वाढला आहे. 
- 2001 मध्ये आर्क्‍टिक समुद्र चुंबकीय ध्रुवाने ओलांडला. तर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडत सैबेरियाच्या दिशेने प्रवास सुरू केला. 
- चुंबकीय दक्षिण धृवाचे स्थानही काही प्रमाणात बदलत असते. परंतु, जगाचा बहुतांश भूखंड उत्तर गोलार्धात असल्यामुळे दक्षिण धृवाचा कमी अभ्यास होतो. 

चुंबकीय ध्रुवाच्या बदलामुळे होणारे परिणाम :

- विमाने, समुद्रातील जहाजे यांच्या चुंबकीय दिशादर्शक प्रणालीत बदल. 
- "गुगल मॅप' सारख्या इंटरनेट वरील स्थान निश्‍चित करणाऱ्या प्रणालीत समस्या. 
- पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या वापरावर आधारित उपकरणे, संशोधन प्रणाली यांच्या समस्यांमध्ये वाढ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Sci Tech