#यूथटॉक नजरेतून निसटणारं वास्तव

#यूथटॉक नजरेतून निसटणारं वास्तव

आज आपण ज्या काळात जगतो आहोत, तो काळ आपल्या मनाची शकलं करणारा- शतखंडित काळ आहे. एकाच वेळेला आपली भावनिक, मानसिक, शारीरिक गुंतवणूक ही अनेक गोष्टींमध्ये झालेली आहे. आपण आपल्या जगण्याचं थोडं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला ते समजून येईल. आपण टीव्ही पाहताना मोबाइलवर व्हॉट्‌सॅपिंग करतो, व्हॉट्‌सॅपिंग करताना कौटुंबिक समस्यांचा विचार करतो, त्याच वेळी आपल्यासमोर कोणत्यातरी शॉपिंग फेस्टिव्हलची जाहिरात पॉप-अप होऊन येते नि आपण त्यात हरवून जातो न्‌ जातो, तोच टीव्हीतून चिथावणी देणारे शब्द आपल्या मेंदूवर येऊन आदळतात...

थोडक्‍यात, आपल्याला आपलं ध्यान एकाच वेळी अनेक ठिकाणी गुंतवून ठेवण्याचा अट्टहास करत बसावा लागतो आणि त्यातूनच आपलं मन, पर्यायाने आपलं व्यक्तिमत्त्व, आपली ओळख चिरफाळून गेली आहे. या सगळ्यांतून आपल्यासमोरचा काळ आणि आपल्याला दिसणारं वास्तव हे गुंतागुंतीचं झालेलं आहे. हे वास्तव एकसंध, एकमितीय आणि एकरेषीय राहिलेलं नाही. त्याला अनेक मिती आहेत. असे बहुमिती वास्तव आपल्यावर दाब टाकत आहे. एकाच रेषेतून अनेक रेषांचे फाटे फुटत आहेत. परिणामी माझ्यासारख्या कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकासमोर हा काळ आणि हे वास्तव समजून घेणं कमालीचं गुंतागुंतीचं होऊन बसलं आहे. कारण माझ्यासमोर असलेलं वास्तव समजून घ्यायचा प्रयत्न करत असतानाच, झटक्‍यात ते वास्तव बदलून जातं आहे. परिणामी आपण ज्याला वास्तव म्हणतो आहोत, ती गोष्ट वास्तव म्हणून उरतच नाहीये, याचा पदोपदी अनुभव येतो आहे. कारण ती गोष्ट क्षणात एखाद्या चतुर व्हायरससारखी "म्यूटेट' होऊन जाते आहे. 

हे सगळं घडण्यामागे जागतिकीकरण, तंत्रज्ञानाची क्रांती आणि माहितीचा स्फोट, खुली अर्थव्यवस्था आणि या सगळ्याला प्रतिक्रिया म्हणून समोर येत असलेला संकुचिततावाद, मूलतत्त्ववाद अशी अनेकानेक कारणं सांगता येतील. एक लेखक म्हणून मी या कारणांची आपल्या परीने सतत मीमांसा करतो आहे, पण माझ्या पिढीसाठी एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती अशी की या गोष्टी टाळून किंवा त्यांना वळसा घालून आम्हाला पुढे जाता येणार नाही. आम्हाला या गोष्टींना भिडावं लागणार आहे. त्यामुळे आजचा लेखक म्हणून माझ्यापुढे या काळाचं संभाषित व्यक्त करताना अनेक प्रश्न आणि पेच उभे आहेत. ढोबळ वास्तवाच्या पलीकडे असलेले वास्तव आणि त्यातले अनेक स्तर-अत:स्तर समजून घेऊन ते मांडण्यासाठी मला ढोबळ वास्तववादी पद्धती सोडून नव्या पद्धतींचा शोध घेणं भाग आहे. 

दिसलेलं सत्य आपापल्या परीने मांडणं हे लेखकाचं काम असतं. त्यात मी कथा-कादंबरी लिहीत असल्याने माझ्यासमोर या अनेक वास्तवांचे, अनेक प्रकारच्या माणसांचे, म्हणजे मनांच्या विविध रचनांचे नि जडणघडणींचे नमुने असतात. त्याबद्दलची निरीक्षणं असतात. हे नमुने काळे-पांढरे अशा ढोबळ कप्प्यांत विभागून टाकता येत नाहीत. त्यात मला हे सगळं कल्पित साहित्यात म्हणजे "फिक्‍शन'मध्ये रूपांतरित करायचं असतं. म्हणजे श्‍याम मनोहरांच्या शब्दांत खोट्यातून खरं सांगायचं असतं. त्यातून मानवी जगण्याविषयी काहीएक भाष्य करायचं असतं वा अंतर्दृष्टी द्यायची असते. त्यासाठी मला माझी भाषिक कला-कौशल्यं, माझी वैचारिक घुसळण, चिंतन आणि माझी सगळी जडणघडण अशा सगळ्या गोष्टी पणाला लावाव्या लागणार असतात. ही जडणघडण मोडून नवी सुरवात करावी लागणार असते. थोडक्‍यात, पुन्हापुन्हा "मरावं' लागणार असतं. माझ्यासाठी ही एक रिस्क असते आणि लेखक म्हणून ही रिस्क घेणं अत्यावश्‍यक असतं. ही सगळी प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेली साहित्यकृती आजच्या अतिस्पर्धात्मक, "यशस्वी व्हा'चा धोशा असणाऱ्या जगात बिनकामाची आणि निरुपयोगी वाटू शकते.

पण मला असं ठामपणे वाटतं, की कथा-कादंबऱ्या आणि कविता असं सर्जनशील साहित्य वर-वर पाहता निरुपयोगी वाटत असलं, तरी ते आपल्या समाजमनाचं विरेचन करण्याचं, त्याला प्रगल्भता देण्याचं, सकारात्मक परिवर्तन करण्याचं आणि परस्परसामंजस्य रुजवण्याचं काम अत्यंत संथगतीनं करत असतं. ते "स्मार्ट' करत नसलं तरी "शहाणं' करत असतं. 

"माणसाचा मूल्यऱ्हास असाच होत राहिला, तर पुढच्या काही शतकांत पृथ्वी नष्ट होईल,' असं भाकीत अनेक शास्त्रज्ञ आणि विचारवंत करत आहेत. या पार्श्वभूमीवर, व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास, सर्जनशील लेखन हे पुढच्या काळात आत्यंतिक "उपयुक्त'च ठरेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com