मुकी बिचारी मुंबई (अग्रलेख)

मुकी बिचारी मुंबई (अग्रलेख)

अवघड प्रश्‍नांच्या सोप्या उत्तरांतच खूश होणारा, भावनांच्या हिंदोळ्यावर झुलण्यात रममाण झालेला समाज वास्तवापासून हळूहळू तुटत जातो. जात, धर्म, वंश, भाषा, अस्मिता अशा मुद्द्यांचा कैफ त्याला चढतो आणि मग हळूहळू आपल्या पायाखाली जे जळत असते, त्याचे चटके त्याला बसले तरी त्या जाणिवांच्या पलीकडे तो गेलेला असतो. असंख्य मुंबईकरांचे हे असे झाले आहे. हे शहर देशाची आर्थिक राजधानी असे बिरूद भलेही मिरवत असो; परंतु येथील जीवन मात्र केव्हाच अर्थशून्य झाले आहे. ऱ्हासकाळातील रोमन साम्राज्याची अवकळा या महानगराला आलेली आहे; पण त्याचेही कोणाला काहीही वाटेनासे झाले आहे. याला अपवाद असतो तो एखाद्या दुर्घटनेचा, भीषण आपत्तीचा. त्या वेळी मात्र हे शहर आणि येथील नागरिक हाती मेणबत्त्या घेऊन पेटून उठतात.

ते संतापतात, व्यवस्थेवरील राग व्यक्त करतात आणि कालांतराने थंड होतात. मुंबईत गुरुवारी झालेल्या पूल दुर्घटनेनंतर याहून वेगळे काही घडेल अशी शक्‍यता कमीच आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ रेल्वे पुलाशी संबंधित अशा पाच दुर्घटना घडल्यानंतरही जे शहर गप्प बसेल, ते आता प्रश्‍न विचारण्यास पुढे येईल असे कोणास वाटत असेल तर तो भ्रमच समजायला हवा. याचे कारण दडलेले आहे आगामी काळात. 

हा काळ आहे निवडणुकीचा. भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता पेटविण्याचा. धार्मिक मुद्दे भडकाविण्याचा. गेल्या काही दशकांत मुंबईत झालेल्या सर्व निवडणुकांनी हेच दाखवून दिले आहे, की मुंबईकरांना अशाच गोष्टींमध्ये कमालीचा रस असतो. ते अर्थातच सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी या दोघांच्याही फायद्याचे असते. एकदा का लोकांच्या भावनांना हात घातला, आपल्या जाहीरनाम्यांतून, भाषणांतून त्यांच्यापुढे स्वप्नांचे तुकडे फेकले, की मग लोक दैनंदिन समस्या विसरतात. त्यांना विसर पडतो, की या मुंबईची केव्हाच फाळणी झालेली आहे. येथे दोन मुंबई आहेत. एक "दक्षिण मुंबई' नामक अर्थसंस्कृतीची नगरी आहे आणि दुसरी मुंबई ही सामान्यांची, नव-चाकरमान्यांची आणि कष्टकऱ्यांची आहे. चाऱ्याच्या शोधात घाटावरून कोकणात आणि कोकणातून पुन्हा घाटावर ये-जा करणाऱ्या मेंढरांसारखी येथील माणसे झाली आहेत. त्यांचे कळपच्या कळप रोज लोकल गाडीने मुंबईत शिरतात. हा प्रवासही जीवघेणाच. गेल्या एका वर्षात या रेल्वे प्रवासाने 694 मुंबईकरांचा बळी घेतला आहे. रेल्वे रूळ ओलांडताना तब्बल एक हजार 476 जणांचा बळी गेला आहे. मुंबईतील प्रचंड गर्दी हे याचे कारण हे खरेच. तो एक मोठाच प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर विकेंद्रित औद्योगीकरणात आहे; पण ते तेथे शोधण्याऐवजी आमची राजकीय व्यवस्था परप्रांतीयांच्या लोंढ्याकडे बोट दाखविते.

अवघड प्रश्‍नांची सोपी उत्तरे आपल्यासमोर ठेवते. आपण त्यातच खूश होऊन खळ्ळखटॅक वगैरे करू लागतो आणि ही गर्दी आवरण्याऐवजी या शहराचा "उभा विकास' करण्यामागे राज्यकर्ते का लागले आहेत, असे प्रश्‍न विचारायचे विसरून जातो. मुंबईतील गर्दीचा प्रश्‍न आहेच. येथील लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा यांचे प्रमाण व्यस्त आहेच. अशा वेळी त्या सुविधांत वाढ करायची, आहे त्या सुविधा भक्कम करायच्या, की माणसे मरू द्यायची, हेही आपण विचारत नाही. गुरुवारची पूल दुर्घटना हा हे न विचारल्याचा परिणाम आहे. 

मुंबईकरच नव्हे, तर आपल्या सगळ्यांचाच व्यवस्थेला प्रश्‍न विचारणे म्हणजे काही तरी चूक करणे असा बहुधा समज झाला असावा; परंतु त्यामुळेच शासन आणि प्रशासन यांच्यात नागरिकांच्या उत्तम जीवन जगण्याच्या हक्कांप्रती प्रचंड बेपर्वाई निर्माण झालेली आहे. मुंबई महापालिकेच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला पूल कोसळून सहा जणांचा बळी जातो आणि त्यानंतर समोर येते की, सहा महिन्यांपूर्वीच या पुलाची संरचनात्मक तपासणी झाली होती आणि त्यात हा पूल भक्कम असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. याला भ्रष्टाचारयुक्त बेफिकिरीशिवाय अन्य नाव नाही. शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेतील कंत्राटदारांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आता सर्वांनाच माहीत आहेत. भाजपच्याच एका खासदाराने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यावरून भरपूर आरडाओरडा केला होता.

आता ते गप्प आहेत आणि सामान्य मुंबईकरांनाही त्या आरोपांबाबत विचार करण्यात रस नाही. तो पूल भक्कम असल्याचा निर्वाळा एक कंत्राटदार देऊ धजावला हा त्याचाच परिणाम. कारण सर्वांनाच माहीत आहे, की मुंबईकर बिचारे मुके आहेत. अगतिक आणि हतबल आहेत. कारण, त्यांनी आपली लोकशाहीदत्त शस्त्रे केव्हाच आपल्या सदनिकांच्या आणि झोपड्यांच्या भिंतीला टांगून ठेवली आहेत. ती शस्त्रे परजायची की पुन्हा एकदा भावनिक मुद्द्यांच्या हिंदोळ्यावर बसून झुलत राहायचे, हे मुंबईकरांनाच ठरवायचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com