उतरली तारकादळे..! (अग्रलेख)

उतरली तारकादळे..! (अग्रलेख)

"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे भारतीय "पब्लिक' हे सिनेमाचे जितके वेडे, तितकेच क्रिकेटचेही. त्यामुळे या राजकीय धुमश्‍चक्रीत क्रिकेट सितारेही मागे नाहीत.

तारकांची ही दळे खरोखर निवडून आली, तर येणाऱ्या सतराव्या लोकसभेचे चित्र एखाद्या फिल्मी ऍवॉर्ड सोहळ्यासारखे लखलखीत दिसू लागेल, असे भय वैचारिकांना वाटले नाही तरच नवल. संसदेच्या सभागृहाला ग्लॅमरस चेहरे नवे नाहीत. यापूर्वीही अनेक फिल्मी खासदार होऊन गेले. पण दुर्दैवाने हे नमूद करावे लागते, की काही अपवाद वगळता या बहुसंख्य सिताऱ्यांची संसदीय कामगिरी खचितच कौतुकास्पद नव्हती. तरीही ही स्टार पॉवर हल्ली दिवसेंदिवस शिरजोर होताना दिसते. हे नेमके कशाचे लक्षण मानायचे? 

राजकारणात आणि विशेषत: निवडणुकीच्या राजकारणातला मुरब्बी नेता क्‍वचितच गॉगल वगैरे लावून प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसेल, पण या तारेमंडळींचे तत्त्वचि वेगळे! उघड्या जीप किंवा सजविलेल्या टेम्पोवर स्वार होऊन भर उन्हात ही गॉगलधारी वलयांकित मंडळी हात हलवत आपल्या "चाहत्यां'चे अभिवादन स्वीकारत पुढे जाताना पाहिली की भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने "ग्लॅमरस' होत चालल्याचा साक्षात्कार होतो. देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची पोटतिडीक बघण्याजोगी वाटू लागते. सर्वच राजकीय पक्षांना हा "ग्लॅमर'चा घटक हवाहवासा वाटतो, कारण मतांचे गठ्ठे भराभर आपल्याकडे वळवण्याचा तो एक शॉर्टकट आहे. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पारडे अन्यांपेक्षा थोडे अधिक झगमगीत आहे, हे उघडच दिसते. 

पूर्वीच्या काळी राजकीय पक्ष थोडके पथ्य तरी पाळत असत. सुनील दत्त, नर्गिस, विनोद खन्ना आदी सिताऱ्यांनी एकदा खासदारकीचे वस्त्र मिळाल्यावर जमेल तशी लोकसेवाही केली. परंतु, आताशा पक्ष आणि सितारे यांनी ताकाला जाऊन भांडे लपवण्याची चाल सोडलेली दिसते. आदल्या दिवशी पक्षप्रवेश आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी असा खाक्‍या दिसतो आहे. "ये ढाई किलो का हाथ जिसपर उठता है, वो उठता नही, उठ जाता है' हा डायलॉग मारून अजरामर झालेले धर्मेंद्र पुत्र सनी देओल यांनी परवा भारतीय जनता पक्षाचे कमळ समारंभपूर्वक उचलले. क्रिकेटवीर गौतम गंभीरनेही राजधानी दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात चौकार-षटकार मारण्याचा इरादा दाखवला आहे.

क्रिकेटपटूंना निवडणुकीचे तसे वावडे नाहीच. नवज्योत सिद्धूपासून कीर्ती आझाद, मदनलाल यापर्यंत अनेकांनी एव्हाना राजकारणात बस्तान बसविले आहे. एक तालेवार क्रिकेटवीर शेजारच्या देशात थेट पंतप्रधान होऊ शकला, मग आपल्याच क्रिकेटवीरांनी काय घोडे मारले आहे? त्याच दिल्लीत सूफी गायक हंसराज हंस यांना तिकीट देताना भाजपने आपल्या तेथील दलित खासदाराला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. स्मृती इराणी, हेमामालिनी, किरण खेर आदी अनुभवी सितारे भाजपच्या तंबूत आधीपासूनच होते, त्यात आता उत्तर प्रदेशात रामपूर मतदारसंघातून जयाप्रदाही आल्या आहेत.

बंगालमध्ये बाबूल सुप्रियो, बिहारमध्ये रविकिशन, निरहुआ अशी कितीतरी नावे घेता येतील. अर्थात कॉंग्रेसनेही उत्तर मुंबईतून ऊर्मिला मातोंडकरांसारखी तालेवार तारका उभी केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अमोल कोल्हे या अभिनेत्याला शिरूरमधून उमेदवारी दिली आहे. ऑलिंपिकवीर बॉक्‍सर विजेंदरसिंह हादेखील कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. बंगालात ममतादीदींच्या तृणमूल कॉंग्रेसनेही मूनमून सेन, मिमी चक्रवर्ती आदी किमान चार-पाच सितारे रिंगणात उतरवले आहेत. दक्षिणेत तर निवडणूक जवळपास फिल्मी "दंगल'च असते. अभिनेता कमल हसनपासून कर्नाटकात अपक्ष निवडणूक लढवणारे "आता माझी सटकली रे'फेम खलनायक प्रकाश राज आपली स्टार पॉवर आजमावत आहेत. 

निवडणुकीच्या कामात पडद्यामागेही स्टार पॉवर असते. काही सितारे "न धरी शस्त्र करी मी' या चालीवर प्रचार कार्यात जोरदार हातभार लावत आहेत. बायोपिक, वाहिनीचे प्रक्षेपण, सीरियल अशा गोष्टी निवडणूक आयोगाने बासनात गुंडाळायला लावल्यानंतर अचानक अक्षय कुमारसारखा अभिनेता मुलाखतकाराच्या आवेशात प्रधानसेवकांची "अ-राजकीय' मुलाखत घेतो आणि ती दिवसभर शेकडो वाहिन्यांवर शे-पन्नास वेळा दाखवली जाते, हे कशाचे लक्षण मानायचे?

भारतीय लोकशाही "ग्लॅमर' आणि "ब्रॅंडिंग'चे नियम आत्मसात करत चालली आहे याचे? की निवडणूक जिंकण्याचा देशउभारणीशी काडीचाही संबंध नसून, हा निव्वळ मतांच्या आकडेवारीचा खेळ आहे, याचे? हे लोकशाहीचे सशक्‍तीकरण मानायचे की सवंगीकरण? हे ज्याचे त्याने ठरवायचे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com