गड राखण्याचे आव्हान (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे.

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन टप्प्यांतील मतदान किती महत्त्वाचे आहे, ते आकडेवारीवर एक नजर टाकली की ठळकपणे लक्षात येते.

आज होणाऱ्या मतदानापासून आता देशातील फक्‍त 195 मतदारसंघांतील निवडणुका बाकी असून, त्यापैकी 177 जागा 2014 मध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या! त्यामुळे पश्‍चिम बंगाल या एकमेव राज्याचा अपवाद वगळता, बाकी आठ राज्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपपुढे आव्हान आहे ते पाच वर्षांपूर्वी दणदणीत विजय मिळवून काबीज केलेले आपले गड शाबूत राखण्याचे. महाराष्ट्रात आज 17 जागांसाठी मतदान होत असून, त्यापैकी नऊ जागा भाजपच्या, तर उर्वरित आठ जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात होणारे हे अखेरचे मतदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भवितव्य निश्‍चित करणारे आहे, असे सहज म्हणता येते. या मैदानी लढाईत राज्यभरात या दोन नेत्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह गावोगावच्या शिलेदारांनी आपली इभ्रत भरीस घातली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान झाले, तेव्हा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट प्रचारात उडी घेतली होती आणि वर्ध्यात राहुल यांच्या सभेस अधिक गर्दी झाली होती का नरेंद्र मोदी यांच्या, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, प्रारंभी आघाडी घेणारी कॉंग्रेस राज्यातील या शेवटच्या टप्प्यात मात्र थेट "बॅकफूट'वर गेली. महाराष्ट्र कॉंग्रेसमधील मतभेदांच्या बातम्याच मथळे मिळवत राहिल्या आणि राहुल यांनी अखेरीस संगमनेरमध्ये घेतलेली सभा वगळता, त्यांनीही प्रचारातून अंग काढून घेतल्याचेच चित्र उभे राहिले. याचा फायदा मग भाजप तसेच शिवसेना यांच्या उमेदवारांना झाला, तर त्यात नवल ते काय? 

भाजपने मात्र या टप्प्यात मुंबई आणि अन्यत्र कमालीचा जोर लावला आणि अखेरीस मोदी तसेच उद्धव ठाकरे यांची संयुक्‍त सभाही राज्याच्या राजधानीत झाली. एकीकडे तथाकथित "साध्वी' प्रज्ञासिंह ठाकूर यांना मैदानात उतरवून, भाजपने आपली यापुढची रणनीती उग्र हिंदुत्वाची असेल, असे स्पष्ट केलेले आहे. मात्र या सभेत मोदी यांनी मुंबई पोलिसांचे गुणगान केले, ते जाणीवपूर्वक. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले ज्येष्ठ पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल उच्चारलेल्या अनुचित उद्‌गारांवर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचवेळी राज ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओंच्या सादरीकरणातून मोदी तसेच अमित शहा यांचा पर्दाफाश करण्यासाठी उचललेल्या विड्यास त्याच माध्यमातून उत्तर देण्याचा "खेळ' भाजपने प्रचार संपण्याच्या अखेरच्या दिवशी केला. मात्र, तो बार फुसका निघाला! त्याचवेळी मुंबईसारख्या बहुरंगी, बहुभाषक तसेच बहुधर्मीय महानगराकडे राहुल तसेच प्रियांका यांनी पाठ का फिरवली, या "लाख मोला'च्या प्रश्‍नाचे उत्तर मात्र गुलदस्तातच दडून राहिले.

महाराष्ट्र तसेच मुंबई कॉंग्रेसमधील विकोपास गेलेले मतभेदच यास कारणीभूत आहेत, ही बाबही या निमित्ताने स्पष्ट झाली. प्रियांका गांधी यांना मुंबईत ऊर्मिला मातोंडकर तसेच प्रिया दत्त यांच्या मतदारसंघांत आणले असते, तर त्यामुळे किमान वातावरण तरी ढवळून निघाले असते; मात्र कॉंग्रेस त्याहीबाबतीत उदासीनच राहिली. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेसबाबत सोनिया तसेच राहुल यांना आता निकालानंतर काही कठोर निर्णय गांभीर्याने घ्यावे लागतील, यात शंका नाही. 
देशभरात आज होत असलेल्या मतदानात सर्वाधिक चर्चा आहे ती बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून उभ्या असलेल्या कन्हैया कुमार यांचीच! मोदी यांच्याविरोधात लढणाऱ्या तरुणाईचे प्रतीक अशी कन्हैया यांची प्रतिमा देशभरात आहे. मात्र, त्या मतदारसंघात होत असलेल्या तिरंगी लढतीमुळे त्यांच्या भवितव्याबाबत निश्‍चित काही सांगता येणे, आजमितीला अवघड झाले आहे. त्याशिवाय मुंबईतून ऊर्मिला मातोंडकर आणि शिरूरमधील अमोल कोल्हे यांच्याबरोबरच पश्‍चिम बंगालमध्ये मूनमून सेन आणि बाबूल सुप्रियो अशा काही "सेलेब्रिटीं'बरोबरच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या चिरंजीवांचे भवितव्यही या चौथ्या टप्प्याच्या मतदानातूनच निश्‍चित होणार आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांनाही कनौजमध्ये अटीतटीच्या लढतीला तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय पवार कुटुंबीयांनी मैदानात उतरवलेला नवा चेहरा पार्थ अजित पवार यांनाही राजकारणातील पदार्पणानंतरच्या पहिल्यावाहिल्या कसोटीला याच टप्प्यात सामोरे जावे लागणार आहे. मात्र, या सर्वांपेक्षाही अवघड जबाबदारी आहे, ती भाजप आणि मित्रपक्षांचीच. पाच वर्षांपूर्वी जिंकलेले गड-किल्ले ते राखू शकतात की नाही, यावरच त्यांचे तसेच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article