बत्ती गुल!  (एक वृत्तांत...) (ढिंग टांग !)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

स्थळ : नागपूर. 
वेळ : पावसाची. 
प्रसंग : पाण्याचा. 
पात्रे : भिजलेली ! 

"सांग सांग भोलानाऽऽथ, पाऊस्स पडेल्काय... शाळेभोवती पाणीसाचून्सुट्टी मिळेल्काय...' हे जुने बालगीत गुणगुणतच सकाळ उगवली. बाहेर तुफ्फान पाऊस पडत होता. नागपुरातील रस्ते जलमय झाले होते. घराघरांत पाणी शिरले होते. इतकेच नव्हे, तर रविभवनच्या परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. विरोधी पक्षनेते मा. धनाजीराव मुंडे ह्यांच्या बंगल्यात पाणी शिरल्यावर ते चपळाईने निघून विधान भवनात कसेबसे पोचल्याची खबर आली.

खुद्द मुख्यमंत्री पाटलोण गुडघ्यापर्यंत फोल्ड करून अधिवेशनाच्या मांडवात पोचले. ते पोहोत आले असावेत, असे त्यांच्या अवतारावरून वाटत होते. त्यांचे सहकारी श्री. मा. चंदुदादा कोल्हापूरकर ह्यांनी त्यांना तसे विचारलेही. पण त्यावर काही न बोलता त्यांनी फक्‍त टुवाल मागितला !! 

कुठल्याही परिस्थितीत कामकाज घ्यायचेच, ह्या इराद्याने पेटलेल्या सरकारने, सदस्यांसाठी होड्यांची व्यवस्था करता येईल का, ह्याची चाचपणी सार्वजनिक बांधकाम विभागास करण्यास फर्मावले. परंतु 288 होड्या उपलब्ध होणे अशक्‍य आहे, असा अहवाल देण्यात आला. पावसाळी अधिवेशन औंदा नागपुरात घ्यावे, ही मूळ आयडिया नेमकी कोणाची ह्याची चौकशी विधान भवनाच्या आवारात जमा झालेले सारे करत होते. हिवाळ्यात इथे अधिवेशन घेणे छान असते. 

सर्व संबंधितांना सुखाची भावना होते. पण पावसाळ्यात? त्यात नागपुरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू असून, मेट्रोबिट्रोच्या खोदकामामुळे पाणी तुंबल्याने हे नागपूर आहे की मुंबई? हे काही कळत नव्हते. नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याची आयडिया पहिल्यांदा मांडणाऱ्या त्या अज्ञात (सुपीक डोक्‍याच्या) गृहस्थाला हुडकणेही कठीण झाले होते. -कारण कोणीच कबूल होत नव्हते !!! अखेर परिपाठानुसार ""मुख्यमंत्र्यांनीच ही आयडिया पहिल्यांदा आणली'' अशी टीका विरोधकांनी तिथल्या तिथे सुरू केली. ह्या आयडियाचे मूळ रेशीमबागेतील आदेशात असल्याची कुजबूजदेखील विधान भवनाच्या आवारात ऐकू येत होती. 

आज कामकाज होणार की नाही, असे सारेच एकमेकांना विचारत होते. तेवढ्यात विधान भवनातील लाइट गेले. सर्वत्र अंधार पडला व प्रश्‍नच मिटला. अखिल महाराष्ट्रात पसरलेला हा अंधकार आहे, अशी टीका ताबडतोब विरोधकांनी केली. 
"महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे कामकाज तहकूब करावं लागलं आहे. हा इतिहासातला काळा दिवस आहे, '' अशी टीका तत्परतेने धनाजीराव मुंडे ह्यांनी केली. दिवस ढगाळ होता, हे खरे, पण काळा होता ह्यावर अन्य काही सदस्यांचे दुमत होते. 

"पाऊस पडला तर दिवस काळा वाटणारा मनुष्य शेतकऱ्याचा पुत्र नाही !'' असा पलटवार विनोदवीर तावडेजी ह्यांनी केला. त्यावर सरकारच्या गलथान कारभारामुळेच कामकाजाचा बहुमूल्य वेळ वाया गेला, असे कोरडे विरोधकांनी भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहूनच ओढले, ते मात्र अंतर्मुख करायला लावणारे होते. 

"गुडघाभर पाण्यात कामकाज पुकारण्याची आमची तयारी आहे,'' असे चंदुदादा कोल्हापूरकर ह्यांनी सांगितल्यावर मात्र सर्वांच्याच पोटात गोळा आला. अंधारात मोबाइल फोनच्या बॅटऱ्या पेटवून कामकाज पुकारावे, अशीही एक सूचना पुढे आली, पण बहुतेक आमदारांचे फोन ब्याटरी डाऊन झाल्याने स्विच ऑफ झाले होते. 

""कशाला आलो आम्ही?...धड लाइट नाही इथं !'' धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर गुरकावून म्हणाले. अशा अंधारात महाराष्ट्राला उजेडाकडे नेणे शक्‍य नाही, हे तर उघड होते. 
...तेवढ्यात विधान भवनाच्या परिसरातील गटारातून बीअरच्या (रिकाम्या) बाटल्या भसाभस बाहेर आल्याची बातमी हाहा म्हणता पसरली.

"काय हे?'' ""भयंकर...'', ""अरेरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?''...असे अनेकविध उद्‌गार निघाले, सारे बाटल्या बघण्यासाठी गटाराकडे पळाले... 
...थोड्याच वेळात तीन दिवसांची सलग सुट्टी मिळाल्याच्या आनंदात परिसर निर्मनुष्य झाला... अगदी निर्मनुष्य. इति. 

-ब्रिटिश नंदी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Assembly