लढवय्या सैनिक ते कणखर नेता (नाममुद्रा)

लढवय्या सैनिक ते कणखर नेता (नाममुद्रा)

साम्यवादाची पडझड होत असताना अमेरिकेला वर्चस्वाच्या सर्वोच्च स्थानी नेण्याचे श्रेय नुकतेच दिवंगत झालेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज हर्बर्ट वॉकर, अर्थात जॉर्ज एच. डब्लू. बुश यांना द्यावे लागेल. शीतयुद्धाच्या समाप्तीचे साक्षीदार असलेल्या बुश यांचे नाव सर्वांत यशस्वी परराष्ट्र धोरण राबविलेल्या अध्यक्षांमध्ये गणले जाते.

उपाध्यक्षपदानंतर लगेचच अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले ते अनेक दशकांमधील पहिलेच अध्यक्ष होते. 1989 ते 1993 या त्यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेने जगाला कलाटणी देणाऱ्या अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग घेतला होता. 

दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि या युद्धात मरता मरता वाचलेल्या बुश यांनी 1966 मध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात प्रवेश केला. नंतर त्यांनी राष्ट्रसंघात आणि चीनमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून काम पाहिले. अमेरिकेची तपास संस्था "सीआयए'चेही ते 1976 मध्ये प्रमुख होते. या पाठबळावर त्यांनी 1980 मध्ये रोनाल्ड रेगन यांच्याशी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी लढत दिली. तेथे हार पत्करावी लागली, तरी याच मंत्रिमंडळात ते पुढील आठ वर्षे उपाध्यक्ष होते. नंतर "रिड माय लिप्स : नो न्यू टॅक्‍सेस' असा नारा देत त्यांनी अध्यक्षपदही मिळविले. साम्यवादाची पडझड होत असताना जगाचे नेतृत्व अमेरिकेच्या हातातून न जाऊ देण्याचे, किंबहुना ते अमेरिकेच्याच हाती एकवटून ठेवण्याचे कौशल्य बुश यांनी दाखविले. त्यानंतर कुवेतवर आक्रमण केलेल्या इराकवर 32 देशांच्या आघाडीच्या माध्यमातून लष्करी कारवाई करून बुश यांनी आखाती देशांचा भविष्यकाळच बदलला.

परराष्ट्र धोरणात हॅरी ट्रुमन आणि फ्रॅंकलिन रुझवेल्ट या माजी अध्यक्षांच्या रांगेत बसलेल्या बुश यांना "नो न्यू टॅक्‍सेस'चे वचन मात्र पाळता आले नाही. शिवाय, जगात अमेरिकेचे वर्चस्व वाढविताना देशांतर्गत धोरणांमध्ये मात्र ते अपयशी ठरले आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे बिल क्‍लिंटन यांच्याकडे देशाची सूत्रे गेली. नंतर आठ वर्षांनी क्‍लिंटन यांच्या जागी त्यांचे पुत्र जॉर्ज डब्लू. बुश अध्यक्ष झाले आणि पिता-पुत्रांनी सर्वोच्च पद भूषविण्याची घटना अमेरिकेच्या इतिहासात दोन शतकांनंतर घडली. 
राजकीय निवृत्तीनंतर बुश यांनी सामाजिक कार्यात थोडाफार रस घेतला.

2011 मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडलही मिळाले. अखेरच्या काळात मात्र श्‍वसनाच्या विकारासह इतर व्याधींमुळे ते चाकाच्या खुर्चीला खिळून होते. ते सर्वाधिक काळ जगलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष होते. केवळ अध्यक्षपद मिळाल्यामुळे तीन विक्रम नावावर केलेला हा नेता आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com