अण्वस्त्रांची नसती उठाठेव (राजधानी दिल्ली)

अनंत बागाईतकर 
सोमवार, 29 एप्रिल 2019

अण्वस्त्र वापरांचा मुद्दा हा निवडणूक प्रचारात हलक्‍या व सवंग पद्धतीने बोलण्याचा मुद्दा नाही. परंतु, विवेकाशी काडीमोड घेतल्यावर बेतालपणा प्रभावी होऊ लागतो. सध्या तसेच काहीसे चित्र देशात आहे. 

अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार असतानाची घटना. मदनलाल खुराना संसदीय कामकाजमंत्री होते. पाकिस्तानच्या विरोधात बोलण्याची खुमखुमी भाजपच्या मंडळींमध्ये विशेष दिसते. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानने नेहमीच्या कुरापती केल्या. त्यावर बोलताना खुराना यांनी, "पाकिस्तानने युद्धाची जागा, वेळ, दिवस निवडावा, भारत तयार आहे,' असे जोरदार विधान केले. त्याकाळात भाजपचे नेतृत्व वाजपेयी यांच्यासारख्या परिपक्व, संयमी आणि विवेकी नेत्याकडे होते.

दुसऱ्या दिवशी संसदेत विरोधी पक्षांनी या युद्धखोर व चिथावणी देणाऱ्या भाषणाबद्दल हरकत घेतली. ज्येष्ठ संसदपटू इंद्रजित गुप्त यांनी बोचऱ्या शैलीत म्हटले होते, "आमच्या सरकारचे मंत्री एखाद्या धंदेवाईक दादाप्रमाणे पाकिस्तानला धमकावत आहेत, की युद्धासाठी जागा, वेळ सांगा! हे कुणा मंत्र्यांना शोभादायक वक्तव्य आहे का? जेव्हा एखादा सरकारी मंत्री असे विधान करतो, तेव्हा त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय अर्थ घेतला जातो, याची माहिती मंत्र्यांना आहे काय?' खुराना हे खरोखरंच निर्भेळ व निखळ मनाचे होते. सतत हसतमुख असलेल्या खुराना यांनी "इंद्रजित दादा' व सभागृहाची माफी मागून टाकली. वाजपेयीसुद्धा खळाळून हसले आणि हसतखेळत हा वाद मिटला. 

याच मालिकेत पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांबद्दलच्या एका चर्चेत भाजपच्या काही फाजिल उत्साही मंडळींनी भारताकडे असलेल्या अण्वस्त्रांचा उल्लेख करून वेळ पडल्यास पाकिस्तानविरुद्ध ती वापरण्याचे संकेत दिले होते.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान चंद्रशेखर ही मंडळी तेव्हा सभागृहात उपस्थित होती. अण्वस्त्रांचा उल्लेख ऐकून चंद्रशेखर तिरीमिरीतच उठले आणि गरजले, 'अरे, तुम्ही पाकिस्तानवर अणुबॉंब टाकला, तर ही दिल्ली तरी वाचेल का? त्याची संहारकता जाणता काय? काहीतरी बोलायचे म्हणून बोलता?' वाजपेयी यांच्याकडे पाहून त्यांनी, "गुरुवर्य, तुमचे काय म्हणणे आहे ?' असेही विचारले. त्या काळात संसदेत अनुभवी व वरिष्ठ सदस्यांचा मान ठेवण्याची प्रवृत्ती जिवंत होती. चंद्रशेखर यांनी अक्षरशः झापून काढल्याने काही काळ सगळे चिडीचूप झाले. मग वाजपेयींनी उठून भारताच्या अण्वस्त्र वापराबद्दलच्या धोरणाचे कथन केले आणि वातावरण शांत झाले. 

वाजपेयींच्या काळात भारताने अणुस्फोट चाचणी केली. शांतताप्रिय देश असूनही भारताने या चाचण्या केल्याबद्दल जगात काहीसे प्रतिकूल वातावरण होते.

अमेरिकेने नेहमीप्रमाणे भारतावर काही निर्बंध लादले आणि भारताने त्यास यशस्वीपणे प्रत्युतरही दिले. यानंतर वाजपेयींनी "नो फर्स्ट यूज' म्हणजेच "अण्वस्त्र प्रथम वापर बंदी' ही धोरणात्मक भूमिका जाहीर केली. याचा अर्थ शत्रूने भारतावर अण्वस्त्रे टाकल्यानंतर भारत जागा होणार असा नव्हता, तर अशा संभाव्य हल्ल्यांच्या प्रतिकार व प्रत्युत्तराची व स्वसंरक्षणाची तजवीज केल्यानंतरच "प्रथम वापर बंदी' तत्त्व अमलात आणण्याची भूमिका होती. त्याचबरोबर भारताकडील अण्वस्त्रांचा उपयोग हा मुख्यतः "धाक' (डेटरन्स) म्हणून वापरण्याचे सूत्रही वाजपेयींनी जाहीर केले होते. वाजपेयी यांच्या काळातच त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांनी भारताचे "अण्विक नीती-तत्त्व'(न्यूक्‍लिअर डॉक्‍ट्रिन) जारी केले होते.

यासंदर्भात त्यांनी सर्व पक्षांशी चर्चा केली होती. त्यानंतर भारताची ही सर्वसंमत अण्विक भूमिका किंवा धोरण जाहीर करण्यात आले. विश्‍वासार्ह किमान धाक (क्रेडिबल मिनिमम डेटरन्स) हे त्या धोरणाचे मूलभूत सूत्र निश्‍चित करण्यात आले होते. त्याच धोरणाचे अनुसरण नंतरच्या सरकारनेही म्हणजेच "यूपीए' सरकारनेही चालू ठेवले. 

आता परिस्थिती काय आहे? पूर्वीचा काळ परिपक्व, संयमी व विचारी नेत्यांचा होता. आता दुर्दैवाने सुमार बुद्धी, असंयमी व उथळ मंडळींच्या हातात कारभार असल्याने "खळखळाट' अधिक आहे. निवडणुकीच्या प्रचारात अण्वस्त्रांचा वापर करण्याची भाषा यापूर्वी कोणत्याच राज्यकर्त्यांनी केलेली नव्हती. आता उरबडवेगिरी एवढी वाढली आहे, की त्यातून प्रचारात विवेकशून्यता आली आहे. 

"भारताकडची अण्वस्त्रे काय दिवाळीसाठी ठेवलीत काय?' असे एक विधान निवडणूक प्रचारात करण्यात आले. या विधानातून कोणते प्रश्‍न निर्माण होतात? पहिला प्रश्‍न निर्माण होतो, की भारताने अण्वस्त्रविषयक भूमिका बदलली आहे का? हा प्रश्‍न उपस्थित होण्याचे कारण स्पष्टपणे हे आहे, की सध्याच्या राज्यकारभार व व्यवस्थेत लहरी निर्णयांची पद्धती अमलात आणली जात आहे. एका व्यक्तीच्या लहरीवर निर्णय घेतले जात असल्याचे दिसते. नोटाबंदीचा निर्णय हे त्याचे सर्वांत ठळक उदाहरण आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात का असेना जेव्हा देशाचे नायक "अण्वस्त्रे काय दिवाळीसाठी आहेत काय' असे विधान करतात, याचा अर्थ अण्विक भूमिकेतील "प्रथम वापर बंदी' हे तत्त्व मोडीत काढण्यात आले काय? असा स्वाभाविक प्रश्‍न त्यातून निर्माण होतो. मग त्याचे पडसाद कसे उमटतील, याचा अंदाज लावणेही अवघड आहे. 

चंद्रशेखर यांच्या विधानाचा वर संदर्भ आहे. त्याचा अर्थ काय? अणुबॉंब किंवा अण्वस्त्रे यांची संहारकता ही व्यापक असते. पाकिस्तानला लागून भारताची सीमा आहे. हा सर्व सीमावर्ती भाग लोकवस्तीचा आहे. सीमेपर्यंत भारतीय शेतकऱ्यांची शेती आहे. काश्‍मीर, जम्मू, पंजाब, राजस्थान आणि काही प्रमाणात गुजरातमध्येदेखील ती आहे. समजा, पाकिस्तानातल्या लाहोरवर बॉंब टाकला तर? लाहोरपासून अमृतसर फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर असून, दिल्ली 407 किलोमीटरवर आहे. दिल्ली-इस्लामाबाद अंतर फक्त पावणेसातशे किलोमीटर आहे. दिल्ली-मुंबई अंतर 1 हजार 300 किलोमीटर, तर दिल्ली-पुणे अंतर 1 हजार 500 किलोमीटर आहे.

अणुबॉंब किंवा अण्वस्त्रांचा वापर केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम केवळ त्या स्थानापुरते राहात नाहीत. या स्फोटातून होणारा किरणोत्सर्ग व त्याचे दुष्परिणाम दोन ते तीन पिढ्यांपर्यंत चालतात, हे जपानमधील हिरोशिमा-नागासाकीने सिद्ध केलेले आहे. मानवी जीवनच नव्हे, तर शेती, वनस्पतींवरदेखील भयंकर असे दुष्परिणाम होतात. याची माहिती असूनदेखील केवळ मते मिळविण्यासाठी तोंडाला येईल त्या अविवेकी फुशारक्‍या मारल्या जात आहेत.

पाकिस्तानपेक्षा भारताचे लष्करी सामर्थ्य निर्विवादपणे वरचढ असूनही जेव्हा कुणी राज्यकर्ते त्याचा बागुलबुवा उभा करून मते मागण्याचा प्रकार करीत असतील, तर ते निव्वळ संवग राजकारण मानावे लागेल. त्याचप्रमाणे निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्या मुद्‌द्‌यांचा वापर करायचा, याचा सारासार विवेक संपल्याचे ते लक्षण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article on Political Situation