...पण आत्मविश्‍वास कमावला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 July 2018

अविश्‍वास ठराव मांडून विरोधकांनी आपला आत्मविश्‍वास वाढल्याचे दाखवून दिले; त्याचबरोबर मोदी सरकारच्या कारभारावर घणाघात करण्याचा हेतूही साध्य केला. या ठरावाच्या निमित्ताने मोदी यांनीही वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ थेट लोकसभेतच वाढविला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात लोकसभेत मांडण्यात आलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येण्याआधीच त्या प्रस्तावाचे भवितव्य निश्‍चित झालेले होते ! हा प्रस्ताव मंजूर होईल आणि सरकार कोसळेल, असे स्वप्न विरोधी बाकांवरील कोणीच पाहिलेले नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यामागे विरोधकांचा हेतू एकच होता आणि तो म्हणजे आपला आत्मविश्‍वास वाढविण्याचा आणि त्याचबरोबर आणखी एक हेतू होता, तो म्हणजे मोदी सरकारच्या कारभारावर घणाघात करण्याचा.

विरोधकांचे हे दोन्ही हेतू जसे सफल झाले, त्याचबरोबर या प्रस्तावाच्या निमित्ताने मोदी यांनीही वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ थेट लोकसभेतच वाढविला आणि आपली रणनीती स्पष्ट केली. हा प्रस्ताव भले तेलुगू देसम, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मांडला असला, तरी टीव्हीच्या शेकडो चॅनेल्सवरून ही चर्चा दिवसभर बघणाऱ्यांना खरा रस होता तो मोदी आणि राहुल गांधी यांच्या खणाखणीतच ! त्या दोघांनीही जनता जनादर्नाची ही इच्छा सफळ केली. त्यातच आपल्या आरोपांच्या फैरी झाडून झाल्यानंतर राहुल यांनी मोदी यांची गळाभेट घेऊन केलेल्या धक्कातंत्राच्या प्रयोगामुळे तर अवघा देशच अवाक झाला ! आता राहुल यांचा हा "सिक्‍सर' होता की "सेल्फ गोल' ही चर्चा पुढच्या निवडणुकीपर्यंत सुरू राहील. 

एक मात्र नक्‍की झाले. या ठरावावर केलेल्या घणाघाती भाषणामुळे राहुल यांचा आत्मविश्‍वास चांगलाच वाढल्याचे, त्यांच्या देहबोलीतून दिसून आले. आता राहुल असोत की ममता बॅनर्जी की चंद्राबाबू नायडू असोत; त्यांनी ही संसदेतील लढाई रस्त्यावर नेण्याचा केलेला निर्धार पुढच्या दोनच दिवसांत स्पष्ट झाला आहे. रॅफेल डील असो की नीरव मोदीचे पलायन असो, अशा मुद्यांवरील विरोधकांच्या अनेक ठोस आरोपांना थेट उत्तर देण्याचे पंतप्रधानांनी टाळले, हे स्पष्टपणे जाणवले. त्याऐवजी त्यांनी प्रचाराचाच सूर लावला आणि "नामदार-कामदार' अशा शाब्दिक खेळातून टीव्हीच्या प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचा प्रयत्न केला. ही मोहिनी मोदी यांनी आपल्या चाहत्यांवर घातली, त्यास आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत.

मात्र राहुल यांचे तडाखेबंद भाषण आणि नंतर त्यांनी अकस्मात घेतलेली "गळाभेट' यामुळे मोदी यांचे चित्त क्षणमात्र का होईना विचलित झाले, यात शंकाच नाही. त्यामुळेच राहुल हे "गळाभेट' घेण्यासाठी त्यांना उठून उभे राहण्यास सांगत होते, याचा मोदी यांना धक्‍काच बसला होता. मात्र पुढे या धक्‍क्‍यातून सावरल्यावर मोदी यांनी "पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याची राहुल यांना कशी घाई झाली आहे !' असे सांगून या "गळाभेटी'ला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आपल्या नेहमीच्या शैलीत करत, फड जिंकल्याचा आव आणला ! 

मोदी विरुद्ध राहुल या लढतीत खरे हसे झाले, ते मात्र शिवसेनेचे. या अविश्‍वास प्रस्तावावर नेमकी काय भूमिका घ्यायची, ते गेली तीन-चार वर्षे एकीकडे सत्ता उपभोगतानाच, मोदी तसेच भाजप यांच्यावर आसूड ओढणाऱ्या शिवसेनेला अखेरपर्यंत ठरवताच आले नाही. त्यामुळेच त्यांनी रणातून पळ काढला. शिवसेना ही केंद्रातील सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे एका अर्थाने सरकारविरुद्धचा हा ठराव, त्यांच्याही विरोधातच असल्यामुळे ते कमालीचे गोंधळून गेले आणि सत्ता सोडायची नसल्याने त्यांनी अखेर आपल्या तलवारी ऐन मोक्‍याच्या क्षणी म्यानबंद केल्या ! मोदी यांचे भाषण हे केवळ प्रचारकी थाटाचे होते, हे त्यांनी स्वत:च सरकारच्या कामगिरीविषयी बोलण्याऐवजी कॉंग्रेसनेच यापूर्वी चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आदींचा कसा "विश्‍वासघात' केला आहे, या जुन्याच कहाण्या उगाळून दाखवून दिले ! खरे तर ही मोदी यांना देशाचे वर्तमान आणि भविष्य याबाबत भाष्य करण्याची मोठी संधी होती. 

शिवाय, सरकारविरोधातील आरोपांचे खंडनही त्यांना करता आले असते. त्यांनी झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांबाबत तिखट शब्द वापरले खरे; परंतु देशभरात कोठे ना कोठे असले प्रकार चालू आहेत. राजस्थानात अलवार येथे झालेल्या हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा या झुंडशाहीचा प्रश्‍न किती विकोपाला गेला आहे, हेच दाखवून दिले आहे. त्यामुळे आता खरी कसोटी आहे, ती या प्रकारांना आळा घालण्यात. तशा परिणामकारक कृतीची आता मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. आकड्यांच्या खेळांचा हा सामना मोदी यांनी जिंकला असला, तरी जनतेची मने मात्र राहुल यांनी जिंकली, असेच म्हणावे लागते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Article On Politics