सुसज्ज सत्ताधारी पक्ष अन्‌ ढिसाळ विरोधक 

सुसज्ज सत्ताधारी पक्ष अन्‌ ढिसाळ विरोधक 

राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील घाम फुटला असता. परंतु गळाठलेल्या विरोधी पक्षांमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळविण्याची जिद्द (किलर इन्स्टिंक्‍ट) दिसून आली नाही. राज्यसभा उपसभापतिपदाची निवडणूक ही फार मोठी नाही किंवा लगेचच त्यावरून काही निष्कर्ष काढता येणार नाही. परंतु अमाप साधनसंपत्ती व धनाढ्य अशा सत्ताधारी पक्षाशी स्पर्धा आहे ही बाब अद्याप विरोधी पक्षाच्या मंडळींच्या बहुधा लक्षात आलेली नसावी. 

उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्तापक्ष तयार नव्हता, कारण त्यांना राज्यसभेत काठावरचे बहुमत आहे. त्यांनी शक्‍यतोवर त्यासाठी चालढकल केली, परंतु अखेर अधिवेशन संपता संपता त्यांनी ती निवडणूक घेतली. त्यासाठी आवश्‍यक ती पूर्वतयारीही केली. सत्तापक्षाला जी चिंता होती ती प्रामुख्याने बिजू जनता दलाबद्दल (9 सदस्य) होती. कारण या पक्षाची मते निर्णायक ठरणारी होती. विरोधी पक्षांची हमखास मतांची संख्या 116 ते 119च्या आसपास होती. त्यामुळे बिजू जनता दलास आपल्याकडे कोण वळवतो, यावर सगळा खेळ केंद्रित झाला होता आणि सत्तापक्षाने त्यात बाजी मारली. बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक हे नितीशकुमार यांच्याप्रमाणेच भाजपच्या साथ-संगतीत सुखी असतात. त्यामुळे त्यांनी आपले वजन सत्तापक्षाच्या पारड्यात टाकले. 

बिजू जनता दलास आपल्याकडे वळविणे सोपे असल्याची जाणीव सत्तापक्षाला होती; पण त्यासाठी जी राजकीय मोर्चेबांधणी करायची असते, त्याबाबत सत्तापक्षाने विरोधकांवर मात केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व नवीन पटनाईक यांचे संबंध मित्रत्वाचे आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाचे हरिवंश यांची या पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर स्वतः नितीशकुमार त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढाकार घेऊ लागले व पहिला फोन त्यांनी नवीन पटनाईक यांना केला व नवीन पटनाईक यांनी तत्काळ त्यांना पाठिंबा देऊ केला. मात्र त्यांनी बिजू जनता दलाचा पाठिंबा "संयुक्त जनता दलाचे उमेदवार हरिवंश यांना आहे, एनडीएचे उमेदवार म्हणून नाही' असे पटनाईक यांनी नितीशकुमार यांना सांगितले. भाजपने तेलंगणा राष्ट्रसमितीचे (6 सदस्य) प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आपल्या बाजूला वळवले आहेच. अण्ण द्रमुकही बरोबर असल्याने सत्तारूढ आघाडीला विजय मिळण्याची खात्री निर्माण झाली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे स्वतः या मोर्चेबांधणीत सहभागी होते. शिवसेनेचा पाठपुरावा त्यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत यांना खास बोलावून आता भाजप-शिवसेनेतली भांडणे बंद करण्यासाठी गळ घातली. राऊत यांनी त्यांना एवढेच सांगितले, की विरोधी पक्षांतर्फे कुणी मराठी उमेदवार असेल तर मात्र शिवसेनेची मते गृहीत धरू नका. परंतु शिवसेनेवर ती अप्रिय वेळ आली नाही. 

विरोधी पक्षांमध्ये निवडणूक लढवायची कोणी यावरच प्रथम एकमत होईना. यासंदर्भात जी पहिली बैठक झाली त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस (50 सदस्य), तृणमूल कॉंग्रेस (13) आणि समाजवादी पक्ष (13) या प्रमुख पक्षांनी आपसांत बसून उमेदवार निश्‍चित करावा आणि बाकीचे लहान पक्ष त्यांना पाठिंबा देतील, असा प्रस्ताव दिला होता. तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणे कम्युनिस्टांना अडचणीचे होते. समाजवादी पक्षाला उपसभापतिपदात रस नव्हता. मग कॉंग्रेसचा वरचष्मा नको म्हणून इतर लहान पक्षांपैकी कुणाला तरी संधी द्यावी, असा प्रस्ताव करण्यात आला. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. तसेच पवार यांचे सर्व पक्षांतील मैत्रीसंबंध लक्षात घेता ते बिजू जनता दल तसेच तेलंगणा राष्ट्रसमिती यांचे मन वळवू शकतील असा होराही त्यामागे होते. परंतु चर्चेचे दळण नेहमीप्रमाणे असे लांबत गेले, की तोपर्यंत सत्तापक्षाने बाजी मारलेली होती. जेव्हा पवार यांनी पटनाईक यांना फोन केला तेव्हा त्यांनी आधीच नितीशकुमार यांच्या उमेदवाराला पाठिंब्याचा शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तेथेच विरोधी पक्षांचा खेळ बिघडला. यानंतर मग कोणताच पक्ष हरण्यासाठी आपला उमेदवार उभा करण्यास तयार होईना आणि मग नाइलाजाने कॉंग्रेसलाच ती जबाबदारी घ्यावी लागली.

कॉंग्रेसने बी. के. हरिप्रसाद यांना उभे केले. राज्यसभेच्या उपसभापतिपदाची निवडणूक ही अंतिम नाही किंवा अतिमहत्त्वाची व प्रतिष्ठेचीही नाही. सर्वसाधारणपणे आतापर्यंतच्या शिरस्त्यानुसार सत्तारूढ पक्षाकडेच दोन्ही पदे असतात. परंतु सत्तापक्षाला घाम फोडण्याच्या स्थितीत असूनही विरोधी पक्षांनी ती जिद्द दाखवली नाही. एकमेकांवरच ते टोलवाटोलवी करीत बसले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत उतरण्याचे नाकारले, तेव्हा तर कॉंग्रेसमधल्या एका गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा भाजपला मिळालेला आहे, असा आरोप करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या आरोपाला गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे; ज्यामध्ये कॉंग्रेसचे शक्तिमान नेते अहमद पटेल यांना विजयासाठी झगडावे लागले होते व त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन मते मिळाली नव्हती. त्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर फोडले होते. 

यानिमित्ताने विरोधी पक्षांमधली दुही, परस्परांवरील अविश्‍वास हे सर्व चव्हाट्यावर आले. खरे तर या निवडणुकीच्या तीन दिवस आधी लोकलेखा समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यातही हरीवंश हे उमेदवार होते. परंतु सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी तेलुगू देसमच्या रमेश यांना मदत केली व ते निवडूनही आले. त्यामुळे उपसभापतिपदाच्या निवडणुकीबाबतही काहीशी उत्कंठा निर्माण झालेलीच होती. तेलुगू देसमने अधिकृतपणे विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकात यानिमित्ताने सहभाग घेण्यास प्रारंभ केला. विरोधी पक्षांमधील ताठरपणा व अव्यवहारीपणा देखील प्रकट झाला.

आम आदमी पार्टी - "आप'ने विरोधी पक्षाच्या उमेदावाराला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. अरविंद केजरीवाल यांची अपेक्षा होती की राहुल गांधी यांनी त्यांना फोन करावा. परंतु दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकेन आडवे आले. राहुल गांधी यांनी फोन केला नाही व "आप'ने मतदानात भाग घेतला नाही. विरोधी पक्षांमधील हा ताठरपणा, लवचिकतेचा अभाव हे विरोधी आघाडीतील मोठे अडसर आहेत. सत्तापक्षाच्या विजयानंतर पंतप्रधानांनी स्वतः नितीशकुमार, उद्धव ठाकरे यांना फोन करून आभार मानले. विरोधी पक्ष व विशेषतः कॉंग्रेस पक्ष ही लवचिकता कधी शिकणार हाच प्रश्‍न आहे !  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com