esakal | अग्रलेख : टक्का का घसरला?
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : टक्का का घसरला?

काळानुसार अभ्यासक्रम व शिक्षणरचनेतील बदल आवश्‍यकच आहेत; परंतु ते करताना आनुषंगिक प्रयत्नांत कसूर ठेवता कामा नये. त्यादृष्टीने दहावीच्या निकालाचा अभ्यास करून उपाययोजना केली पाहिजे. 

अग्रलेख : टक्का का घसरला?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा मिरवणाऱ्या राजधानीत तर या परीक्षेला बसलेल्या प्रत्येकी चार विद्यार्थ्यांपैकी एकावर नापासाचा शिक्‍का बसला आहे.

मुंबईतून या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 74.9 टक्‍के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, हा टक्‍का गेल्या 13 वर्षांतील सर्वात कमी आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले असून, त्यातील सर्वात मोठा विषय हा या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमुळे त्यांना चांगल्या महाविद्यालयात मिळणाऱ्या प्रवेशाचा आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य शालान्त परीक्षा मंडळाऐवजी "सीबीएसई' वा अन्य मंडळातून दहावीची परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. त्या मंडळांच्या विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळालेले असल्याने महाराष्ट्रातील; विशेषत: मराठी विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाच्या मोठ्याच दिव्यातून पुढे जावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षांत या मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 100टक्‍के गुणही मिळत असत आणि त्याबाबत आश्‍चर्यही व्यक्‍त केले जात होते. त्यामुळेच बहुधा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी "गुणांची सूज यंदा उतरली आणि वास्तव काय ते सामोरे आले,' अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. 
मात्र, अशी प्रतिक्रिया देऊन शिक्षणमंत्र्यांना आपली जबाबदारी टाळता येणे यंदा तरी कठीणच दिसते. यंदापासून या दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यातील काही बदल स्वागतार्ह असले, तरी या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात राज्याचा शिक्षण विभाग कमी पडल्याची प्रतिक्रिया शिक्षणक्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

यंदापासून भाषा तसेच सामाजिक शास्त्र या विषयातील अंतर्गत गुण देण्याचा रिवाज बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निकालाची टक्‍केवारी घसरली, असे हे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. याचा अर्थ अंतर्गत गुणांची खैरात विद्यार्थ्यांवर होत होती आणि त्यामुळेच निकालाचा टक्‍का शिगेला पोचला होता, असाही होऊ शकतो. एक मात्र खरे की भाषा विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील गुंत्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे गुणांचे गणित चुकलेले दिसते! अलीकडल्या काळात विद्यार्थ्यांच्या हाती शालेय जीवनातच सेल फोन तसेच आयपॅड वगैरे उपकरणे आल्यामुळे त्यांची लेखनाची सवय तर मोडून गेली आहेच; शिवाय त्यांच्या भाषा कौशल्यावरही अपरिमित परिणाम झाला आहे. खरे तर शालेय विद्यार्थ्यांना गणित वा विज्ञान या विषयांची भीती असते; मात्र यंदा या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी भाषा विषयांच्या भीतीच्या सावटाखालीच वर्षभर वावरत होते. त्यापैकी अनेकांनी "आता यापुढे भाषा आणि विशेषत: मराठी अभ्यासाला नसणार म्हणून सुटलो बुवा!' अशीच प्रतिक्रिया व्यक्‍त करणे हे आपल्याकडच्या शिक्षण आणि भाषा या विषयाच्या बाबतीतील विदारक वास्तव म्हटले पाहिजे.

एकीकडे सतत मराठी भाषेच्या गुणगानाची जपमाळ ओढत राहायची आणि त्याचवेळी या विषयाचा अभ्यासक्रम मात्र विद्यार्थ्यांना मराठीविषयी प्रेम नव्हे तर संताप निर्माण व्हावा, असा करायचा! हा अंतर्विरोध दूर करण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत. गेल्या वर्षी मराठी प्रथम भाषा विषयाचा निकाल 90 टक्‍के लागला होता. यंदा तोच टक्‍का 78.42 इतका खाली आला आहे. तर मराठी द्वितीय म्हणून घेणाऱ्यांची टक्‍केवारी 93 वरून 84 पर्यंत घसरली आहे. त्यामुळे मराठीच्या अभ्यासक्रमाचा फेरविचार करायला हवा काय, याचा निर्णय मंडळाने तज्ज्ञांशी बोलून घ्यायला हवा. 

या पार्श्‍वभूमीवर मुक्‍तकंठाने कौतुक करायला हवे ते कोकणातील विद्यार्थ्यांचे! राज्यभरातून 77.10 टक्‍के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होत असताना कोकणवासीयांनी मात्र 88.38 टक्‍के निकाल लावत राज्यभरात अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत द्वितीय स्थानावर 86.58 टक्‍के उत्तीर्णांचे प्रमाण राखत कोल्हापूर विभाग आहे, तर पुणे विभागाचा निकाल 82.48 टक्‍के लागला असून हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक चौथ्या तर मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे.

अर्थात, गुणांची टक्‍केवारी मनासारखी नसली तरी विद्यार्थ्यांनी नाऊमेद होण्याचे काहीच कारण नाही. दहावीतच नव्हे तर बारावीतही कमी गुण या अभ्यासक्रमाच्या गुंत्यामुळे मिळाले तरी अंतिमत: त्यांची पुढची वाटचाल ही "सीईटी'मधील गुणवत्तेवरच अवलंबून असते, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे.

आता प्रवेशाची भाऊगर्दी सुरू होईल आणि मनपसंत महाविद्यालय मिळवण्याची धडपड बघायला मिळेल. मात्र, तेथेही मनाजोगते महाविद्यालय मिळाले नाही, तरीही नैराश्‍य पदरी न घेता या विद्यार्थ्यांनी आपल्याला पुढच्या यशाच्या लढाईत खंबीरपणे उतरायचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! 

loading image