बुद्धिसंपन्न भारत होवो! (भाष्य)

गणेश हिंगमिरे 
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

एक कल्पना एकाच वेळी जगात सात जणांना सुचते, असे म्हटले जाते. पण त्या कल्पनेला योग्य ती दिशा जो सर्वात आधी देतो, त्याला त्याचा लाभ होतो. भारत याबाबतीत फारसा जागरूक नाही. हे चित्र बदलण्याचा निर्धार आजच्या जागतिक बौद्धिक संपदा दिनी (ता. 26 एप्रिल) करायला हवा. 

जागतिक बौद्धिक संपदा संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक घटक संस्था म्हणून कार्यरत आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (GI) आणि इंडस्ट्रीयल डिझाईन या जगातील बौद्धिक संपदांचे रक्षण करणे हे तिचे एक प्रमुख उद्दिष्ट. या बौद्धिक संपदांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देऊन त्यांचा दर्जा उंचावणे आणि बुद्धिजीवी व्यक्ती किंवा संस्थेला योग्य आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून देणे, या अनुषंगाने जागतिक बौद्धिक संपदा संस्था कार्यरत आहे.

या संस्थेचे 190 पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. भारत या संस्थेचा सदस्य देश असल्यामुळे भारतातही जागतिक "बौद्धिक संपदा दिवस' साजरा करण्यात येतो. भारत सरकारनेही अनेक वर्षांपासून पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क इत्यादी बौद्धिक संपदांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पावले  उचललेली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय करार भारताने या विषयाला अनुसरून स्वीकारले आहेत. 

भारतातील पेटंट हे इतर राष्ट्रांत सहज जावे आणि त्या भारतीय व्यक्तीला अथवा संस्थेला त्याच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या संपदेला योग्य स्थान आणि मोबदला मिळावा या सद्‌हेतूने भारताने अनेक बौद्धिक संपदाविषयक करार स्वीकारले आहेत. हे सर्व करार जागतिक बौद्धिक संपदा संस्थेतून आलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून पेटंट को-ऑपरेशन ट्रिटी, "युनिव्हर्सल कॉपीराईट कन्व्हेंशन' या बौद्धिक संपदाविषयक करारांचा समावेश आहे. ज्यांच्यामुळे भारतीय बौद्धिक संपदा कायद्यात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. 

जसे भारतीय बुद्धिमान मंडळींना इतर राष्ट्रांत आपली बौद्धिक संपदा घेऊन जावे असे वाटत असते; तसेच इतर देशांतील व्यक्ती किंवा संस्थांनासुद्धा त्यांची बौद्धिक संपदा भारतासारख्या देशात घेऊन जावे असे वाटत असते. या एकमेकांच्या इच्छेनुसार बौद्धिक संपदेची देवाणघेवाण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संस्थेने वेगवेगळे करार तयार केले आणि आणि त्याची अंमलबजावणी जागतिक बौद्धिक संपदा संस्था सदस्यांनी सुरू केली. भारत जरी या संस्थेचा सभासद झाला तरीदेखील भारताची प्रगती बौद्धिक संपदेच्या विषयात इतर विकसनशील राष्ट्रांच्या मानाने फारशी होऊ शकली नाही. चीन आणि भारत हे तसे दोघेही विकसनशील राष्ट्र म्हणून नोंदणीकृत आहेत. पण गेल्या दोन दशकांत चीनची पेटंटमधील भरारी ही भारताच्या तुलनेने 50 पटींनी अधिक आहे.

नुकत्याच झालेल्या एका विज्ञान परिषदेत एक संशोधन पुढे आले. त्यात असे आढळून आले, की चीन भारतापेक्षा 28 पट जास्त पेटंट घेतोय. चीन सरकारने पेटंटसाठी विशेष सहायक तरतुदी तयार केल्या आहेत. भारतही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. पण त्याची गती चीनएवढी नाही. त्यामागे काय कारण असू शकते, असा विचार केला तर उत्तर सापडते, की पेटंटविषयीचे अज्ञान आणि उदासीनता. पेटंट किंवा तत्सम बौद्धिक संपदा भारतात कमी प्रमाणात नोंदल्या जातात. सरकारी यंत्रणाही याला तितकीच जबाबदार आहे. 

जपानमध्ये इयत्ता सातवीपासून पेटंट आणि इतर बौद्धिक संपदाविषयक पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. पण आपल्याकडे इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या मुलालाही पेटंटविषयी फारसे ज्ञान व माहिती नसते. म्हणजेच मुळात शैक्षणिक अभ्यासक्रमातच पेटंटचा समावेश करण्याची यंत्रणा जपान, चीन आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांमध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे लहान वयातच मुलांच्या मनावर आणि विचारांवर पेटंटचा पगडा पडण्यास सुरुवात होते आणि दहावी- बारावीला असतानाच हे विद्यार्थी नवनवीन संशोधन करतात.

पेटंट किंवा इतर बौद्धिक संपदेच्या बाबतीत भारताने कासवाच्या गतीने प्रगती सुरू ठेवून चालणार नाही. एकाच वेळी जगात एकसारखी कल्पना सात व्यक्तींना सुचते, असे म्हटले जाते आणि जो त्या कल्पनेला सर्वात अगोदर दिशा देतो आणि तिचे पेटंट नोंद करतो त्या व्यक्तीच्या किवा संस्थेच्या नावे ते संशोधन किंवा त्या पेटंटची नोंद होते. भारतीय मंडळी पेटंट किंवा बौद्धिक संपदा निर्माण करीत नाहीत, असे नाही; परंतु ती जगाच्या तुलनेत फार कमी प्रमाणात आहे. जी काही पेटेंट किंवा बौद्धिक संपदा हक्क भारतीय मंडळी घेत आहेत, ती परकी कंपन्यांसाठी सर्वाधिक आहे. विशेष करून अमेरिकेच्या कंपन्यांसाठी सर्वात जास्त आहे. म्हणून अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त योगदान हे भारतीयांनी अमेरिकन कंपन्यांत केलेल्या संशोधनाचे आणि त्यांनी घेतलेल्या पेटंटचे आहे.

"आय.आय.एम'. अहमदाबादच्या एका अहवालात ही बाब आढळून आली. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या निमित्ताने एक मूलमंत्र स्वीकारला जातो आणि यंदाच्या वर्षीचा बीजमंत्र असा आहे की गतिमान व्हा! सामर्थ्यशाली व्हा! आणि उच्चस्तरावर जा! एक प्रकारे हा बीजमंत्र भारतासाठी एक विशेष संदेश देणारा आहे. यावर्षीच्या बौद्धिक संपदा दिवसाचे औचित्य साधून जागतिक बौद्धिक संपदा संस्थेने काही महत्त्वाचे संदेश सर्वांसाठी दिले आहेत. त्यामधील पहिला संदेश असा आहे, की आपली क्षमता तपासा. हा संदेश भारतीयांसाठी असा असू शकतो की तुम्ही बुद्धिसंपन्न आहात, तुम्ही तुमच्या विचारांतून किंवा संशोधनातून बौद्धिक संपदा निर्माण करू शकता; मग ती पेटंटरुपी असो किंवा कॉपीराईट असो. या बौद्धिक संपदा हक्कांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि आपल्या देशाला समृद्ध करू शकता.

दुसरा संदेश असा आहे की, स्पर्धेचा थरार अनुभवा, म्हणजेच जगातील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या बौद्धिक संपदेच्या स्पर्धेमधून तुम्ही माघार घेऊ नका. त्याला जिद्दीने सामोरे जा. विसरू नका जगाला शून्याचा शोध देणारा एक भारतीयच होता. बौद्धिक संपदा हक्कांच्या स्पर्धेतून भव्यदिव्य विश्व निर्माण होऊद्या. सर्वसामान्यांनी बुद्धीच्या जोरावर असामान्य कार्य करून दाखवले आहे. अशांनी आपल्या बौद्धिक संपदेतून विशेष करून "पेटंट'मधून जगाला सामर्थ्यवान आणि समृद्ध बनविले आहे. जगाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. त्यामध्ये वीज, रेल्वे वा टेलिफोन यांसारखे शोध लावणारी माणसे अगदी सर्वसामान्य स्तरांतून आलेली होती. अशी बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट हे कुणीतरी सर्वसामान्य व्यक्तीने निर्माण केले आणि त्यांचे संशोधन हे नंतर जगभरात प्रसिद्ध झाले.

कॉपीराईट या बौद्धिक संपदा हक्कानेसुद्धा बऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींना उच्च दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामध्ये सगळ्यांना परिचित असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्‌स असोत किंवा हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाची लेखिका जे. के. रोलिंग असो, या सर्वांना कॉपीराईट या बौद्धिक संपदेने मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांची बौद्धिक संपदा आजही भारतामध्ये विकत घेतली जाते. त्याची रॉयल्टी त्यांना दिली जाते. ती मंडळी आजही आपल्या कॉपीराईटच्या जोरावर जगावर अधिपत्य गाजवीत आहेत.

जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या निमित्ताने जगभरात घडलेल्या सामाजिक आणि आर्थिक क्रांतीची कास भारतीय मंडळींनीही धरावी आणि "बुद्धिसंपन्न भारत होवो' असा संकल्प सोडत हजारोंच्या संख्येत पेटंट, कॉपीराईट, भौगोलिक उपदर्शन यांच्या नोंदी कराव्यात, हेच खऱ्या अर्थाने मोठे राष्ट्रीय योगदान ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Editorial Bhashya Article