राष्ट्रसेवेचा ध्यास घेतलेला ऋषितुल्य नेता

शरद पवार
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अवघ्या एक मताने त्यांचा पराभव झाला होता. पंतप्रधानपद सोडल्यानंतर त्यांनी मला दूरध्वनी करून सरकारला विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणा दिसून येतो.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सार्वजनिक आणि संसदीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. वाजपेयी यांनी देशाची सेवा अखंडपणे केली. देशहिताच्या प्रश्‍नांच्या आड पक्षभेद येता कामा नये, असा त्यांचा दृष्टिकोन असे. संसदीय राजकारणात स्वत:च्या विचारांचा पाठपुरावा करतानादेखील निःपक्षपातीपणाने काम करण्याची त्यांची ही दृष्टी व वृत्ती नेहमीच जाणवली. संसदेची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, याविषयी ते आग्रही होते.

संसदीय कार्यपद्धतीविषयी आस्था बाळगणारा हा नेता होता. ते विरोधी पक्षात असताना जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्‍न उपस्थित झाला तेव्हा त्यांनी तत्कालीन सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. याचे कारण राष्ट्रहिताला त्यांच्या लेखी सर्वात जास्त महत्त्व होते. तत्कालीन पश्‍चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून बांगलादेशला मुक्त करण्यासाठी झालेल्या युद्धात इंदिरा गांधींनी घेतलेल्या कणखर भूमिकेची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. तेव्हा विरोधी बाकावर असतानादेखील त्यांनी इंदिरा गांधी यांना "दुर्गा' असे संबोधले होते. 

संयुक्त राष्ट्रसंघात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना अटलजींनी तेथे आपला अमीट ठसा उमटविला. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळामध्ये दोन वेळा सहभागी होण्याचा योग आला होता. तेव्हा सकाळी नऊ वाजता वाजपेयी सहकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करत असत; तसेच कार्यक्रम पत्रिकेवरील विषयासंदर्भात भारताने नेमकी कोणती भूमिका मांडावी याविषयीदेखील मौलिक सूचना देत असत. ते पंतप्रधान असताना त्यांच्यावरील विश्‍वासदर्शक ठरावाला विरोध करण्याची जबाबदारी लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने माझ्याकडे होती.

अवघ्या एक मताने त्यांचा पराभव झाला होता. पंतप्रधानपद सोडल्यानंतर त्यांनी मला दूरध्वनी करून सरकारला विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणा दिसून येतो. या वेळी बोलताना अनेक राष्ट्रीय प्रश्‍नांवर विरोधकांनी सरकारप्रती घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. सत्ता गेल्यानंतर, पंतप्रधानपद सोडल्यानंतरदेखील विरोधकांच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांचे वर्तन कसे असले पाहिजे, हेच त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले. 

केंद्रात आघाडी सरकारचे नेतृत्व करताना समावेशकता आणि लवचिकता ठेवावी लागते. पण प्रसंगी कठोर आणि कणखर भूमिका घेण्यासही ते कचरत नसत. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना ते सुस्पष्ट मार्गदर्शन तर करीतच; पण प्रसंगी नापसंती व्यक्त करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातमधील परिस्थितीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांनी "राजधर्मा'ची करून दिलेली आठवण हे होय.

अटलबिहारी वाजपेयी हे राजकारणातील आगळेवेगळे, दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रहिताचा अखंड विचार करणाऱ्या एका भारतमातेच्या सुपुत्राला आपण मुकलो आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मी स्वत: त्यांच्या निकटवर्तीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

- शरद पवार, 

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

Web Title: Pune Edition Editorial on Vajpayee