चपळ नि तंदुरुस्त (नाममुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

प्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढू लागली तसे अनेक खेळाडू उदयास येऊ लागले आहेत. यंदाच्या मोसमाने प्रो-कबड्डीला जसा नवा विजेता मिळाला, तसा पवनकुमारसारखा गुणी खेळाडूदेखील मिळाला. अनेक खेळाडूंची कामगिरी चमकदार होताना दिसते. मात्र त्यातही सातत्य राखण्याचा विचार केला तर पवनकुमार सेहरावत हेच नाव ठळकपणे समोर येते. पवनचा हा चौथा मोसम होता. बंगळूर संघाकडून त्याने खेळायला सुरवात केली होती. चौथा मोसमही तो बंगळूरकडून खेळला.

पाचव्या मोसमात मात्र त्याला गुजरात फ्रॅंचाईजीने घेतले. गेल्या वर्षी गुजरातने अंतिम फेरी गाठली. पण, पवनचा म्हणावा तसा ठसा उमटला नव्हता. सहाव्या मोसमात बंगळूरने पुन्हा पवनला आपल्याकडे आणले. या निर्णयाने त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण दिले. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर त्याने सहाव्या मोसमात असे काही यश मिळविले की त्याचेच नाव सर्वतोमुखी झाले. त्याचा झंझावात पाहण्यासारखा होता. पहिल्या तीन मोसमात मिळवून त्याने जेवढे गुण मिळविले, तेवढे गुण त्याने यंदाच्या मोसमातील पहिल्या सहा सामन्यांतच मिळविले. प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंवर चालून जाणे ही त्याच्या चढाईची खासियत. स्वतःहून गुण वसूल करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांच्या बचावपटूंना आव्हान देऊन त्यांना पुढे येण्यास भाग पाडणे आणि चपळाईने अलगद त्यांना टिपत गुणांची कमाई करणे ही त्याची शैली लाजवाब. गुणांचे अर्धशतक, शतक, द्विशतक ओलांडत त्याने पावणेतीनशे गुणांपर्यंत मजल मारली. सावध चढाईबरोबरच पकडीसाठी पुढे आलेल्या बचावपटूंच्या खांद्यावरून उडी मारण्याच्या त्याच्या तंत्राने तर सर्वांना चकित केले.

प्रदीपची "डुबकी' गेले दोन मोसम गाजत होती; तर या वेळी मात्र पवनच्या "फ्रॉग जंप'ने कबड्डीप्रेमींवर गारुड केले. एका हाती सामना फिरविण्याची ताकद त्याच्याकडे आपल्याकडे असल्याचे त्याने अंतिम सामन्यातही दाखवून दिले.

पूर्वार्धात पिछाडीवर असताना संघाच्या नऊ गुणांत पवनचे चार गुण होते. सामना संपताना बंगळूरच्या 48 गुणांत 22 त्याच्या एकट्याचे होते. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळातील खेळात त्याची तंदुरुस्ती तेवढीच निर्णायक ठरली. एकेक खेळाडू जखमी होत असताना पवन मात्र सर्वाधिक सामने खेळल्यानंतरही शेवटपर्यंत ताजातवाना होता. सर्वच खेळाडूंसाठी हा एक आदर्श वस्तुपाठ ठरावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition on Nammudra