पहाटपावलं : पाऊस झेलण्यासाठी जागर 

डॉ. श्रीकांत चोरघडे
Monday, 27 May 2019

समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला.

गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही वर्षे महाराष्ट्र व त्यातही मराठवाडा, विदर्भाचा काही भाग पाणीटंचाई व दुष्काळाने त्रस्त आहे.

याला कारण बेभरवशाचा व कमी पाऊस हे तर आहेच; पण पाण्याच्या नियोजनाचा अभाव हेही आहे. सरकारकडून "पाणी अडवा, पाणी जिरवा', विहिरींचे पुनर्भरण, शेततळी अशा योजना राबविल्या जात आहेत. मध्यंतरी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या "नाम फाउंडेशन'नेही अनेक गावांत जलसंधारणाची कामे स्वखर्चाने राबवली. यातून काही गावांतील पाण्याची समस्या सुटण्यास मदत झाली. 

"तुफान आलंया' कार्यक्रमात ज्या ध्वनिफिती दाखविण्यात आल्या, त्यात सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष, मुलं-मुली हिरिरीने जलसंधारणाच्या कामात सहभागी झालेले दिसले. आठ-दहा वर्षांच्या मुला-मुलींनी पालकांच्या मागे लागून पूर्ण गावाला या कामाशी जोडून घेतले. काही ज्येष्ठांनीही प्रशिक्षण घेतले व गावाला जलसंधारणाच्या कार्यात सहभागी करून घेतले. काही मुलांनी खाऊच्या पैशातून डिझेल विकत घेऊन ते "जेसीबी'साठी दिले. हजारो गावांमधील विविध वयोगटांतील गावकऱ्यांनी या कामात झोकून दिले होते.

गाव सोडून गेलेली काही माणसे श्रमदान करण्यासाठी आपल्या गावात आली. यात परदेशी स्थायिक झालेली मंडळीही होती. यात कुणी नेते नाहीत, कुणी राजकीय पक्ष नाहीत. फक्त लोकसहभाग, लोकवर्गणी या माध्यमातून ही कामे होत आहेत आणि लाखोंचा निधी उत्स्फूर्तपणे दिला जात आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात देश स्वतंत्र व्हावा म्हणून अशीच चळवळ झाली होती. त्यात देश केंद्रस्थानी होता. या चळवळीमध्ये गाव केंद्रस्थानी आहे. या स्पर्धेत पुरस्कार मिळाला तर उत्तमच, नाही तर निदान गावाची पाणीसमस्या तर सुटेल, अशा विचाराने ही चळवळ सुरू आहे. या निमित्ताने जो लोकजागर झाला आहे, त्यामुळे पाणी जपून वापरले जावे, हा संदेश अप्रत्यक्षपणे लहान-थोरांपर्यंत पोचतो आहे. आपल्या गावाचे भले व्हायचे असेल तर हेवेदावे विसरून, राजकारण बाजूला ठेवून गावांनी एकदिलाने या चळवळीत सहभागी व्हायला हवे, ही जाणीव लोकांपर्यंत पोचते आहे.

या उपक्रमामुळे पाण्याचा साठा वाढेल, पाण्याची नासाडी कमी होईल हे प्रत्यक्ष फायदे आहेतच; पण वरुणराजाने कृपा केली तर विहिरी भरतील, जमिनीतील पाण्याचा साठा वाढेल, जलयुक्त शिवारामुळे हिरवाई वाढेल, हिरवाई वाढल्यामुळे पर्जन्यमान वाढविण्याची शक्‍यता वाढेल, असे हे सकारात्मक चक्र सुरू होऊ शकते. पाण्याशी संबंधित अशा चळवळी पाणीसमस्या दूर करायला कारणीभूत ठरो आणि संपूर्ण देश सुजलाम्‌ होवो हीच अपेक्षा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Pahat Pawal Article