पुण्याचा चालता-बोलता इतिहास

निष्ठावंत साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दीची बुधवारी (१६ मे) सांगता झाली. त्यानिमित्त त्यांचे स्मरण.
MS Dixit
MS Dixitsakal

निष्ठावंत साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दीची बुधवारी (१६ मे) सांगता झाली. त्यानिमित्त त्यांचे स्मरण.

मी १९९४ साली पुण्यात आलो. नोकरी सांभाळून सांस्कृतिक विश्वात उभे राहण्यासाठी धडपडत होतो, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक स्मारक मंदिर, इतिहास संशोधक मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला , पुणे नगर वाचन मंदिर अशा अनेक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना मी श्रोता म्हणून जात होतो. त्यावेळी म.श्री. दीक्षितांची उपस्थिती कधी व्यासपीठावर तर कधी श्रोत्यांमधे असे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित असत. गोरेपान, मिश्कील डोळे, शिडशिडीत अंगकाठी, खांद्यावर शबनम अडकवलेली, शुभ्र पायजमा, नेहरू शर्टावर घातलेले जॅकेट आणि मंद मंद पावले टाकत सभागृहातील खुर्चीवर ते येऊन बसत. सभागृहातील कार्यक्रम खूप लांबला तर ते श्रोत्यांमधून व्यासपीठासमोर येत आणि व्यासपीठावरील व्यक्तींना वाकून अभिवादन करून बाहेर पडत. मला त्यांच्या अशा वागण्याची गंमत वाटत असे.

अनेक कार्यक्रमांत माझी छोटेखानी भाषणे ऐकून त्यांनी मला दाद दिली. २००५मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांची चर्चा सुरू झाली होती. मश्रींनी त्यापूर्वीच मला साहित्य परिषदेचे आजीव सभासद करून घेतले होते. पुढे निवडणुका जाहीर झाल्या. मी कार्यवाहपदासाठी उभा राहिलो आणि निवडून आलो. त्यांनी कामाच्या संदर्भात अनेक कानमंत्र दिले. मश्री परिषदेविषयी भरभरून बोलत आणि परिषदेलाच देणगी देणे कसे योग्य आहे हे देणगीदारांना पटवून देत. याबाबतीत मी अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो.

२०१६ मध्ये साहित्य परिषदेच्या पायरीला ‘मश्रींची पायरी’ असे नाव देण्याच्या कार्यक्रमात मश्रींचे सुपुत्र प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी केलेले भावपूर्ण भाषण ऐकून सभागृहही गहिवरले होते. मश्रींच्या कार्याला ‘काव्यगत न्याय’ मिळाला अशी भावना त्यांनी डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद हे मश्रींचे दुसरे घरच होते. त्यांचा आणि परिषदेचा ६७ वर्षांचा ऋणानुबंध होता. ते परिषदेत आले नाहीत असा एकही दिवस नसेल. अखेरच्या श्वासापर्यंत ते परिषदेत काठी टेकत येत राहिले. त्यांनी संपूर्ण आयुष्य साहित्यनिर्मितीसाठी आणि साहित्यसंस्थांच्या सेवेसाठी वेचले. त्याआधी मिलिटरी अकाउंट्स खात्यात त्यांनी दोन वर्षे नोकरी केली; पण तिथे त्यांचे मन रमत नव्हते. आपण भरपूर वाचावे आणि लेखन करावे, असे त्यांना वाटत होते.

श्री. म. माटे यांच्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात ते अधीक्षक म्हणून रूजू झाले. साहित्याच्या प्रेमापोटी मश्रींनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन साहित्य परिषदेतील आनंदाची फकिरी स्वीकारली. पुढे त्यांनी कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारी विश्वस्त अशी पदे परिषदेत भूषवली. साहित्य परिषदेचा इतिहास त्यांनीच लिहिला.

मश्रींच्या रक्तातच कार्यकर्तेगिरी भरून उरलेली होती. परिषदेबरोबर पुण्यातल्या अनेक संस्थांचा कारभार त्यांनी मनोभावे सांभाळला. वसंत व्याखानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, थोरले बाजीराव पुतळा समिती, पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती, श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, महाराष्ट्र चित्पावन संस्था, श्री. समर्थ रामदास अध्यासन, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ अशा किती तरी नामवंत संस्थांसाठी मश्रींनी महत्त्वपूर्ण योगदान केले.

श्री. म. माटे यांच्या सहवासात त्यांच्यातला साहित्यिक बहरत गेला, ५० पुस्तके त्यांच्‍या नावावर आहेत. अनेक स्मरणिकांचे संपादन त्यांनी केले. विपुल वृत्तपत्रीय लेखनही केली. ‘मी मश्री’ हे त्यांचे आत्मचरित्र काळाचा मोठा पट उलगडून दाखवणारे आहे. मश्री पुणे शहराचा चालता बोलता इतिहास होते. कुठलाही संदर्भ हवा असल्यास मश्रींना भेटल्यास अथवा फोन केल्यास मिळू शकतो याची खात्री महाराष्ट्रातील अभ्यासकांना होती.

मश्रींचा सहवास म्हणजे आनंददायक मैफलच असे. पैसा, पद, प्रतिष्ठा मिळावी यासाठी अनेक माणसे संस्थांवर काम करण्यासाठी उत्सुक असतात, मश्रींना या पैकी कशाचीच अपेक्षा नव्हती. निखळ साहित्यसेवेतच त्यांना परमानंद मिळत होता. मश्रींनी वैयक्तिक जीवनात गरीबी अनुभवली पण त्यांनी आपल्या कामातून संस्थांना श्रीमंत आणि समृद्ध केले.

अशी माणसे महाराष्ट्रात होती म्हणून तर संस्थांचे जाळे मजबूत होत गेले.आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे झपाट्याने सपाटीकरण होत आहे. नि:स्पृह वृत्तीने कसलीही अपेक्षा न ठेवता काम करणारे निरलस कार्यकर्ते दुर्मिळ होऊ लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मश्रींच्या कामाचे मोल जाणवते.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com