बदलती गावे : अंजीर, सीताफळाने नांदते समृद्धी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anjeer

बदलती गावे : अंजीर, सीताफळाने नांदते समृद्धी!

सासवडपासून पाच किलोमीटरवरील किल्ले मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी (ता. पुरंदर) गावात एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर फिरायचे. आता मात्र बंधारे, शेततळ्यांनी समृद्ध सोनोरी अंजीर, सीताफळ व इतर फळबागांनी बहरले आहे. फळपिकांचे हंगामानिहाय वार्षिक उत्पन्न गावाने यंदा 10 कोटींपार नेले आहे. हुकमी बाजारपेठ जवळ असल्याने तरकारीतही गाव आघाडीवर आहे.

पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख सरदार पानसे यांचा येथे वाडा आहे. त्यांनीच किल्ले पुरंदर व पुण्यावर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा सोनोरी किल्ला निर्माण केला. जेजुरीच्या मल्हार मार्तंडावरून त्यास किल्ले मल्हारगड नाव पडले. सोनोरीकरांनी अंजीर, सीताफळ व इतर फळबागांत कष्टाने इतिहास घडवला आहे. जोडीला जलसंचय आणि भूजल वाढविले, त्यामुळे आज गाव संपन्नतेच्या वाटेवर आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या छोट्या गावाचे भौगोलिक क्षेत्र 3 हजार एकर आहे. डोंगरपड, माळपड क्षेत्र मोठे असल्याने एक हजार 875 एकर क्षेत्र लागवडयोग्य आहे. अगोदर अंजीर उन्हाळी आणि सीताफळ पावसाळीच व्हायचे. दुष्काळी भागातील लहरी पावसाचा सीताफळास फटका बसायचा. आता अंजीराच्या खट्ट्या (पावसाळी) बहरास आणि जोडीला उन्हाळी, म्हणजेच मिठा बहर हंगामास गाव जय्यत तयार असते. तालुक्यात आजच्या स्थितीला सर्वाधिक अंजीर उत्पादन आणि किमान ४ ते 7 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न काढण्याचा गावाने इतिहास रचला आहे. कारण एकेकाळी टँकरवर बागा जिवंत ठेवणाऱ्‍या गावात आज विहिरी, शेततळ्याचे पाणी ठिबकने दिले जाते. गणित मांडून अंजिराचे दोन्ही हंगाम घेणारे सोनोरी हे तालुक्यात एकमेव गाव आहे.

गावात अंजिराचे क्षेत्र 325 एकरवर असून, साधारणतः एकूण 56 हजार झाडे आहेत. दोन्ही हंगामात मिळून वार्षिक चार ते पाच कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न निघते. यंदा एकरी अडीच ते तीन लाखाने 7 कोटी रुपये उत्पन्नाचे गणित गावाने गाठले आहे. सीताफळाचे क्षेत्रही सुमारे 300 एकर (५२ हजार झाडे) आहे. सीताफळाचा पूर्वी पावसाळी हंगामच असायचा. आता विहिरी, कूपनलिका, शेततळी वाढल्याने साठ टक्के बागा आगाप (उन्हाळी) बहर धरतात. सीताफळातही उन्हाळी आणि पावसाळी हंगाम पदरात पाडून घेण्याचे अफलातून गणित सोनोरीकरांकडे आहे. त्यामुळे सीताफळ हंगाम गावाला किमान तीन ते चार कोटी रुपये मिळवून देतो. फळबागांपुरते न थांबता सासवड, पुणे, मुंबई बाजारपेठ जवळ असल्याने गावातील तरुणांनी पेरू, चिकू, आंबा, बोर आदी फळपिकांवरही भर देणे सुरू केले आहे.

लगतच्या भागात सीताफळांवर प्रक्रिया करून पल्प काढला जातो. इथल्या अंजीराला जीआय मानांकन आहे. पण प्रक्रियेसाठी जादा साखरेचा अंजीर येथे पिकण्याची अजून प्रतीक्षाच आहे. मल्हारगड, पानसे वाडा, अंबऋषी देवी यांच्यामुळे येथे पर्यटक, भाविकही वाढले आहेत.

गावात काही वर्षांतच बंधारे, नाले खोलीकरणाची 25 कामे झाली. जलयुक्त शिवार अभियानातून नऊ बंधारे झाले. आता बंधाऱ्यांची एकूण संख्या 23 झाली. शेततळ्यांची संख्या 175 पर्यंत पोहोचली. शिवारात विहिरी 175 आणि विंधनविहिरी दोनशेहून अधिक आहेत. परिणामी, गावात जलसाठे वाढले. त्यामुळे पावणेसहाशे एकरच्या आसपास इतर धान्यपिके, फळभाजी, भाजीपाला, फुले, चारापिकेही घेत गावाने शेतीतून सोने पिकवले आणि समृद्धीकडे वाटचाल केली आहे. गावांत विचारी लोक असल्याने ग्रामस्वच्छता, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन, आरोग्य, शेती, पर्यावरण विषयी जनजागृतीही केली जाते.

Web Title: Pune Malhargad Fort Purandar Soneri Farmers Anjeer Sugar Apple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..