अग्रलेख :  सिंधू दिग्विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा सिंधूच्या विजयामुळे अखेर फळाला आली आहे. सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच; पण ते विजिगीषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे.

बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा सिंधूच्या विजयामुळे अखेर फळाला आली आहे. सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच; पण ते विजिगीषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे.

भारतातील २४ वर्षांची एक युवती आणि भारतातील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा स्मार्टफोनवरचा कुठलाही गेम! मात्र, या युवतीने गेल्या दोन महिन्यांत स्मार्टफोनला हातही लावला नाही आणि आपल्या मैदानी खेळावर सारे लक्ष केंद्रित केले. तिचे लक्ष्य एकच होते आणि ते म्हणजे जगज्जेतेपद. तरीही अनेकांच्याच काय, तिच्याही मनात धाकधूक होतीच आणि त्याचे कारणही स्पष्ट होते. या जगज्जेतेपदाचा करंडक अगदी ओठापाशी आला असताना, शेवटच्या क्षणी दोनदा तो तिच्या हातातून निसटला होता. त्याचे तिला जसे दु:ख होते, तसाच स्वतःवर रागही होता. मात्र, रविवारी स्वित्झर्लंडमधील बासेल या टेनिससम्राट रॉजर फेडररच्या गावात खेळताना तिने या साऱ्या भावना दूर सारल्या अन्‌ कोणताही तणाव न घेता फक्‍त खेळावरच लक्ष केंद्रित केले. अर्जुनाला जसा झाडावरील पोपटाचा डोळाच दिसत होता, त्याप्रमाणे तिला दिसत होते, ते नेटच्या पलीकडून झंझावाती वेगाने येणारे फूल. हा सामना सुरवातीपासूनच तिच्या हातात होता आणि प्रतिपक्षाच्या जाळ्यात ती एकदाही सापडली नाही, ही एकच गोष्ट संपूर्ण खेळावर तिची किती हुकमत होती, हे स्पष्ट करते. त्यामुळेच अवघ्या ३७ मिनिटांच्या खेळात तिने प्रतिपक्षावर २१-७, २१-७ अशा दोन सरळ सेट्‌समध्ये मात केली आणि जगज्जेतेपदाचा मान पटकावला! आज अवघ्या भारतवर्षानेच नव्हे, तर जगभरातील बॅडमिंटन विश्‍वाने तिला डोक्‍यावर घेतले आहे, ती आहे ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधू!

खरे तर भारताचा राष्ट्रीय म्हणावा असा खेळ फक्‍त क्रिकेटच! मात्र, एक काळ असा होता, की या खेळात आपण एकतर पराभूतच व्हायचो वा सामना अनिर्णित राखण्यातच विजयाचा आनंद मानायचो. मात्र, १९८३ मध्ये ‘आक्रित’ घडले आणि क्रिकेटचा विश्‍वकरंडक आपण थेट या खेळाच्या माहेरघरातून म्हणजे इंग्लंडमधून भारतात आणला. हा ऐतिहासिक विजय आपल्या देशातील सर्वांच्याच मनात विजिगीषू वृत्ती जागृत करून केला. आता सिंधूच्या जगज्जेतेपदामुळेही तसेच घडेल. खरे तर हा आनंद आपण दोन वर्षांपूर्वींच अनुभवू शकलो असतो; पण २०१७ मध्ये तिला जपानच्या नाओमी ओकुहाराने शेवटच्या क्षणी पराभूत केले, तर २०१८ मध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनने तिच्यावर मात केली. त्यामुळेच या दोन पराभवांनंतर अखेर ओकुहारावरच मात करून, तिने हा जगज्जेतेपदाचा करंडक पटकावला, तेव्हा ती इतकी भावनावश झाली की ‘झाले रे! अखेर मी ‘नॅशनल चॅम्पियन’ झाले रे!’ असे उद्‌गार तिच्या तोंडून बाहेर निघाले. मात्र, क्षणातच ती भानावर आली आणि तिने ‘वर्ल्ड चॅम्पियन!’ अशी  दुरुस्ती केली! अर्थात, तिचाच काय कोणाचाही क्षणभर विश्‍वास बसणार नाही, असेच हे यश होते. नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण, पुढे पुलेल्ला गोपीचंद आणि अर्थातच साईना नेहवाल या जगभरात नावाजलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंनाही या यशाने कायमच हुलकावणी दिली होती. एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपले, तेव्हा साईनाचे नाव या पदावर केव्हा ना केव्हा कोरले जाईल, अशी आशा होती. मात्र, ती दुर्दैवी ठरली. महिला बॅटमिंटनपटूंमधील पहिले रॅंकिंग साईनाला मिळाले होते; मात्र जगज्जेतेपद तिच्यापासून दोन हात दूरच राहिले. अखेर सिंधूने तो मान पटकावला. याचे श्रेय अर्थातच सिंधूची एकाग्रता आणि कौशल्यालाही आहे. त्यामुळेच केवळ राष्ट्रपती, पंतप्रधानच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

सिंधूच्या यशात तिच्याइतकाच वाटा आहे, तो तिचे प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांचा! ते केवळ तिचे प्रशिक्षकच नाहीत, तर ते ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड’ही आहेत. जागतिक पातळीवर खेळताना आणि मुख्य म्हणजे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष केंद्रित झालेले असताना, मनावर येणारा ताण हा प्रतिस्पर्ध्याला तोंड देताना येणाऱ्या ताणापेक्षाही अधिक असतो. गोपीचंद यांनी सिंधू या खेळातील कौशल्ये कशी आत्मसात करेल, एवढ्यापुरती आपली कामगिरी मर्यादित ठेवली नव्हती, तर तिच्या मनावरील ताण कमी करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जपानची अकेन यामागुची पहिल्या दोन फेऱ्यांत बाहेर पडली, तेव्हा खऱ्या अर्थाने ताण कमी झाला होता तो गोपीचंद यांच्या मनावरचा. गेल्या दोन महिन्यांतील विविध स्पर्धांमध्ये यामागुचीनेच सिंधूला अडचणीत आणले होते. त्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यामागुची असणार नाही, हे स्पष्ट झाल्याने गोपीचंद यांना सिंधूच जिंकणार, असा विश्‍वास वाटू लागला आणि सिंधूनेही तो सार्थ ठरवला. बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा फळाला आणणाऱ्या सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच, पण ते विजिगिषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे. आता अर्थातच सर्वांचे आणि विशेषत: सिंधूचे ध्येय पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिकमधील विजयाचे असणार. त्यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pvsindhu victory