esakal | ‘नाम’मुद्रा : गाथेचा निरूपणकार
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाम’मुद्रा : गाथेचा निरूपणकार

‘नाम’मुद्रा : गाथेचा निरूपणकार

sakal_logo
By
जयवंत चव्हाण

‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’कार मारुतीराव भाऊसाहेब जाधव हे सध्या ८८ वर्षांचे आहेत. राधानगरी तालुक्यातील तळाशी गावचे रहिवासी. त्यामुळे तळाशीकर गुरुजी नावाने प्रसिद्ध. १९५४ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सरधोपटपणे मध्यमवर्गीय रीतीप्रमाणे त्यांनी जिल्हा लोकल बोर्डात नोकरी धरली. प्राथमिक शाळेत ते लागले. तेव्हा पगार होता ६० रुपये. म्हणून नोकरी सोडली आणि शेतीकडे मोर्चा वळवला. मधल्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे काम केले. मग काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दलातही सक्रिय होते. त्याच काळात समाजवादी नेते एस. एम. जोशी, बापू काळदाते, मधू दंडवते, नानासाहेब गोरे यांच्या साथीने स्थानिक पातळीवर अनेक समाजोपयोगी कामे केली; पण मूळचे संस्कार वारकरी परंपरेचे होते.

मारुतीरावांचे एक काका वारकरी होते. त्यांनी गावात भजनासाठी एक घर बांधले होते. त्या घरात नंतर आळंदीहून साखरे महाराजांचे शिष्य आले होते. बापू तुकाराम जांभळे आणि श्रीधर नरहर कुलकर्णी हे दोघे तिथे ज्ञानदानाचे काम करीत.त्या वेळी मारुतीरावांना त्यांनी भगवद्‌गीता शिकवली. तेव्हापासून कीर्तन, प्रवचन, भजनाची गोडी लागली होती. १९९५ पासून म्हणजे वयाच्या साठीनंतर तळाशीकर गुरुजींनी तुकारामाच्या गाथेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला प्र. न. जोशी यांनी अर्थासह लिहिलेल्या तुकाराम गाथेचे वाचन सुरू केले. जोशींची तीन खंडांमधील गाथा वाचून त्याची टिपणे काढायला सुरुवात केली.

अनेक इतर सार्थ गाथांचाही अभ्यास केला. तुकारामांना जसे सुचले तशी गाथा होती. त्याला काही क्रम नव्हता. ती वाचताना तळाशीकर गुरुजींना गाथा विषयानुरूप असावी, अशी कल्पना सुचली. मग त्यांनी अभंगांचे अर्थ लिहून काढले आणि नंतर त्यांचे विषयवार वर्गीकरण केले. याला सुमारे २० वर्षे लागली. ३६०० पानांच्या या लिखाणाचे चार भाग झाले होते; पण प्रसिद्ध करणार कोण, असा प्रश्न होता. या नव्या स्वरूपाच्या गाथेवर एक अभिप्राय घ्यावा म्हणून गुरुजी शिवाजी विद्यापीठात पोचले. तिथे मराठी विभागाचे प्रमुख प्रा. राजन गवस यांनी हा प्रकल्प पाहिला आणि त्यांनी कुलगुरूंना दाखवला. सर्वांनाच तो भावला.

संत तुकारामांचे अध्यासन विद्यापीठात होतेच, त्याच्याच माध्यमातून ते प्रसिद्ध करावयाचे ठरले. तुकाराम अध्यासनाचे नंदकुमार मोरे यांनीही ही जबाबदारी आस्थेने पेलली आणि गाथेचे प्रकाशन झाले. गुरुजींनी कोणतीही अपेक्षा न ठेवता गाथेच्या निरूपणाचे सर्वाधिकार विद्यापीठाकडे दिले. हा ठेवा लोकांपर्यंत जावा एवढीच त्यांची इच्छा होती. गाथेमध्ये सत्य, अस्पृश्यता, आत्मज्ञानी कोण... असे अनेक विषय आहेत. गुरुजींनी त्याचे वर्गीकरण करून ८३२ विषयांची सूची केली आहे. तुकारामांचे ४६०७ अभंग त्यांनी विषयानुरूप १८०० पानांमध्ये लिहिले आहेत. शिवाय अनुक्रमांकात अधिकृत शासकीय गाथेचा क्रमांकही लिहिला आहे. त्यामुळे ही गाथा अधिक सोपी झाली आहे. आता अॅमेझॉनवरही ही गाथा उपलब्ध होणार आहे. इंद्रजीत भालेराव यांनी गुरुजींची गाथा हा तुकाध्ययनाचा कळस असल्याचे म्हटले आहे. या वयातही गुरुजींचा कामाचा उत्साह थक्क करणारा आहे.

उपकारासाठी बोलो हे उपाय,

येणेविण काय आम्हा चाड

बुडता हे जन न देखवे डोळा,

येतो कळवळा म्हणवुनी

तुका म्हणे माझे देखतील डोळे,

भोग देते वेळे येईल कळो

तळाशीकरगुरुजींचा हा आवडता अभंग. तेही तशाच प्रेरणेने काम करीत आहेत.

loading image
go to top