स्वाइप लेफ्ट, स्वाइप राइट!

राही श्रुती गणेश
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर टिंडरच्या जागी बापाचा फोटो दिसू लागतो. क्षणात अंगभर रुजलेल्या गावच्या मुळ्या टोचू लागतात. संध्याकाळ सुरू होता होता अंधार संपतो नि मोबाइल डेटा संपल्यावर रात्र संपायचं नावच घेत नाही!

स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर टिंडरच्या जागी बापाचा फोटो दिसू लागतो. क्षणात अंगभर रुजलेल्या गावच्या मुळ्या टोचू लागतात. संध्याकाळ सुरू होता होता अंधार संपतो नि मोबाइल डेटा संपल्यावर रात्र संपायचं नावच घेत नाही!

रस्त्यापलीकडे स्वेटरवर ओढणी लपेटून ती सावधपणे, पण उडत्या चालीत हॉस्टेलकडे निघालीय. आज, उद्या आणि डिग्री संपेपर्यंत भराभर वाटेल तेवढं अंतर कापून घ्यावं. जास्त दूरचा रस्ता पाहायचा प्रयत्न करायचा तरी कशाला? शहराच्या मोठ्या रस्त्यांवर ही ओढणी खांद्यावर असली की सगळे मोठे रस्ते आपल्याला आनंदानं सामावून घेतात. एरवी शहर काय आणि गाव काय, रस्त्याकडेच्या कट्ट्यावरून थेट स्वेटरच्या आतवर आरपार टोचणाऱ्या नजरा जशाच्या तशा आहेत. भारताच्या जागतिकीकरणाच्या सोबतीनं जन्मलेल्या पिढीनं बालपणी टीव्ही आणि मोबाईल घरात येताना पाहिले. आमच्या बालपणात, तरुणपणात ते घरांचे- आयुष्यांचे अविभाज्य भाग झाले. हाती स्मार्टफोन आले, व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक आलं आणि सगळं जगच हातात आलं. हाती आलेल्या सुबत्तेच्या थोडक्‍या भांडवलावर आमच्या आधीच्या पिढीनं मोठी अंतरं पार केली होती. संस्कृतीवरची मूठभर लोकांची मक्तेदारी संपून ज्ञान सगळ्यांसाठी खुलं झालं. आपली भाषा, आपल्या असण्याला मोल मिळू शिकतं, असा विश्वास वाटू लागला. शिक्षणाचं महत्त्व ओळखून पिढ्यान्‌ पिढ्या उन्हात रापलेल्या आई-बापांनी पोरांना शाळेचा रस्ता दाखवला. आई-बापांनी पोरापोरींसाठी मोठी स्वप्नं पाहून ठेवली होती. गावा-खेड्यांतून शहरात दाखल होणाऱ्या मुला-मुलींना आकाश ठेंगणं झालं. जातीपातीच्या चिखलातून तोंडदेखली का होईना, इथे सुटका झाली. लग्नाच्या वयापर्यंत का होईना, ओढणीत लपेटलेलं स्वातंत्र्य मुलींच्या हाती आलं.

पाहता पाहता खासगीकरणाच्या लाटेत रंगीबेरंगी पॅकेजिंगमध्ये ‘सगळी दुनिया मुठ्ठीमध्ये’ आली. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ वगैरे विनोदाचे विषय झाले आणि अंगावरच्या ब्रॅंड्‌सच्या संख्येवर माणसाचं मोल मोजलं जाऊ लागलं. रोज टीव्हीवरच्या जाहिरातीतून थेट घरात दाखल होणाऱ्या चकचकीत वस्तूंच्या गर्दीत मागच्या दारानं देशभरात कणाकणाने वाढणारी विषमता झाकली गेली. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आल्याबरोबर ही गुंतागुंत आणखी वाढली. एकीकडे सर्वसामान्य माणसाच्या अभिव्यक्तीसाठी मोठं व्यासपीठ खुलं झालं. मात्र हा सोशल मीडिया नवा असताना तो पैसा आणि सुनियोजित आयटी सेल्सच्या मदतीने निवडणुकीचं हत्यार बनला. फेसबुक स्क्रोल करणाऱ्या शहरी तरुणाला ट्रोल सेनेच्या मदतीने सहज खिशात घालून एकगठ्ठा मतं गोळा करता आली. मग या तरुण मतदारांची नवी व्हर्च्युअल ओळखपत्रं तयार झाली. व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवरून लोकांना शोधणं सोपं झालं. सोशल मीडियाचं नवं समांतर जग उभं राहिलं. मात्र या जगात सत्तेला प्रश्न विचारणारे समांतर आवाजही उभे राहिले. तिथल्याच अवजारांनी तिथे काही बांधण्याची, घडवण्याची शक्‍यता तयार झाली.

आज बेरोजगारीने नवे उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. ‘खाउजा’च्या कोवळ्या दिवसांत आई-बापांनी आपल्यासाठी आणि स्वतःसाठी पाहिलेली स्वप्नं खांद्यावर घेत भविष्यातल्या गडद अंधाराकडे निर्जीवपणे पाहणंच आजच्या तरुणाईचं लक्षण झालं आहे; आणि स्वप्नं आणि वास्तवातल्या दरीवर पूल बांधायचं आश्वासन देणारी नवनवी ॲप्स आम्ही डाऊनलोड करत राहतो. नव्वदच्या दशकातल्या सुरवातीच्या दिवसांत दिसलेली ‘स्टेट्‌स’ आणि ‘स्टॅंडर्ड’ची स्वप्नं आणि उद्याला दिसणारा अभाव यातल्या दरीवरच आजची नवी व्हर्च्युअल अर्थव्यवस्था उभी राहू पाहते आहे. सामाजिक आणि राजकीय निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याचा एकीकडे आभास निर्माण केला जातो आणि दुसरीकडे चर्चा आणि वादविवादाची सार्वत्रिक भीती जोपासली जाते. प्रेमात पडण्याच्या शक्‍यता व्हर्च्युअली उपलब्ध होतात खऱ्या; पण प्रेमात पडून आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना आपल्याच पिढीत मान्यता मिळत नाही. घराघरांमध्ये धर्माचा बडेजाव आधीएवढा आता राहिला नाही, असं वाटत असतानाच आपली पिढी अधिक धार्मिक होते, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी पुन्हापुन्हा हिंसक होते.

आपल्या हातात रिमोट आहे, त्यामुळे आपण चॅनेल बदलतोय असं आपल्याला वाटतं; पण सगळ्या चॅनेल्सवर एकच कार्यक्रम सुरू आहे. एकच फोटो टिंडरच्या रिळावर फिरतोय आणि रिकामे दिवस आणि रिकाम्या रात्री भरून काढण्यासाठी जगावेगळ्या प्रेमाच्या आशेवर वेशीकडच्या रस्त्याकडेला बसून तो स्क्रीनवर बोटं फिरवत राहतो, स्वाइप लेफ्ट, स्वाइप राइट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahi shruti ganesh write youthtalk article in editorial