आया रे ‘मामा’, लोगों रे लोगों...

आया रे ‘मामा’, लोगों रे लोगों...
आया रे ‘मामा’, लोगों रे लोगों...

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’  म्हणणं अन्‌ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याच दिवशी भोपाळच्या दशहरा मैदानात गांधींच्याच उपवासअस्त्राचा वापर करणं, हा बहुतेक योगायोगच असावा. शेतकरी आंदोलनादरम्यान मंदसौरमध्ये गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू, हिंसक आंदोलनाचं अन्यत्र पसरलेलं लोण पाहता अन्य कुण्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाग्रस्त भागाला भेट दिली असती, लोकांना शांततेचं आवाहन केलं असतं. तथापि, शिवराजसिंहांनी धक्‍का दिला. शांतता नांदावी म्हणून शनिवारी मैदानावर तंबू ठोकून, मागे महात्मा गांधी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या तसबिरी लावून उपवास सुरू केला. पत्नी साधना सिंह बाजूला होत्या. ...म्हणे गोळीबारातल्या बळींच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानुसारच अठ्ठावीस तासांनंतर रविवारी दुपारी नारळपाणी घेऊन उपवास सोडला.

शिवराजसिंहांना अख्खे राज्य प्रेमानं ‘मामा’ म्हणतं. त्या प्रेमाचा त्यांना राजकीय फायदा झालाय. ‘लाडली लक्ष्मी’सारख्या योजना राबवून त्यांनी ‘मामापण’ बऱ्यापैकी सिद्धही केलं; पण शेतीनं त्यांना अडचणीत आणलंय. शेती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, नाजूक विषय आहे. तोच परंपरागत व्यवसाय असणाऱ्या किरार समाजाचे ते आहेत. १९९० मध्ये सिहोर जिल्ह्यातल्या बुधनीमधून पहिल्यांदा आमदार, पुढच्याच वर्षी विदिशातून खासदार अन्‌ पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्यानंतर साडेबारा वर्षांपूर्वी, नोव्हेंबर २००५ मध्ये ते मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून मध्य प्रदेशचा कृषीविकास अन्य राज्यांसाठी हेवा वाटण्याचाच विषय आहे. खास करून तिथल्या संरक्षित ओलिताचं, कमी भांडवलाच्या बागायतीचं देशाला कौतुक आहे. त्या शक्‍तिस्थळावरच आता घाव बसलाय.

माळवा प्रांत मध्य प्रदेशाचं अन्नधान्याचं कोठार आहे. इंदूर हे राज्याचं कृषी, आर्थिक केंद्र आहे. गहू-सोयाबीनच्या शेतीनं तिथल्या शेतकऱ्यांचं जगणं समृद्ध केलं; पण अलीकडं अवकळा आलीय. शेतमालाचे भाव कोसळलेत. विशेषत: अडीच-तीन वर्षांपूर्वीचा सोयाबीनचा साडेचार हजार रुपये क्विंटलचा भाव पंचवीसशे-सत्तावीसशेवर घसरलाय. इंदूर, धार, उज्जैन, नीमच, मंदसौर, रतलाम, खंडवामधल्या हिंसक आंदोलनांची कारणं केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणात दडलीत; पण शिवराजमामांना स्पष्ट बोलता येत नसावं. मंदसौरच्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावर शिवराजमामांचं सरकार, भाजप व केंद्र सरकारवर लोक तुटून पडले होते. नंतर मामांचा उपवास टिंगलटवाळीचा विषय बनला. भाजप समर्थकांकडून ‘शिवराजफॉरपीस’ वगैरे ‘हॅशटॅग’ जोरात चालवले गेले. मध्य प्रदेश सरकारनं त्यांच्या कार्यकाळात नोंदवलेल्या कर्तबगारीचे गोडवे गायिले गेले. त्याउलट उपवास ही नौटंकी असल्याच्या पोस्ट ट्‌विटर, व्हॉटस्‌ॲपवर सुरू झाल्या. व्यापमं घोटाळ्याला उजाळा दिला गेला. दोनेक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांची ‘पालखी’ केल्याचा त्या वेळचा फोटो पुन्हा वापरून, ‘व्यापमं घोटाळा व मंदसौरच्या गोळीबारात गेलेल्या बळींची हवाई मोजणी करण्यासाठी मुख्यमंत्री निघालेत’, अशी कडवट टिप्पणी केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही टीकेतून सुटले नाहीत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांनी ‘सेल्फी विथ फार्मर्स’ हे ‘ॲप’ शोधल्याची टीका झाली. ‘‘आया रे मामा, लोगों रे लोगों, फर्जी है मामा, लोगों रे लोगो’’, हे ‘ट्‌विट’ लक्ष्यवेधी होतं.

भाजप-काँग्रेसचं व्हिडिओयुद्ध
मंदसौरमधल्या हिंसाचारानंतर भाजप व काँग्रेसमध्ये व्हिडिओयुद्ध सुरू झालंय. शिवपुरीच्या आमदार शकुंतला खाटीक यांचा करैरा इथं आंदोलकांना, पोलिस ठाण्याला आग लावा म्हणून सांगणारा व्हिडिओ, तसंच आमदार जितू पटवारी यांचा तसाच आंदोलकांना उचकावणारा व्हिडिओ भाजपनं सोशल मीडियातून समोर आणला. हिंसाचारात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपकडून जोरदार वाजवला गेला. राहुल गांधींना दुचाकीवर मंदसौरला नेण्याचा प्रयत्न करणारा जितू पटवारीच होता. प्रत्युत्तर म्हणून बब्बू दरबार नावाचा भाजपचा नेता इंदूरजवळ बेतमा इथं थेट कार्यकर्त्यांना दंडुक्‍यांचं वाटप करत असल्याचा व्हिडिओ समोर आणला. शेतकऱ्यांचं मूळ दुखणं अन्‌ मागण्या राहिल्या दूर अन्‌ हे राजकीय आरोप-प्रत्यारोपच ‘व्हायरल’ झाले. कारण स्पष्ट आहे, यंदाचं वर्ष संपता संपता लगतच्या गुजरातमध्ये तर आणखी दीडेक वर्षात मध्य प्रदेश व राजस्थानच्या निवडणुका आहेत.

श्रीमंत माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com