ये हृदयीचे ते हृदयी! Heart Transplant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Transplant
ये हृदयीचे ते हृदयी!

ये हृदयीचे ते हृदयी!

एका मानवी हृदयाचे प्रत्यारोपण दुसऱ्या मानवी शरीरात करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. ते केले ते डॉक्टर ख्रिश्चियान बर्नार्ड यांनी. ३ डिसेंबर १९६७ रोजी बर्नार्ड यांनी जगातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि जगाला अचंबित केले. बर्नार्ड यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने...

हृदयापासून मूत्रपिंडापर्यंत कोणताही अवयव काम करेनासा झाला तर रुग्णाचा मृत्यू होणे हा निसर्गनियम झाला. तथापि संशोधक हे सातत्याने मानवी आरोग्य निरामय कसे होऊ शकेल, यावर पर्याय आणि मार्ग शोधत असतात. जर एखाद्या रुग्णाचा अवयव निकामी झाला, तर त्या ठिकाणी अन्य कोणाच्या अवयवाचे प्रत्यारोपण करता येणार नाही का, असा प्रश्न संशोधकांना सतावत होता. त्यादृष्टीने काही शल्यचिकित्सकांनी प्रयोगही केले होते; तरी एका मानवी हृदयाचे प्रत्यारोपण दुसऱ्या मानवी शरीरात करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. ते केले ते डॉक्टर ख्रिश्चियान बर्नार्ड यांनी. ३ डिसेंबर १९६७ रोजी बर्नार्ड यांनी जगातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि जगाला अचंबित केले. आता अशा शस्त्रक्रिया अनेक देशांत होतात आणि त्यात भारतही आहे. या सगळ्याचा पाया ज्यांनी घातला, त्या बर्नार्ड यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे.

८ नोव्हेंबर १९२२ रोजी दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले बर्नार्ड यांचे वैद्यकीय शिक्षण त्याच देशात झाले आणि त्यांनी मेंदुज्वरावर संशोधन केले. ते पेशाने डॉक्टर पण पिंड संशोधकाचा. त्याच जिज्ञासेतून त्यांनी श्वानांच्या आतड्यांचा अभ्यास केला. श्वानांच्या नवजात पिल्लांमध्ये जर आतड्यांत जन्मतः दोष असला तर तो प्राणघातक ठरू शकतो. यावर वैद्यकीय उपाय योजण्यासाठी जवळपास नऊ महिने बर्नार्ड यांनी संशोधन केले आणि अखेरीस अर्भकाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात येणाऱ्या अडथळ्यांवर उपाय योजणारे तंत्र विकसित केले. दहा पिल्लांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलेच; पण ब्रिटन, अमेरिकेतील शल्य चिकित्सकांनीदेखील ते तंत्र वापरले रुग्णावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ करताना त्याचे रक्त प्राणवायू-संपृक्त ठेवण्यासाठी श्वानाचे फुफ्फुस वापरता येऊ शकते, असे कॅम्पबेल यांनी सिद्ध केले होते. किंबहुना एका तेरावर्षीय मुलावर तशी शस्त्रक्रिया करताना ते तंत्र कॅम्पबेल यांनी यशस्वीपणे वापरले होते. तत्कालीन सोव्हिएत युनियनला जाऊन तेथे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या प्रांतातील अग्रणी समजले जाणारे व्लादिमिर देमीखोव यांची त्यांनी भेट घेतली. देमीखोव यांनी प्राण्यांवर अशा शस्त्रक्रिया केल्या होत्या. किंबहुना प्रत्यारोपणाला ‘ट्रान्सप्लांटॉलॉजी’ हा शब्दच मुळी देमीखोव यांनी दिला आहे. बर्नार्ड यांनी अंतराने दोनदा त्यांची भेट घेतली आणि त्यांचे संशोधन कार्य पाहून बर्नार्ड इतके प्रभावित झाले की, मानवात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य आहे, या निष्कर्षाप्रत ते पोचले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बर्नार्ड यांनी ऑक्टोबर १९६७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत केली. १९६४मध्ये अमेरिकेत जेम्स हार्डी यांनी पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती; पण त्यासाठी त्यांनी चिपांझींचे हृदय एका मरणासन्न रुग्णावर प्रत्यारोपित केले; तो रुग्ण तासभर जगला; पण शुद्धीवर न येताच गतप्राण झाला. नॉर्मन शमवे यांनी अमेरिकेत श्वानांवर हृदय प्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि अशी श्वाने वर्षभरही जगली होती. बर्नार्ड यांनी केलेल्या अशा शस्त्रक्रिया फारशा यशस्वी ठरल्या नव्हत्या. मात्र तरीही मानवी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची जोखीम बर्नार्ड यांनी पत्करली हे विशेष. ही घटना ऐतिहासिक होती. रुग्ण पुढे फार काळ जगू न शकल्याने अर्थातच बर्नार्ड यांच्यावर टीका झाली; विशेषतः शस्त्रक्रियेच्या यशाचा त्यांचा दावा अतिरंजित होता असा आक्षेप नैतिकतावाद्यांनी घेतला. पण बर्नार्ड यांचा हेतू निखळ होता. पुढे आणखी सुधारणा घडवत, ‘इम्युनोडिप्रेसंट’ औषधांची मात्रा तुलनेने कमी करून त्यांनी पुढचे पाऊल टाकले. एका कृष्णवर्णीय तरुणाच्या हृदयाचे प्रत्यारोपण एका श्वेतवर्णीय निवृत्त दंतवैद्यावर करण्यात आले होते. टोकाचा वर्णविद्वेष असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेत ही एका अर्थाने क्रांतिकारक घटना होती. संधिवातामुळे बोटांच्या हालचालींना मर्यादा येईपर्यंत बर्नार्ड शस्त्रक्रिया करीत होते. नव्या सहस्रकाच्या प्रारंभीच या थोर संशोधकाचे निधन झाले.

जगभरात वर्षभरात सुमारे साडेतीन हजार हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येतात. आधुनिक तंत्रज्ञान, औषधोपचारांतील सम्यक ज्ञान आणि अनुभव यांमुळे या शस्त्रक्रिया यशस्वी ठरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे आणि त्यामुळे रुग्णांना जीवदान मिळत आहे. भारतात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे प्रयोग १९७०च्या दशकात झाले होते; ते जरी यशस्वी ठरले नाहीत तरी ते धाडसी होते. त्यानंतर १९९४ साली ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ अस्तित्वात आला आणि त्याच वर्षी भारतात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या सगळ्याचा पाया घातला तो बर्नार्ड यांनी. त्यापूर्वीच्या अशा शस्त्रक्रिया या प्राण्यांवर झाल्या असताना आणि कोणताच डॉक्टर मानवावर तशी शस्त्रक्रिया करण्यास धजावत नसताना बर्नार्ड यांनी धोका पत्करला. ‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या अवयवाचा अन्य रुग्णांना जीवदान देण्यासाठी उपयोग होऊ शकतो हेही बर्नार्ड यांनी सिद्ध केले आणि त्यामुळे पुढे अशा शास्त्रक्रियांना दिशा मिळाली. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ प्रत्यारोपण करून मरणासन्न रुग्णांना जीवदान देता येते या क्रांतिकारक शस्त्रक्रियेचा पाया रचणे हे डॉ. ख्रिश्चियान बर्नार्ड यांचे सर्वांत मोठे योगदान म्हटले पाहिजे.

पहिले हृदय प्रत्यारोपण

३ डिसेंबर १९६७च्या सकाळी बर्नार्ड यांनी ५४ वर्षीय लुई वॉशकांसी या रुग्णावर ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया सुमारे पाच तास चालली आणि तीसएक जणांचा चमू या शस्त्रक्रिया प्रक्रियेत सहभागी होता. २५ वर्षीय डेनिसी डार्व्हल या युवतीला अपघात झाला होता आणि ती ‘ब्रेन डेड’ झाली होती; पण तिचे हृदय सुस्थितीत होते. त्या हृदयाचे प्रत्यारोपण वॉशकांसी यांच्या शरीरात करण्यात आले. या शस्त्रक्रियेच्या यशाची शक्यता ८० टक्के आहे, असा दावा बर्नार्ड यांनी केला होता; मात्र वॉशकांसी हे त्यांनतर केवळ १८ दिवस जगले; अर्थात त्यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडून नव्हे, तर न्यूमोनियाने झाला. नव्याने प्रत्यारोपण झालेला अवयव शरीराने स्वीकारावा म्हणून जी ‘इम्युनोडिप्रेसंट’ औषधे देण्यात येतात, त्याने प्रतिकारशक्तीचे दमन होते. त्यांच्या अतिवापराने वॉशकांसी यांना मृत्यूने गाठले. मात्र तरीही जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणून याची नोंद झाली.

rahulgokhale2013@gmail.com

loading image
go to top