पाकिस्तानातील चहाचे वादळ !

पाकिस्तानात चहा लोकप्रिय असला तरी तेथे चहाचे उत्पादन फारसे होत नाही.
Tea
Teasakal
Summary

पाकिस्तानात चहा लोकप्रिय असला तरी तेथे चहाचे उत्पादन फारसे होत नाही.

पाकिस्तानचे नियोजन खात्याचे मंत्री एहसान इकबाल यांनी नागरिकांना चहा पिण्याचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केल्याने नव्या वादाला उकळी फुटली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीने केलेले हे आवाहन नसून देशाच्या ढासळत्या आर्थिक प्रकृतीच्या चिंतेने केलेले असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या ते गळी उतरलेले नाही. समाजमाध्यमांवरून इकबाल यांच्या आवाहनावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्यांपासून उच्च्भ्रू समाजांपर्यंत चहाला लाभलेली कमालीची लोकप्रियता पाहता या पेयाला चैन मानणे नागरिकांना पसंत पडणारे नाही.

पाकिस्तानात चहा लोकप्रिय असला तरी तेथे चहाचे उत्पादन फारसे होत नाही. २०२० मध्ये सुमारे ६४ कोटी ६० लाख डॉलर किंमतीच्या चहाची आयात पाकिस्तानने केली होती आणि जगभरातील तो चहाचा अव्वल आयातदार देश ठरला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांतच पाकिस्तानने ५३ कोटी २० लाख डॉलरचा चहा आयात केला आहे. गेल्या वीस वर्षांत पाकिस्तानने चहाच्या केलेल्या आयातीत तब्बल ३२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तेव्हा पाकिस्तानातील नागरिकांना रोजचा सरासरी तीन कप चहा पिता यावा म्हणून पाकिस्तानला केवढे परकी चलन खर्ची करावे लागत असेल, याचा अंदाज येऊ शकतो. एकट्या खाद्यपदार्थांच्या आयातीवर पाकिस्तानचा वार्षिक नऊ अब्ज डॉलर इतका खर्च होतो. त्यातील सुमारे पावणेआठ अब्ज डॉलर इतका खर्च यंदाच्या आर्थिक वर्षात यापूर्वीच झाला आहे.

गेल्या काही काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे आणि शहाबाज शरीफ यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यावरही गेल्या दोन महिन्यांत या स्थितीत कोणताही गुणात्मक फरक पडलेला नाही. किंबहुना फेब्रुवारीत पाकिस्तानकडे १६ अब्ज डॉलरचा परकी चलन साठा होता. तो मे महिन्यापर्यंत अवघा दहा अब्ज डॉलर इतकाच शिल्लक राहिला आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत हा निम्माच आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी पाकिस्तानची आर्थिक साह्यासाठी चर्चा सुरु असली तरी आपल्या अर्थव्यवस्थेला शिस्त लावावी, ही अशावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पूर्वअट असते. साहजिकच पाकिस्तान सरकारला काही कटू निर्णय घेणे भाग आहे आणि परकी चलन येनकेनप्रकारे वाचविणे क्रमप्राप्त आहे.

पाकिस्तानी रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. एका डॉलरमागे २०८ रुपये इतकी ही घसरण आहे. चलनफुगवट्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. श्रीलंकेत त्याचे प्रमाण ३९ टक्के आहे, तर पाकिस्तानात १४ टक्के आणि आशियात सर्वाधिक चलनफुगवट्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. साहजिकच चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर पाकिस्तानने निर्बंध आणले आहेत. त्याने फारसा आधार मिळणार नाही, कारण त्यातून केवळ सहा अब्ज डॉलर वाचतील. गेल्या आठवड्यात तेथील पेट्रोल-डिझेलच्या अनुदानात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आणि आता पेट्रोलची किंमत लिटरमागे २३३ रुपये झाली आहे. इम्रान पायउतार झाला तेव्हा ही किंमत दीडशे रुपये इतकी होती. विजेच्या कपातीमुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि त्यावर उपाय म्हणून पंजाब आणि सिंध प्रांतांच्या प्रशासनाने दुकाने बंद करण्याची वेळ रात्री नऊची करण्याचे फर्मान काढले आहे. यातच पुढचा क्रमांक चहाचा लागला आहे. सरकारी स्तरावर कमालीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी यांमुळे पाकिस्तानसमोर भीषण आर्थिक संकट उभे आहे. मात्र त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी चहा पिणे कमी करावे हा दात करून पोट भरण्याचा प्रकार म्हणावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com