जाणा ई-लर्निंगचे तंत्र आणि मंत्र

e-learning
e-learning

कोरोनामुळे घरात अडकलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोर ई-लर्निंग हा मार्ग पुढे आला. 

ई-लर्निंगचे मुख्य दोन मार्ग असतात. १) शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेला समोरासमोर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेला आभासी (व्हर्चुअल) क्लास. 
२) शिक्षक लिखाण, चित्र, ध्वनी, व्हिडिओ आदींच्या माध्यमातून शिकण्याचे साहित्य तयार करतो आणि विद्यार्थांच्या सोयीप्रमाणे वेळ मिळेल तेव्हा सीडी, इंटरनेट, टीव्हीवर बघतो आणि विषय शिकतो. यात दोघे एकमेकांशी एकाच वेळी संवाद साधू शकत नाहीत. 

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पहिल्या मार्गाकडे वळतात. त्या वयात शिकताना संवादाची जास्त गरज असते. दुसऱ्या मार्गासाठी चांगल्या प्रतीचे आणि लक्षवेधक शिकण्याचे साहित्य तयार करणे हे वेळखाऊ आणि महागडे असते. 

व्हर्चुअल क्लासचे पैलू 

काही आठवड्यांत अनेक क्लास, शाळा, महाविद्यालयांचे ई-लर्निंगची (व्हर्चुअल क्लास) पद्धत आणि त्या वर्गाचे केलेले रेकॉर्डिंग बघितल्यावर ताबडतोब लक्षात आलं की दोष ई-लर्निंग तंत्रज्ञानात नसून राबविण्यात आहे. सर्वच ठिकाणी व्हाईटबोर्डसमोर कॅमेरा ठेवून क्लास घेतला जात होता. कॅमेरा फळ्यावर लिहिल्या जाणाऱ्या अक्षरावर केंद्रित करायचा की माणसावर, हा प्रश्‍न होता. यातील वापरलेले इतर मार्गही ठीक नव्हते. 
ई-लर्निंगमधील ४ मुद्दे विचारात घेतले पाहिजेत. 

तंत्रज्ञानाची बाब : 
ऑनलाइन क्लाससाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. शिकविणाऱ्याकडे आणि शिकणाऱ्याकडे इंटरनेटचा वेग चांगला असल्यास अपेक्षित परिणाम मिळतात. शिक्षण खऱ्या वर्गातल्यासाखेच किंवा त्याहूनही परिणामकारक करण्यासाठी डिजिटल बोर्ड, डिजिटल पॅड आदी साधने आहेत. यामध्ये फळा पुसण्याची गरज भासत नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिकविण्याची तंत्रे : 
नेहमीच्या वर्गात विद्यार्थी पाहिजे तेव्हा शिक्षकाकडे आणि पाहिजे तेव्हा फळ्याकडे पाहतो. त्याला दोन्ही पूर्ण दिसत असतात. आपण काय शिकवितोय त्याप्रमाणे इथे मात्र, फक्त स्क्रीनवर फळा दाखवायचा व आवाज ऐकावयाचा, केव्हा व्हिडिओमधून शिक्षकाचा चेहरा दाखवायचा, केव्हा शिक्षक पूर्णपणे दाखवायचा आणि केव्हा फळा व व्हिडिओ दोन्ही दाखवायचा, हे एकाच तासात वेळोवेळी बदलावे लागते. गोष्टीचे काठिण्य, विषयातील कुठला भाग आपण शिकवतोय, विषयाचा परिचय देतोय की परिचय संपवून आपण त्यातील विविध उदाहरणे सोडवतोय, खोलात जाऊन काही अभ्यासतोय का? आदी गोष्टींवर स्क्रीनवर काय काय दाखवायचे हे ठरते. 

विद्यार्थ्यांची मानसिकता : 
नेहमीच्या वर्गात २ मिनिटाची शांतता, काहीच घडत नसल्यास मुलांचं लक्ष विचलित होते. आभासी जगात समोर ३० सेकंद काही न झाल्यास विद्यार्थी मनाने दुसऱ्या जगात जाऊ शकतो. एका वेळी अनेक मुले व्हर्चुअल क्लासमध्ये येतात आणि शिक्षक जेव्हा ‘मी बोलतो, तुम्ही फक्त ऐका’ हे बराच वेळ राबवितो तेव्हा मुलांचे लक्ष जास्त काळ केंद्रित होऊ शकत नाही. तंत्रज्ञान आणि त्यांची वैशिष्टये योग्य मार्गाने वापरून एवढ्या विद्यार्थ्यात परस्पर संवादी क्लास कसा चालवायचा हे माहीत असले, तरच हे फक्त स्वगत असलेले एकतर्फी भाष्य थांबते. 

विद्यार्थ्यांच्या सामाजिक नात्याचे भान : 
मुले शिकायला एकत्र जमतात तेव्हा काही दिवसांतच त्यांचे आपापसात सामाजिक नाते तयार होते. तंत्रज्ञानाची काही वैशिष्ठ्ये वापरून विद्यार्थी शिकताना व इतर थोडा वेळही छोटे छोटे आभासी गट करून त्यांचे एकमेकांशी संवाद, (आभासी) मिसळणे हे उपलब्ध करून देता येते. अर्थात हे शिकलेले पक्के करायलाही उपयुक्त ठरते. 

शिकविण्यातील ऊर्जा : 
आपण हे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून बघतोय. मात्र शिक्षकाला शिकविण्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचे काय, असेही शिक्षक भेटले की त्यांना असे शिकण्यातून थकवा, निराशा आलीये. नेहमी विद्यार्थी समोर दिसतात. त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरून शिक्षकाला ऊर्जा आणि समाधान मिळते. चांगला शिक्षक खऱ्या क्लासमध्ये शिकवताना वर्गात कितीही मुले असली तरीही प्रत्येकाकडे नजर टाकत असतो. त्या नजरेने ते दोघे हा वर्ग सुरू असताना एकमेकांशी बांधलेले असतात. आभासी जगात हे कुठल्या मार्गाने करायचे? 

ई-लर्निंग चे फायदे : 
व्हर्चुअल क्लास या माध्यमातून शिक्षकाला लांब राहणारे विद्यार्थी मिळू शकतात आणि विद्यार्थ्याला उत्तम शिक्षकही. घरून शिकताना मुलांचा जाण्यायेण्यातला वेळ, पैसे, श्रम वाचतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिकण्याला/शिकविण्याला नेहमीच्या वर्गातील पद्धतीपेक्षा अधिक आकर्षक बनवण्याचीही यात क्षमता, व्याप्ती आहे. ई-लर्निंगमधील कुठेलेही तंत्रज्ञान हे शिक्षकालाही अजून सक्षम करण्यासाठी आहे. 

ई-लर्निंगचे भविष्य ः 
लादलेले ई-लर्निंग केवळ पुढील दोन-तीन महिन्यांसाठी नसेल. लॉकडाउननंतर क्लासच्या क्षमतेच्या अर्ध्या क्षमतेने वर्ग भरवायला परवानगी दिली गेल्यास सुरक्षेची हमी आल्याशिवाय किती पालक आपल्या पाल्यांना वर्गात पाठवतील यात शंकाच आहे. अर्ध्या क्षमतेने वर्ग भरल्यास असे सर्वांसाठी वर्ग दुपटीने घेणार की याला तंत्रज्ञान काही वेगळे मार्ग देते ते अवलंबणार हे आपल्याला बघायला मिळेल. एकदा प्रभावी ई-लर्निंगवर पकड आल्यास लॉकडाउन पूर्ण उठल्यावरही हे नेहमीच्या वर्गातील पद्धतीला पूरक म्हणून राहू शकेल. 

विविध पैलू लक्षात घेऊन ई-लर्निंगची समग्रपणे बांधणी करून राबविल्यास विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठीही ते प्रभावी माध्यम आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com