सामाजिक जाणिवेतून ‘ज्ञानयात्रा’ पुढे नेऊ

मराठी विश्वकोशाला ६१ वर्षांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. मे. पुं. रेगे आणि प्रा. रा. ग. जाधव हे मंडळाचे पहिले तीनही अध्यक्ष त्यांच्या चतुरस्र विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होते.
Raja Dixit
Raja DixitSakal
Updated on

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा दीक्षित यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नवी जबाबदारी सांभाळण्यामागची भूमिका त्यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केली.

मराठी विश्वकोशाला ६१ वर्षांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. मे. पुं. रेगे आणि प्रा. रा. ग. जाधव हे मंडळाचे पहिले तीनही अध्यक्ष त्यांच्या चतुरस्र विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी जे पद भूषवलं, त्यावर आपल्याला काम करायचं आहे, याची नुसती जाणीवच कार्यप्रवृत्त करणारी आहे. म्हणून त्यांचं कार्य नजरेसमोर ठेवून मी कार्यरत राहणार आहे. त्याच्यानंतरच्या माझ्या तीन पूर्वसुरी अध्यक्षांनी आपापल्या पद्धतीने विश्वकोशासाठी जे काही चांगलं काम केलेलं आहे, ते नजरेसमोर ठेवून आणि त्याविषयी आदर राखूनच माझं काम पुढे नेणार आहे.

विश्वकोशाचे २० खंड, एक सूची खंड आणि कुमार विश्वकोशाचे तीन खंड प्रसिद्ध झाले आणि चवथा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जवळ जवळ हे काम संपलंय, असे वाटू शकेल. परंतु विश्वकोशाला पूर्णविराम नसतो. ते काम सतत चालू असते. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडांमधल्या विविध नोंदी अद्ययावत करणे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. काही त्रुटी राहिल्या असल्या तर त्या दूर करणे, चुका राहिल्या असल्यास दुरुस्त करणे, त्यादृष्टीने पुनर्लेखन करणे, नवीन ज्ञानाच्या प्रकाशात त्यांमध्ये अद्ययावत माहितीची भर घालणे, हे संगळं आवश्यक आहे. खंड प्रकाशित होऊन बराच काळ लोटलाय. उदा. विश्वकोशाचा पहिला खंड होता १९७६ मध्ये म्हणजे सुमारे ४५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला. विसाव्या खंडाचे प्रकाशन २०१५चे.

सूचीचा जो खंड आहे अलीकडे २०१९-२० साली प्रकाशित झालेला आहे. या सर्व खंडांमधील नोंदींव्यतिरिक्त अनेक नवीन विषयांची दखल घ्यावी लागेल. उदा., २० खंड प्रकाशित झाले तेव्हा कोरोना हा शब्दसुद्धा नव्हता. पण आता त्याची माहिती विश्वकोशात देणे आवश्यक होणार! अद्ययावतीकरण हाती घेणे हे माझे पहिले महत्त्वाचे काम असेल. सध्याचे युग ज्ञान-विस्फोटाचे, संज्ञापन-क्रांतीचे, जागतिकीकरणाचे युग आहे. ज्ञानापासून वंचित राहिलेल्या अनेक समूहांच्या जागृतीचे हे युग आहे. काळाचा हा नवा संदर्भ लक्षात घेऊन नवे ज्ञान निर्माण निर्माण करणे आणि त्याविषयी लिहिणे, एवढेच नव्हे तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ते नव-तंत्रज्ञान विश्वकोशाला लागू करणे, ही गरज आहे. आधीचे संपादक दिलीप करंबेळकर यांनी ज्ञानमंडळं सुरू केली, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. ते काम मी चालू ठेवेन. प्रत्येक अध्यक्षाच्या काळात काही चांगल्या गोष्टी होत असतात. डॉ. श्रीकांत जिचकार यांना अकाली मृत्युमुळे पुरेशी संधी मिळाली नाही. डॉ. विजया वाड यांनी कुमार विश्वकोशाच्या बाबतीत चांगलं काम केलेले होतं. तेही पुढे न्यायला हवं.

सर्वसामान्य माणसापर्यंत ...

विश्र्वकोशाचे काम आहे एका बाजूने अभ्यासाच्या स्वरूपाचं, ज्ञानशास्त्रीय असं काम आहे. ही बांधिलकी आहेच. पण तिच्या जोडीला सामाजिक बांधिलकीसुद्धा महत्त्वाची. मी जाणीवपूर्वक एक शब्दप्रयोग वापरतो - ज्ञानाचे लोकशाहीकरण. त्याची आज खूप गरज आहे. आपल्यासारख्या देशामध्ये ज्ञानापासून वंचित राहिलेले अनेक समूह आहेत आणि खेड्यापाड्यापर्यंत, आदिवासी भागापर्यंत ज्ञान पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी एकतर ज्ञाननिर्मिती करायला पाहिजे. दुसरे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड न करता, पण सुलभ रीतीने ते ज्ञान मांडलं पाहिजे. ‘सकाळ’चे नानासाहेब परुळेकर यांची बातमीविषयीची दृष्टी अशी होती. तिसरं म्हणजे नवी परिभाषा घडवणं हे विश्वकोशासारख्या माध्यमांचं एक महत्त्वाचं काम आहे. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत हे ज्ञान कसं पोहोचायचं, याकडे लक्ष द्यावे लागेल. खंडांचे वितरण अधिक प्रभावी करण्याची गरज आहे.

भाषेचा विकास

प्रत्यक्ष विधायक कार्याच्या रूपाने भाषावृद्धी करण्यावर माझा विश्वास आहे. विश्वकोश हे भाषावृद्धीचं, भाषासामृद्धीचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणून नवी ज्ञाननिर्मिती करून आणि नवी परिभाषा घडवून (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बोधवाक्याप्रमाणे) ती ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवायला हवी. मुक्त विद्यापीठात कुलगुरू डॉ. राम ताकवले यांची टीममधील सदस्य म्हणून माझा अनुभव मला या कामी उपयोगी पडेल. विश्वकोशाच्या पहिल्या तिन्ही संपादकांचा एका बाजूने राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश यांच्याशी आणि दुसऱ्या बाजूला वाईतील प्राज्ञपाठशाळेशी, नवभारत मासिकाशी निकटचा संबंध होता. मराठी विश्वकोश आणि वाई, विशेषत: प्राज्ञपाठशाळा यांचं एक जैविक नाते आहे. हे जैविक, भावनिक, बौद्धिक नाते तोडण्याचे काही एक कारण मला दिसत नाही. त्रुटी दूर करता येतील. मी एवढी ग्वाही देतो की, मी जे विश्वकोशाचे काम करीन, त्यात समानतेची भावना मनात ठेवून आणि सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक कर्तव्यबुद्धीने मी हे कार्य पुढे नेईन.

मुख्य भर प्रकाशनावर

कोरोना काळात अनेक गोष्टी मागे पडल्या आहेत. साहित्य क्षेत्राबरोबर सर्वच क्षेत्रांत कोरोनाचा परिणाम झालेला आहे. कोरोना काळात मागे पडलेल्या योजना मार्गी लावणे, हे महत्त्वाचे काम राज्य साहित्य संस्कृती मंडळाला करावे लागणार आहे. प्रकाशन हे मुख्य काम आहे. अनेक संशोधक, ज्ञानक्षेत्रात कार्य करणारे आपापले प्रकल्प मंडळाला सादर करत असतात. त्याचा अभ्यास करून योग्य संशोधनाला अनुदान द्यायचे त्याचबरोबर ते संशोधन प्रकाशित करण्याचे काम साहित्य संस्कृती मंडळ करत असते. या दृष्टीने नवीन प्रकल्प मार्गी लावणे भविष्यातील उद्दिष्ट आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे कामाचे विभाजन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाचा मुख्य भर प्रकाशनावरच राहील. डॉ. देविदास पोटे यांनी होळकरशाहीवर अभ्यासपूर्ण प्रकल्प केला आहे. आता त्यांना ग्वाल्हेरच्या शिंदेशाहीवर प्रकल्प करण्यास सांगितले आहे. अशा योजनांवर काम सुरू आहे. कामाची घडी उत्तम बसलेली आहे. ती कायम ठेवून सर्व प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.

- प्रा. राजा दीक्षित

(शब्दांकन : संजीव भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com