आवाज की दुनिया

अगदी घरांपासून सुरवात केली तरी स्वयंपाक घरातील फोडणीची चूरचूर, नळातून येणारी पाण्याची टपटप, जेवताना होणारी मचमच.
rajan biche writes about different sound in world
rajan biche writes about different sound in world sakal
Summary

अगदी घरांपासून सुरवात केली तरी स्वयंपाक घरातील फोडणीची चूरचूर, नळातून येणारी पाण्याची टपटप, जेवताना होणारी मचमच.

रंग, गंध, चव यांचा आपल्या भावावस्थांशी संबंध असतो. वेगवेगळ्या आवाजांचेही तेच. तेही आपल्याला कधी आनंद देतात, कधी आयुष्यातील जुन्या आठवणींना साद घालतात, कधी त्रास देतात, तर कधी मनात वेगवेगळे तरंग उमटवतात. त्यांचे प्रकारही असंख्य असतात.

आपण जणू या आवाजाच्या दुनियेत सतत राहात असतो. लहानपणापासून आपण आवाजांशी जोडले गेलेलो आहोत. अगदी घरांपासून सुरवात केली तरी स्वयंपाक घरातील फोडणीची चूरचूर, नळातून येणारी पाण्याची टपटप, जेवताना होणारी मचमच. सर्वच आवाज परिचयाचे. काही आवडणारे. काही नावडते.

रस्त्यांवरील वाहनांचे कर्कश्य नाद अक्षरशः वात आणतात. कधी रेल्वेच्या शिटीचा आवाज कानावर आदळतो. रुळांवरून जाणाऱ्या रेल्वेचा खडखडाट वेगळाच. पोलिसांची शिट्टी कानात घुमते आणि धसका देते. सभांमध्ये जो गोंधळ होतो, त्याचा गजबजाट मनातही प्रश्नांचे काहूर माजवतो. याशिवाय अनेक प्रकार आपण दिवसभर ऐकत असतो.

नळकोंडाळ्यावरील भांडणांचा खणखणाट पाण्याच्या प्रश्नापासून ते वस्तीतील परस्परसंबंधांपर्यंत वेगवेगळ्या विचारांचे तरंग मनात उमटवतो. बादल्या, हंडे, कळशी यातून हिंदकळणाऱ्या पाण्याची खळबळ सराईत कानांना बरोबर ऐकू येते.

वेगवेगळी कळतेही. त्यातही बांगड्यांची किणकिण, लहान मुलाचे भोकाड, देवळांच्या जवळ बसणाऱ्या आणि भूकेने तळमळणाऱ्या जीवांचा जगण्यासाठीचा आकांत असे अनेक आवाज ऐकू येतात. ते सगळे आपल्या परिचयाचे आहेत. कितीही दूर पळालो तरी ते आपला पाठलाग करीत असतात.

नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास जसा वेगळा असतो, तसाच त्याची पाने उलटताना जाणवणारा रवही वेगळा. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाच्या पानांची सळसळ आपल्याला मोहवते. नद्यांचे खळखळणे व समुद्राच्या फेसाळलेल्या लाटांच्या किनाऱ्यावरील धडका अंतर्नादाची निर्मिती करतात.

न भिता पाण्यात सूर मारल्यानंतर उचंबळणारे पाणी चैतन्याचे वातावरण मनात जागवते. तलावात लहान-लहान मुले, माणसे, स्त्रिया शिकत असतात. ते मोठ्या शर्थीने हात आणि पाय पाण्यात मारतात, तेव्हा होणारा पाण्याचा खळखळाट किनाऱ्यावरच्यांचा उत्साह वाढवतो. खळाळत्या पण्याशी खेळण्याचा मोह होतो.

पावसाचे थेंब टपांवर पडताना होणारा लयबद्ध ताल कानांनाच नव्हे, मनालाही भुरळ घालतो. तर तुफान वाऱ्याचा घोंघावणारा आवाज धडकीही भरवतो. सध्या सिमेंटची जंगले वाढताहेत. खऱ्या जंगलातील वाघ, सिंह, गवे, कोल्हे व बिबट्याही शहरांत येऊ पाहताहेत.

त्यांना मनुष्यवस्तीचा आधार घ्यायची वेळ आली. पण त्यांच्या आवाजाने मनाची तगमग होते. भीतीने गाळण उडते. ‘चिऊताईचा’ गायब झालेला आवाज अंतःकरणाला पीळ पाडतो. आई कधीतरी बाळाला भरवताना गोष्ट सांगते; परंतु चिमणीची चिवचिव ऐकण्यासाठी किती दूर जंगलात जावे लागेल? हे सांगता यायचे नाही.

पळापळ उर फुटेस्तोवर. प्रत्येकजण पळतोच आहे. शहरे, महानगरांत आणि गावांतही उत्सव आणि सण यांच्या नावाखाली डीजेंचा भयाण दणदणाट संस्कृती नव्हे तर विकृतीचे दर्शन घडवतो. तो आवाज भयकंपित करतो. रुग्ण, ज्येष्ठ व्यक्ती, महिला, लहान मुले, भवतालचे पाळीव प्राणीदेखील या सगळ्यांच्या जीवाला हा दणदणाट पीडा देतो.

या परपीडेत काहींना आनंद वाटतो. या उन्मादाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मौन तर अस्वस्थतेच्या कानठळ्या बसविणारे असते! आपल्यापैकी काही जण मात्र अंतर्मनाचा आवाज ऐकतात. मनःशांतीचा गाढ अनुभव त्यांना मिळतो. त्यांना ऐकू येणाऱ्या ध्वनीची उंचीच खूप वेगळी असते. आवाजाच्या त्या दुनियेतही जावे, अशी इच्छा सर्वांना होईल तो सुदिन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com