पाकिस्तानचा ‘डबल गेम’ (राजेश खरात)

राजेश खरात
मंगळवार, 12 जून 2018

पाकिस्तानने बंगालचे कमालीचे सांस्कृतिक आणि आर्थिक शोषण केले होते. त्यानंतर बलुचिस्तानची पाळी होती. तेथे आजही भयानक शोषण सुरू आहे. तीच वेळ आता गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशावर येऊन ठेपली आहे.

पाकिस्तानने बंगालचे कमालीचे सांस्कृतिक आणि आर्थिक शोषण केले होते. त्यानंतर बलुचिस्तानची पाळी होती. तेथे आजही भयानक शोषण सुरू आहे. तीच वेळ आता गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशावर येऊन ठेपली आहे.

पा किस्तानच्या प्रतिनिधीगृहात मे महिन्यात काही महत्त्वाचे घटनात्मक निर्णय झाले व त्याचे पडसाद पाकिस्तानच्या शेजारील देशांमध्ये उमटले. आतापर्यंत निदान कागदोपत्री स्वायत्त अशी नोंद असणाऱ्या केंद्रप्रशासित आदिवासी क्षेत्राचा ( फाटा - Federally Administered Tribal Area)  खैबर पख्तुनख्वा      या प्रांतात समावेश करण्यात आला. दुसरा निर्णय म्हणजे गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशाचा पाकिस्तानी संघराज्यात अंतर्भाव करण्यात आला. या दोन्ही प्रदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भूभाग पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेश असून ‘फाटा’ हा भूभाग पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर आहे, तर गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. याच बरोबर या प्रदेशांची ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी ही ब्रिटिशकालीन वसाहतवादी धोरणांमुळे नेहमीच वादग्रस्त आहे. परिणामी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी या निर्णयांबाबत निषेध व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान आणि भारताने नोंदविलेला निषेध म्हणजे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का पोचविण्याचा प्रयत्न असल्याची आवई पाकिस्तानात उठविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने ‘फाटा’ आणि ‘गिलगिट’व बाल्टिस्तान या भूभागांस घटनात्मक दर्जा देऊन नेमके काय साधायचे आहे? हे निर्णय घेतले गेले ते आत्ताच का घेतले गेले? त्याचे पडसाद भारत- पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या संबंधाबरोबर जागतिक राजकारणावर होतील का? अशा प्रश्नांची चर्चा करण्याचा या लेखाद्वारे प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानातील संघराज्यीय-शासित आदिवासी क्षेत्र (‘फाटा’) हा अफगाणिस्तानच्या सीमेवरील प्रदेश. तो ब्रिटिश काळापासून स्वायत्तच आहे. गेल्या काही दशकांपासून तो दहशतवादी कारवायांसाठी सुपीक मानला जातो. विशेषत; अमेरिका आणि अमेरिकाधार्जिण्या देशांमध्ये घातपात घडविण्याच्या कारवायांत या भागांतील लोकांचा सहभाग आहे, आणि त्यांचा पोशिंदा पाकिस्तान आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. आयएसआय, लष्कर तसेच सरकारच्या संगनमताने या भागात दहशतवाद जोपासला गेला आहे, असे इतर राष्ट्रांचेदेखील म्हणणे आहे. हा ठपका महागात पडतो, याचे कारण अमेरिका पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करते. शिवाय ‘दहशतवादी पोसणारा देश’ ही ओळखही गडद होते. यापासून सुटका व्हावी म्हणून पाकिस्तानने FATA चा समावेश खैबर पख्तुनख्वा या प्रांतात केला, जेणेकरून हा प्रदेश पाकिस्तान सरकारच्या थेट नियंत्रणाखाली येईल. यामुळे वरकरणी अमेरिकेचे लांगूलचालन करण्याचा पाकिस्तानचा हेतू असला तरी प्रत्यक्षात हा निर्णय पाकिस्तानने देशहितासाठीच घेतल्याचे म्हटले जाते. स्थानिक पख्तून या आदिवासी भागांत वास्तव्यास असले तरी बहुतांशी वेळेस त्यांचा वापर हा ‘भाडोत्री सैनिक’ म्हणून केला जातो. या प्रक्रियेत पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानचादेखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी अफगाणिस्तान मात्र या निर्णयाबाबत नाराज आहे, याचे कारण पाकिस्तान-अफगाण द्विस्तरीय संबंधामध्ये अफगाणिस्तानने स्वतंत्र पख्तुनिस्तानचा मुद्दा आजवर लावून धरला होता. त्याला कुठेतरी शह बसला. दुसरे असे, की पाकिस्तान-अफगाण सीमेवरील ड्युरंड सीमारेषा आहे. त्याबाबत आजपर्यंत काही ठोस निर्णय नसल्याने त्याचा राजकीय फायदा अफगाणिस्तानलाच होत असे, तो आता होणार नाही. एका बाजूला FATA च्या घटनात्मक समावेशामुळे पाकिस्तान-अफगाण संबंधांत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर राजनैतिक सरशी मिळवली आहे. तर दुसऱ्या बाजूस राजकीय अस्थिरता आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेला प्रदेश कदाचित थोड्या फार प्रमाणात एक नागरी समाज आणि सहजीवन जगू शकेल, अशी आशा स्थानिक जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

 याच्या नेमके उलट गिलगिट आणि बाल्टिस्तान प्रांतात घडले आहे. भारताच्या सीमेलगत असणाऱ्या पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरच्या ह्या प्रदेशावर भारत आपला हक्क वर्षानुवर्षे सांगत आहे. वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पाकिस्तानपेक्षा भारताच्या सीमेवर असलेल्या कारगिल आणि द्रास येथील लोकांशी नाळ जुळत असलेला हा प्रदेश लडाखला जोडूनच आहे. खरे तर लडाख हा मोठा भूप्रदेश असून भारतात त्याला लडाख म्हणतात, तर पाकिस्तानमधील असलेला लडाख ‘बाल्टिस्तान’ म्हणून ओळखला जातो. ब्रिटिश वसाहतवादी धोरणांनुसार आखलेल्या सीमारेषांना बळी पडलेला हा प्रदेश ब्रिटिश काळापासून पाकिस्तानमध्ये असला तरी स्वायत्त होता. गिलगिट-बाल्टिस्तानची ही स्वायत्तता पाकिस्तानच्या प्रतिनिधीगृहाने संपुष्टात आणली आणि अप्रत्यक्षरीत्या भारतावर कुरघोडी केली, असेच म्हणावे लागेल. अलीकडे तीन-चार वर्षांपासून पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये पंजाबी वंशांच्या सरकारी दडपणाखाली धुमसत असणाऱ्या स्थानिक लोकांच्या रोषाला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृती मिळत होती आणि भारताने सुरवातीस या घटनेचा पाठपुरावा केला असला तरी, भारताने ऐनवेळी केलेली हाराकिरी आणि राजनैतिक निर्णयांबाबतची धरसोड वृत्ती यामुळे पाकिस्तानचे आयतेच फावले. या व्यतिरिक्त गिलगिट-बाल्टिस्तानची स्वायत्तता संपविण्याची इतरही अनेक कारणे आहेत. हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानच्या मुख्य प्रदेशापासून दूरवर एका कोपऱ्यात वसलेला आहे आणि आर्थिक व राजकीयदृष्ट्या पाकिस्तानातील अन्य प्रांतांच्या तुलनेत तसा शांत म्हणून ओळखला जातो. असे असले तरी अमाप नैसर्गिक साधनसंपत्ती आणि चहूकडे हिमनग असल्याने ऊर्जानिर्मितासाठी आवश्‍यक असणारा या भागांतील जलस्रोत पाकिस्तानसहित इतर देशांना आकर्षित करणारा आहे.
चीनने ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (सिपेक) या प्रोजेक्‍टअंतर्गत प्रचंड भांडवल गुंतवलेले आहे. याला स्थानिक जनतेने वेळोवेळी विरोध दर्शविला तर भारताने ‘सिपेक’मधील अंतर्भूत प्रदेश हा भारताचा असून या प्रोजेक्‍टच्या मूळ हेतूलाच आव्हान दिले. पाकिस्तानला आर्थिक मदत करणाऱ्या देशांपैकी अमेरिकेस पर्याय म्हणून चीनच असल्यामुळे चीनच्या आर्थिक आणि लष्करी हितसंबंधांना समोर ठेवून पाकिस्तानने हा निर्णय घेतला असावा. तसेच पाकिस्तानमधील आजवरच्या सरकारांनी बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीची लयलूट करून पंजाब आणि भोवतालच्या प्रदेशाचा विकास घडवून आणला. परिणामी बलुचिस्तानात पाकिस्तान संघराज्याच्या विरोधात हिंसाचार उफाळला; मग त्याला पर्याय कोणता, तर गिलगिट-बाल्टिस्तान होय. परंतु, या भागाच्या स्वायत्ततेमुळे पाकिस्तानला या प्रदेशाचे शोषण करणे अवघड होऊन बसले होते. मात्र मे महिन्यातील या प्रदेशाची स्वायत्तता संपुष्टात आणून एक प्रकारे त्यांना मोकळे रान मिळाले आहे. यापूर्वीही पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान किंवा पूर्व बंगालचे असेच सांस्कृतिक आणि आर्थिक शोषण केले होते. तो प्रदेश आज बांगलादेश आहे. त्यानंतर बलुचिस्तानची पाळी होती. अशीच वेळ पाक-व्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट- बाल्टिस्तानवर येऊन ठेपलेली आहे. धूर्त पाकिस्तानच्या या ‘डबल गेम’मधून भारताने वेळीच बोध घ्यावा, असे वाटते.

Web Title: rajesh kharat write pakistan double game article in editorial