अभियंते-संशोधकांनो, गावाकडे चला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Anilkumar Rajvanshi
अभियंते-संशोधकांनो, गावाकडे चला!

अभियंते-संशोधकांनो, गावाकडे चला!

देशाचा शाश्‍वत विकास पुणे-बंगळूर-मुंबईतून होणार नाही. त्‍यासाठी अभियंते व संशोधकांनी गावाकडे यायला हवं. त्‍यांना हवे असलेले ‘प्रॉब्‍लेम स्‍टेटमेंटस्’‌ इथे विपुल प्रमाणात आहेत... फलटण येथील निंबकर ॲग्रिकल्‍चर रिसर्च इन्‍स्‍टिट्यूटचे (नारी) संचालक डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्‌मश्री जाहीर झाली. त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्‍न - ग्रामीण भागाच्‍या शाश्‍वत विकासासाठी ४० वर्षे आपण काम करत आहात. या संशोधनाची दखल घेऊन सरकारने आपल्‍याला ‘पद्‍मश्री’ सन्मान जाहीर केला. आपल्‍या त्याविषयी काय भावना आहेत?

डॉ. राजवंशी - प्रतिकूल परिस्‍थितीत आम्‍ही मनापासून केलेल्‍या कामाचा परिणाम म्‍हणून मी या पुरस्‍काराकडे पाहतो. कमी साधनसंपत्ती असतानाही ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्याचा आम्‍ही ध्यास घेतला. या कामात सातत्‍य ठेवले. शेतकऱ्यांच्या जीवनाला शाश्‍वतता देण्याचा प्रयत्‍न केला, याचे समाधान मोठे आहे.

अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवा पिढीला काय सल्‍ला द्याल?

अनेक नामांकित आयआयटीज्‌मधून शिकलेले तरुण जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्‍च पदावर काम करत आहेत. त्‍यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी व्‍हावा. सर्वोत्त्कृष्ट अभियंते आणि संशोधकांनी गावाकडे यायला हवं. अभियंते किंवा संशोधकांना काम करण्यासाठी ‘प्रॉब्‍लेम स्‍टेटमेंट’ शोधावी लागतात आणि आपल्‍या देशाच्‍या ग्रामीण भागात प्रॉब्‍लेम स्‍टेटमेंटची कमी नाही. मी कानपूर आयआयटीचा विद्यार्थी. त्‍यानंतर पुढे ‘युनिव्‍हर्सिटी ऑफ फ्लोरिडा’मध्येही शिकलो. मला अमेरिकेत अनेक संधी असतानाही संशोधनासाठी देशातील ग्रामीण भाग निवडला. मी असं म्‍हणणार नाही, की माझ्यासारखे सारं आयुष्य ग्रामीण भागात घालवा; पण अभियंते-संशोधनकांनी किमान तीन-चार वर्षे तरी ग्रामीण भागात काम करावं, देशाची ही गरज आहे. देशाचा शाश्‍वत विकास कधीच पुणे-बंगळूर-मुंबईतून होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

आपण ‘नारी’च्‍या माध्यमातून शेती, अपारंपरिक ऊर्जा, पशुसंवर्धन या क्षेत्रात मोलाचं संशोधन केलं. शाश्‍वत विकासाबाबत आपली मते काय आहेत?

‘नारी’ संस्‍थेचं सारं काम शाश्‍वत विकासाचंच आहे. आमच्‍या संशोधनाचा आधार घेत केंद्राने अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात १९९०मध्ये राष्ट्रीय धोरण तयार केले होते. शेतीतून तयार होणाऱ्या वेस्‍टपासून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी अनेक ठिकाणी पॉवरप्‍लँट उभारण्याचा सरकारचा प्रयत्‍न होता. प्रत्‍येक तालुक्‍यात इतकं बायोमास तयार होतं, जे त्‍या संपूर्ण तालुक्‍याची ऊर्जेची गरज भागवू शकतं, हे आम्‍ही सिद्ध केले आहे. आम्‍ही अलीकडेच सुबाभूळ वनस्‍पतीवरही संशोधन केले आहे. निष्कर्ष असा आहे, की सुबाभूळ शाश्‍वत विकासासाठी गेमचेंजर ठरू शकते. सुबाभळीचा पाला जनावरांचे चांगले खाद्य आहे. तिचे स्‍टेम अक्षय उर्जेचा मोठा स्रोत आहे. मुळांपासून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन मिळते. सरकारने यावर काम केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉप २६’ मध्ये ज्‍या अपेक्षा व्‍यक्‍त केल्या, त्‍या नक्‍की पूर्ण होतील. यात शेतकऱ्यांचा फायदा आहेच, पण याशिवाय प्रदूषण कमी करणे, कार्बन फिक्सिंग यात मोठी झेप आपण घेऊ शकतो. यालाच मी शाश्‍वत विकास समजतो.

शाश्‍वत विकासाबाबत सरकारकडून काय अपेक्षा आहेत?

शाश्‍वत विकासासाठी प्रत्‍येकाने स्‍वतःपासून सुरवात करायला हवी. माझं स्‍वतःचं जीवन शाश्‍वततेचं उदाहरण आहे. कमीत कमी संसाधनांत चांगलं जीवन जगता येतं, हे मी अनुभवलं आहे. माझ्या घरात, आमच्‍या संस्‍थेत साधनांचा पुनर्वावर हे तत्त्‍व भिनलेलं आहे. केवळ मीच नव्हे, तर, असे अनेक लोक आणि संस्‍था आपल्‍या देशात आहेत, की ज्‍यांनी जीवनात शाश्‍वतता स्‍वीकारली आहे. सरकारने फक्‍त अशा संस्‍था-व्‍यक्‍तींच्या कार्यात अडथळे आणले नाहीत, तरी ते मोठं काम ठरेल. आपण पाहतो, की एखाद्या मंत्र्याच्या पुढे पन्नास आणि मागे पन्नास गाड्या असतात. यात कुठे आहे शाश्‍वतता?

शेतीचे उच्‍च शिक्षण घेऊन शेतीत येणाऱ्या युवकांना काय सल्‍ला द्याल?

खरेतर शेतकऱ्यांची मुले शेतीत येऊ इच्‍छित नाहीत, ही देशाची शोकांतिका आहे. शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही, तर आम्‍ही काय खाणार आहोत, सॉफ्‍टवेअर आणि नटबोल्‍ट? आज इंटरनेटवर प्रचंड माहिती उपलब्‍ध आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी इंटरनेटचा वापर शेतीसाठी करायला हवा. ग्रीन हाऊसिंग, ऑगॅर्निक फार्मिंग, हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाची चलती आहे. इंटरनेट जसा ज्ञानाचा खजिना आहे, तसाच ई-कॉर्मसचा प्लॅ‍टफॉर्मही बनला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रगत शेतीसाठी या साऱ्या बाबींचा उपयोग करून घ्यायला हवा.

ॲग्रीबेस्‍ड स्‍टार्टअपला चालना देण्यासाठी काय करायला हवं?

गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडे कल्पकता आहे. त्‍याला चालना देण्याची गरज आहे. त्‍यासाठी एक इको-सिस्‍टीम तयार करायला हवी. देशातल्‍या इंजिनिअरनी शेतीत यायला हवं.

संशोधन क्षेत्रात इतकी वर्षे काम करत असताना अध्यात्‍मातही आपण रस दाखवता. तुमची अध्यात्माविषयीची भूमिका जाणून घ्यायला अवडेल.

मी असं मानतो की, आध्यात्‍मिकता आणि तंत्रज्ञान हातात हात मिळवून चालायला हवं. अध्यात्‍म जीवनाला शांतता देते, तर तंत्रज्ञान जीवन सुलभ करतं. या दोन्‍हीचं मिश्रण देशाला पुढे घेऊन जाईल. अाध्यात्‍मिकता म्हणजे सत्‍याचा शोध, जो शाश्‍वततेकडे घेऊन जाईल.

कार्बन उत्‍सर्जन, जागतिक तापमानवाढ याकडे आपण कसे पाहता? असं म्‍हटलं जातं, की हे असंच चालू राहिलं तर हा ग्रह जीवसृष्टीसाठीच अनुकुल राहणार नाही? आपण राहणारच नसू तर आपल्‍या प्रगतीचा उपयोग काय?

मला वाटतं, की हे कथित धोके उद्‌भवणारच नाहीत. निसर्ग ही एक ‘सेल्‍फ करेक्‍टिव्‍ह प्रोसेस’ आहे. जेव्‍हा गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्‍हा निसर्गच त्‍याला पायबंद घालतो. कोरोना हे त्‍याचे उत्तम उदाहरण आहे. कोरोनामुळे आपली विचार करण्याची पद्धत बदलली, हे चांगले झाले. माणूस अधिक विचारी झाला. माणसाचे प्राधान्यक्रम बदलले. ही निसर्गाची सेल्‍फ करेक्टिव्ह प्रोसेसच नव्‍हे काय?

Web Title: Rajesh Solaskar Writes Dr Anilkumar Rajvanshi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top