षटकोनाचा सातवा कोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Sabha elections Elections in various states for total of 57 Rajya Sabha seats
षटकोनाचा सातवा कोन!

षटकोनाचा सातवा कोन!

महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा येत्या शुक्रवारी होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच पणास लागली आहे. या लढतीत विधानसभेतील हाताच्या बोटावर मोजता येणारे छोटे पक्ष आणि अपक्ष यांना वश करून घेण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. त्यामुळे शुक्रवारच्या निवडणुकीच्या मतदानात नेमके काय घडते, याबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. त्यास अर्थातच दोन दशकांपूर्वी राज्यसभा निवडणुकीचे मतदान खुल्या पद्धतीने घेण्याबाबत झालेला निर्णय कारणीभूत आहे. खरे तर हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रात आजवर पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोधच झाल्या होत्या. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये गेले काही महिने आरोप-प्रत्यारोपाने रान उठले आहे.

परिणामी, सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शह-काटशहाचे राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच रंगले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस या सत्ताधारी आघाडीतील तीन पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार; तर विरोधी भाजपचे दोन उमेदवार संख्याबळाच्या जोरावर सहज विजयी होऊ शकतात, असे चित्र आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही लढत शिवसेनेने दिलेले दुसरे उमेदवार संजय पवार आणि भाजपने उतरवलेले तिसरे उमेदवार धनंजय महाडिक या दोन कोल्हापुरवासीयांत रंगणार आहे. निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आणि वाढलेल्या चुरशीमुळे चार दिवसांवरच्या या निवडणुकीनिमित्ताने चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांवर पंचतारांकित ‘नजरकैद’ लादण्याचा निर्णय घेतला आहे.

या कृतीने या पक्षांमधील अविश्वास आणि बजबजपुरी जनतेसमोर आली आहे. तरीही, विधानसभेतील छोटे पक्ष तसेच अपक्ष आपले पत्ते खोलायला अद्याप तयार नाहीत. त्यामुळे धाकधूक, अस्वस्थता वाढली आहे, ती सत्ताधारी महाविकास आघाडीत. साधारणपणे अपक्ष आमदार सत्ताधाऱ्यांबरोबर असतात, असे आजवरचे चित्र आहे. मात्र, केंद्रातील भाजपची सत्ता आणि त्यांच्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचा राज्यातील सत्ताधाऱ्यांमागे लागलेला ससेमिरा यामुळे अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्याची छाया आणि प्रभाव या निवडणुकीवर आहे. या सगळ्या राजकीय धुळवडीने निर्माण झालेले वातावरण मन खिन्न करणारे आहेच; शिवाय वरिष्ठ सभागृह म्हणून उल्लेख होत असलेल्या राज्यसभेच्या प्रतिष्ठेलाही धक्का देणारे आहे. त्यास अर्थातच कोणी कितीही नाकारले तरी येत्या चार दिवसांत मतांच्या बेगमीसाठी होणारे ‘अर्थपूर्ण व्यवहार’ कारणीभूत आहेत.

अर्थात, या निवडणुकीत सातव्या उमेदवारामुळे कमालीची चुरस निर्माण होण्याआधीच कोल्हापूरचे युवराज संभाजी छत्रपती यांनी टाकलेल्या उतारीमुळे नवाच डाव रंगला होता! मात्र, त्यांनी छत्रपतींच्या गादीची प्रतिष्ठा पणास लावल्यानंतरही शिवसेनेने त्यांना ‘शिवबंधना’ची अट कायम ठेवली. त्यावरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न भाजपच्या गोटातून झाला. मात्र, शिवसेना खंबीर राहिल्यानंतर त्यांना आपली उतारी मागे घेणे भाग पडले. त्यानंतर या नाट्यात प्रवेश झाला तो उत्तर प्रदेशातील शायर इम्रान प्रतापगढी यांचा! त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही पडद्याआड काही काळ नाराजीचे नाट्य चांगलेच रंगले. काहींनी पदाचे राजीनामेही दिले. मात्र, उदयपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या प्रदीर्घ चिंतन शिबिरानंतरही काँग्रेस हायकमांड म्हणजेच गांधी कुटुंबियांवर काहीच परिणाम झाला नाही.

त्यामुळे शायर प्रतापगढी यांना राज्यसभेऐवजी थेट उत्तर प्रदेशात परत पाठवण्याचे मनसुबेही काहींनी खलबतखान्यात रचल्याची चर्चा रंगली. काँग्रेसने या निवडणुकांत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात दिलेल्या उमेदवारीमुळे गांधी कुटुंबिय आपल्या कार्यपद्धतीमध्ये तसुभरही फरक करत नाहीत, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. काँग्रेसच्या भूमिकेची परिणती अखेर कपिल सिब्बल यांच्यासारखा ज्येष्ठ कायदेपंडित काँग्रेसमधून बाहेर पडण्यात झाली. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमधील उमेदवार पाठवताना याच हायकमांडने महाराष्ट्रातील मुकुल वासनिक यांना मात्र राजस्थानातून मैदानात उतरवले आहे. तेथेही मतदानात काय होईल, हे बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. हे सारे अनाकलनीय असले तरी स्थितप्रज्ञ वृत्तीने त्याकडे पाहण्यापलीकडे काँग्रेसजनांच्या हाती काहीच उरलेले नाही.

राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी विविध राज्यात निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू अशा काही राज्यांत ती बिनविरोध झाल्याने ४० उमेदवार राज्यसभेत विनासायास पोचले आहेत. आता १७ जागांसाठीचे डावपेच महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंड येथे आखले जात असले तरी सगळीकडे काँग्रेसला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडण्यात भाजप काही अंशी यशस्वी झाला आहे. काँग्रेसच्या रणनीतीचे दिवाळे निघाल्याचेच हे लक्षण आहे. या निकालांचे दूरगामी परिणाम किमान महाराष्ट्रात तरी होऊ शकतात. १९९८ मध्ये अखेरचे गोपनीय मतदान राज्यसभेसाठी झाले होते, तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस उमेदवार राम प्रधान पराभूत झाले होते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे निकाल काय लागतील, त्याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. मात्र, निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटतील, हे निश्‍चित.

राजकारणी केवळ पुढच्या निवडणुकीचा विचार करतात, तर मुरब्बी राजनितीज्ञ पुढील पिढाचा विचार करतात.

- जेम्स फ्रीमन क्लर्क, अमेरिकन लेखक

Web Title: Rajya Sabha Elections Elections In Various States For Total Of 57 Rajya Sabha Seats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top