esakal | प्रेरणा आद्य पत्रकाराच्या कार्याची
sakal

बोलून बातमी शोधा

acharya balshastri jambhekar

प्रेरणा आद्य पत्रकाराच्या कार्याची

sakal_logo
By
रवींद्र बेडकीहाळ,ज्येष्ठ पत्रकार,फलटण.

मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात ‘मुंबई दर्पण’ या वृत्तपत्राने करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांची मंगळवारी (ता. १८ मे) १७५वी पुण्यातिथी. पत्रकारिता व समाजसुधारणेतील त्यांच्या कार्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप आणि या निमित्ताने त्यांच्या कर्मभूमीत, म्हणजे मुंबईतही त्यांचे स्मारक व्हायला हवे, या मागणीचे करून दिलेले स्मरण...

मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात ‘मुंबई दर्पण’ या वृत्तपत्राने मुंबईच्या काळबादेवी भागातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर या विद्वान प्राध्यापक व पुरातत्त्व संशोधक यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी केली. ब्रिटिश राजवट असतानाच्या या प्रतिकूल काळात एक मराठी माणूस मुंबईतून मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवतो, याचा महाराष्ट्रातील सर्वच मराठी बांधवांना आणि विशेषतः मराठी संपादक, पत्रकार यांना जरूर अभिमान आहे. ‘दर्पण’ वृत्तपत्रानंतर त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिकही मुंबईतूनच १ मे १८४० पासून सुरू केले, हेही अभिमानास्पदच. तत्कालीन प्रतिकूल काळाच्याही पुढे जाऊन जांभेकर यांनी या दोन्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील जुन्या कालबाह्य रूढी, परंपरा, धर्मांध शक्तींना छेद देऊन समाजसुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. हे काम अवघड होते. राजा राममोहन रॉय यांनी पश्‍चिम बंगालमध्ये सतीची चाल बंद करणे, हिंदू विधवांचे केशकर्तन बंद करणे, विधवांसहित सर्वच स्त्रियांना वेदाभ्यास व अन्य शिक्षण देणे, इत्यादी ज्या सुधारणा केल्या होत्या, त्याचा आदर्श जांभेकरांनी आपल्या पत्रकारिता व अन्य कार्यातून जोपासला होता. त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे पहिले प्रबोधनकार’ असे म्हणता येते.

जांभेकर यांनी अवघ्या ३४ वर्षांतील आयुष्यात केवढी उत्तुंग कामगिरी केली! ‘दर्पण’ साप्ताहिक व ‘दिग्दर्शन’ मासिकाचे ते संस्थापक. शिक्षण, पुरातत्त्वविद्या, ग्रंथसमीक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली. वसतिगृह आणि सार्वजनिक वाचनालये आदींची पहिल्यांदा संस्थात्मक उभारणी त्यांनी केली. ते पहिले मराठी ग्रंथसमीक्षक ठरले. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले मराठी प्रोफेसर, कुलाबा वेधशाळेचे संचालक, तत्कालीन सरकार दरबारचे मुत्सद्दी सल्लागार, अशा कितीतरी भूमिका त्यांनी उत्तम बजावल्या. ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळा प्रेसवरील पहिले प्रकाशक, अनेक पाठ्यपुस्तके व १६ ग्रंथांचे लेखक, उत्तम भाषांतरकार, एशियाटिक सोसायटीमधील जर्नल्सचे पहिले भारतीय लेखक, अशा विविध क्षेत्रांत त्यांचे काम होते. ते हिंदू धर्म चिकित्सक होते. १८३० ते १८४६ या अवघ्या १६ वर्षांच्या काळात त्यांनी हे प्रचंड असे काम केले. अशा या प्रबोधकाचे स्मारक त्यांच्या कर्मभूमी मुंबईमध्ये पत्रकार, संपादक संघटना, मराठी वृत्तपत्रे, राज्य सरकार शासन यापैकी कोणीही उभारले नाही, ही खेदाची बाब. कोकणात जी दोन कामे झाली, त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) गावी ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ फलटणने उभारलेले स्मारक व ‘सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघा’ने ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्य सरकारकडून साडेचार कोटी रुपयांचा मंजूर करून घेतलेला भव्य स्मारक प्रकल्प. त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु बाळशास्त्रींच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबईत त्यांच्या स्मारकाची नितांत आवश्यकता आहे.

पुढील उपक्रमांच्याद्वारे त्यांच्या प्रेरक स्मृती जपता येतील

  • जांभेकरांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालय, कुलाबा वेधशाळा, टाउन हॉलमधील सेंट्रल लायब्ररी, एशियाटिक सोसायटी यामध्ये आहेत. या सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी भारतीय पुरातत्त्वातील अनेक ताम्रपट, शिलालेख, वीरगळ इत्यादींचा अभ्यास करून ९० पानांचा इतिहास लिहिला आहे. सोसायटीच्या सभागृहात सन्मानाने बाळशास्त्रींचे तैलचित्र लावले पाहिजे.

  • मुंबई विद्यापीठात ‘आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ असे विद्यासन करण्याचा निर्णय १९६२मध्येच झाला. त्यांचे चरित्रकार कै. ग. गं. जांभेकर यांनी त्यासाठी अथक पाठपुरावा केला. पण ते सध्या सुरू नाही. तरी ते पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाला आदेश द्यावेत.

  • कुलाबा वेधशाळा (पहिले मराठी संचालक म्हणून) व सेंट्रल लायब्ररी (येथे ते लेखन, वाचन, संशोधन करीत असत) येथेही तैलचित्र उभारता येईल. सरकारने तसे आदेश द्यावेत.

  • मराठी पाठ्यपुस्तकांत जांभेकर चरित्र व कार्य यावरील पाठ समाविष्ट करावा.

  • राज्य सरकारच्या माहिती-जनसंपर्क विभागातील सर्व कार्यालयांत त्यांचे छायाचित्र लावण्याबाबत आदेश दिले जावेत.

  • मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या शिवसेनेकडे सध्या राज्याची सत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील स्मारकासाठी पुढाकार घ्यावा. ‘दर्पण’ जेथे सुरू झाले, त्या काळबादेवी भागात स्मारक होणे औचित्याचे ठरेल.

संकल्पित स्मारकाबद्दल अपेक्षा

‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर भवन’ मुंबईत उभारले जावे. या स्मारकामध्ये ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’च्या पहिल्या अंकांच्या मोठ्या आकारातील छायाप्रती लावाव्यात. त्याचबरोबर त्या वेळी जी इतर वृत्तपत्रे, मासिके स्वातंत्र्यपूर्व काळात प्रकाशित झाली, त्याच्याही उपलब्ध असतील तर पहिल्या प्रती लावाव्यात. २५० ते ३०० प्रेक्षक बसू शकतील, असे सुसज्ज सभागृह असावे. तेथे वैचारिक कार्यक्रम व्हावेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आधारित असा एक उत्कृष्ट माहितीपट तयार करुन तो पर्यटकांना दाखविण्यात यावा. एक सुसज्ज ग्रंथालय असावे. त्यात अभ्यासकांसाठी मराठी प्रसारमाध्यमे व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरची नवी जुनी पुस्तके व देशातील सर्व भाषिक वृत्तपत्रे, मासिके प्रामुख्याने असावीत. महाविकास आघाडी सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास नक्कीच हा प्रकल्प साकार होईल, असा विश्वास वाटतो.

(लेखक ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण’चे अध्यक्ष आहेत.)

loading image