esakal | निरलस लोकसेवेचा आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

निरलस लोकसेवेचा आदर्श

लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठ निर्माण करणारे रामभाऊ म्हाळगी यांचे जन्मशताब्दी वर्ष (ता. आठ जुलै) सुरू होत आहे. त्यांच्या कार्याची महती आणि वेगळेपण आजही प्रेरक ठरेल.

निरलस लोकसेवेचा आदर्श

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काही माणसे कोणत्याही राजकीय पक्षात असली तरी त्यांचे स्वत:चे भलेपण, सौजन्य आणि चारित्र्य असे विलक्षण आकर्षक असते, की त्यांच्याबद्दल नेहमीच आत्मीयता वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात १९५७ ते १९८२ या काळात आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिनिधित्वाने स्वत:ची नाममुद्रा उमटविलेले नेते स्व. रामभाऊ म्हाळगी हे असेच एक व्यक्तिमत्त्व. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या २२ वर्षांच्या संसदीय कालावधीत रामभाऊंनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यामुळे ‘आदर्श संसदपटू’ ही त्यांची मुख्य ओळख बनली.

कुठल्याही प्रश्नाचा सखोल अभ्यास आणि ज्यांचे आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची कामे पक्षनिरपेक्षतेने करण्याचा जिव्हाळा त्यांच्याकडे होता. प्रभावी संघटक, सार्वजनिक कार्याची तळमळ, विधिमंडळ कामावरील निष्ठा आणि मतदारसंघाशी नित्य संपर्क ही त्यांची वैशिष्ट्ये. लोकसभेतील आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडण्यासाठी मतदारसंघाची जोपासना कशी करावी, यांचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. गाठीभेटी, चर्चा, मेळावे, लोकांचे प्रश्न समजावून घेणे, हे अव्याहतपणे चालू असे. वर्षभरात लोकसभेचे अधिवेशन व इतर समित्यांची कामे या व्यापातून वेळ काढून महिन्यातून किमान सहा-सात दिवस मतदारांच्या सहवासात ते घालवीत. श्रमजीवी, उपेक्षित, दलित व दुर्बल घटकांच्या वस्त्यांना भेटी देऊन त्यांच्या सुखदुःखांची विचारपूस करणे, त्यांचे प्रश्न जवळून पाहणे व त्यांचे मनोगत जाणून घेणे याला ते प्राधान्य देत.

कामाची विशिष्ट पद्धत

लोकशाहीत राज्ययंत्रणेचा खेळ शेवटी कागदांशी चालतो. राज्ययंत्रणेत मानवी दृष्टिकोनाची नेहमी उणीव भासते ती भरून निघाली पाहिजे असे ते म्हणत. ‘करू’, ‘पाहू’, यापेक्षा अर्जांची तड लावण्याच्या वृत्तीस गती मिळाली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. रामभाऊ ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले तरी त्यांचा राजकारण व सामाजिक समस्यांचा अभ्यास केवळ ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित नव्हता, तर ते

मतदारसंघाबाहेरील लोकांच्या समस्यांचाही विचार करीत. त्यांचे काम परिणामकारक होई, याचे कारण त्यांनी कामाची जी पद्धत बसविली त्यात आहे. ठाणे, दिल्ली, पुणे, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद या सहा ठिकाणी त्यांनी संसदीय कामकाज कार्यालये उघडली. ही केंद्रे म्हणजे विश्वासाने बोलण्याची ठिकाणे बनली. त्या केंद्रांद्वारा अनेक विषयांची बारीकसारीक माहिती खासदारांपर्यंत पोहोचत असे. संसदीय आयुधांचा कुशलतेने उपयोग करून घेऊन मग त्या तक्रारीचे पडसाद संसदेच्या व्यासपीठावर उमटत असत. या केंद्रांमुळे अडचणी सोडविणे, अन्याय वेशीवर टांगणे, तक्रारी निवारण करणे व शासकीय यंत्रणा हलविणे या गोष्टी सुकर होऊ लागल्या. म्हाळगी विधिमंडळात पुऱ्या तयारीनिशी जात. एस.टी.ने केलेली तिकीट दरवाढ असो, घरदुरुस्ती मंडळावर चर्चा असो किंवा अर्थसंकल्पातील खात्यावरील चर्चा असो, म्हाळगींनी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचलेली असत. भाडे नियंत्रण कायदा, सरकारी उधळपट्टी, सहकारी क्षेत्रातील अनागोंदी, दडपशाही, दलितांवर, महिलांवर होणारे अत्याचार, डॉक्टरांचा संप, पूरग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त यांचे प्रश्न, कच्च्या कैद्यांच्या समस्या वगैरे कितीतरी छोट्या-मोठ्या प्रश्नांपासून सीमा प्रश्न, नद्यांच्या पाण्याचा प्रश्न, दर वर्षीचे अर्थसंकल्प, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, आसाममधील डोंगरी राज्य मागणी वगैरे व्यापक प्रश्नांवरही ते अभ्यासपूर्ण सूचना करीत.त्यामुळे विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षाला त्यांचा आदर वाटे. लोकशाहीत जागरूक, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी नागरिकांच्या अडचणी किती यशस्वीपणे सोडवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. रामभाऊंचा विधानसभेतील दिनक्रम ठराविक असे. सुरुवातीला ते पुण्याहून दररोज यावयाचे. सकाळच्या डेक्कन क्वीनने मुंबईला येताच सरळ विधानभवनातच ते येत. त्या दिवसाच्या कामकाजाचे कागद ते गाडीतच वाचत. थोडा वेळ भेटीस आलेल्यांशी गप्पा मारून ते विधिमंडळ ग्रंथालयात जाऊन बसत व कामकाजाची घंटी होताच सरळ सभागृहांत जात. सभागृह चालू असतांना रामभाऊ सभागृहांत तरी असत, नाही तर ग्रंथालयात. अनेक सदस्यांची रटाळ भाषणेही लक्षपूर्ण ऐकणाऱ्या व्यक्ती सभागृहात दोनच, एक सभापती व दुसरे रामभाऊ !

वर्षानुवर्षे विधानसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारे किंवा सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी रामभाऊंनी कधीच आक्रस्ताळेपणा केला नाही. मुद्याचा आग्रह ते चिकाटीने धरत, एखाद्या चुकीच्या विधेयकाला विरोध करताना वैधानिक पद्धतीने झगडत; पण सभागृह बंद पाड, आरडाओरड कर, असे कधीही करीत नसत. १९५७ ते ६२ आणि १९६७ ते ७७ एवढा १५ वर्षांचा काळ ते विधानसभेत व पुढील सात वर्षे ते लोकसभेत होते. अभ्यास, वक्तशीरपणा, कुणाला घायाळ न करता नेमक्या पण परिणामकारक शब्दाचा वापर आणि कायद्याचे पूर्ण ज्ञान या चतु:सूत्रीवर त्यांचे संसदीय जीवन यशस्वी ठरले. आणीबाणीत तुरुंगातून असतानाही ते विधानसभा सदस्य म्हणून तारांकित प्रश्न पाठवीत. सरकार त्यांच्या अनुपस्थितीत विधानसभेत त्या प्रश्नांना उत्तरेही देत होते.

विधिमंडळाच्या कामकाजाचे नियम ते बारकाईने अभ्यासत. सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांना उपलब्ध असणाऱ्या विविध साधनांची रामभाऊंना पूर्ण जाण होती. त्यांचा ते प्रभावी वापर करीत. सर्व पक्षांनी व त्यांच्या लोकप्रतिनिधींनी जनतेला राजकीय शिक्षण दिले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असे. राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था उत्पन्न करणाऱ्या संस्थेची निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन झालेली ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ही संस्था हेच कार्य करीत आहे.

रामभाऊंनी ‘लोकप्रतिनिधी’ या संस्थेची शान वाढवली, त्यास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्यांना सक्रिय राजकारणात नव्याने प्रवेश करायचा आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला प्रभावीपणे काम करायचे आहे. त्याला रामभाऊंचे उदाहरण दिग्दर्शक ठरेल !

अंकुश आणि आधार

रामभाऊ म्हाळगी १९७७ मध्ये लोकसभेत पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी जनता पक्ष सत्तेत होता. उभ्या महाराष्ट्रांतील व

विशेषतः ठाणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार प्रकरणे रामभाऊंनी हाताळली व त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील खासदार असूनही शासन यंत्रणेला ते ‘अंकुश’ वाटत, तर गोरगरीब व अडचणीत

सापडलेल्या जनतेला ते ‘आधार’ वाटत. मतदारसंघाशी नियमित संपर्क साधण्याचा त्यांचा कटाक्ष होता. दरवर्षी मतदारांच्या माहितीसाठी वर्षभरात लोकप्रतिनिधी या नात्याने केलेल्या कामकाजाचा अहवाल ते न चुकता मतदारसंघाला सादर करीत. चांगला पायंडा त्यांनी पाडला.

व्यवस्थितपणाची ख्याती

एकदा एका गृहस्थांना त्यांना हवे असलेले त्यांचेच कागद सापडेनात. ते अस्वस्थ झाले. काय करावे कळेना. त्यांना आठवले, की आपण एक प्रत म्हाळगींना दिली आहे. ते म्हाळगींच्या कार्यालयात आले आणि खरोखरच त्यांना ते कागद मिळाले. म्हाळगींच्या व्यवस्थिशीरपणाची अशी ख्याती होती. डॉ. अरविंद लेले हे रामभाऊंचे समवयस्क. त्यांनी

रामभाऊंच्या या वैशिष्ट्याबद्दल एक आठवण सांगितली. रामभाऊंच्या शिस्तीची आणि सावधपणाची पत्रकारांनाही सवय होती. एकदा पत्रकाराने ‘रामभाऊ, तुम्ही आम्हाला बेसावध कधी सापडाल, झोपेत तरी बेसावध सापडाल का ?’ असा गंमतीशीर प्रश्न विचारला होता.

(रवींद्र माधव साठे : लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.)

loading image