रोबो जातो जिवानिशी...!

रोबोच्या आत्महत्येमुळे आपला नजीकचा भविष्यकाळ कसा असेल, याची चुणूक दिसली.
रोबो जातो जिवानिशी...!
रोबो जातो जिवानिशी...!sakal
Updated on

वि ज्ञान काल्पनिकांच्या जगतात अत्यंत आदराने ज्यांचे नाव घेतले जाते, त्या आयझॅक असिमॉव यांनी ‘आय, रोबो’ नावाची कथा लिहिली होती. तेव्हा रोबो तंत्रज्ञानाचा धड जन्मदेखील झाला नव्हता. त्या कथेची मांडणी करताना त्यांनी ओघातच रोबोविज्ञानाचे तीन मूलभूत नियम लिहून टाकले. एक, यंत्रमानवाने कुठल्याही परिस्थितीत मानवाला जायबंदी करता कामा नये, तसेच एखादा मानवच जायबंदी करण्याच्या हेतूने आक्रमण करु लागला तर त्याने निष्क्रियदेखील राहता कामा नये. दोन, मानवाच्या आज्ञा यंत्रमानवाने पाळल्याच पाहिजेत, अर्थात पहिला नियम पाळला जाणार असेल तरच!, आणि तिसरा नियम, यंत्रमानवाने स्वसंरक्षण केलेच पाहिजे, अर्थात पहिले दोन नियम पाळले जाणार असतील तरच! असिमॉव यांच्या या मूलभूत नियमांचे पालन करतच आज रोबोनिर्मितीचे क्षेत्र भराभर वाढते आहे. जी गोष्ट ललित विज्ञान कादंबऱ्यांचा भाग होती, ती आता प्रत्यक्षात उतरताना दिसू लागली आहे.

रोबॉटिक्स ही शाखा दिवसेंदिवस इतक्या वेगाने वाढते आहे की लौकरच असे यंत्रमानव माणसांच्या बरोबरीने कामे करताना मोठ्या संख्येने दिसू लागतील. दक्षिण कोरियासारख्या देशाने तर यंत्रमानव सरकारी कामांना लावले आहेत. त्यातल्याच एका यंत्रमानवाने नुकतीच आत्महत्या केली. नैराश्याने पिडलेली एखादी व्यक्ती आठव्या- दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव देते किंवा एखादी व्यक्ती कड्यावरुन खाईत स्वत:ला झोकून देते, अगदी तसेच घडले. फरक एवढाच की जीव देण्यासाठी या रोबोला फक्त साडेसहा फुटाची उडी टाकावी लागली. रोबो जागच्या जागी गतप्राण झाला, असे समजते.

दक्षिणमध्य कोरियातील गुमी नावाच्या नगरपालिकेत सदर यंत्रमानव सुपरवायझरपदावर कामाला होता. नागरिकांना दाखले देणे, त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देणे, कागदपत्रांची इमारतीतल्या कचेऱ्यांमध्ये हलवाहलव करणे अशी बरीच कामे हा रोबो एकटा करत असे. बहुतेकदा यंत्रमानव एकाच मजल्यावर काम करतात. आत्मघाताचा निर्णय अंमलात आणणारा हा रोबो मात्र लिफ्टदेखील बोलावू किंवा वापरु शकत असे. त्याचे सरकारी कर्मचाऱ्यांकडे असते, तसे ओळखपत्रही होते. त्याला रीतसर पगार-बोनस, भत्ते होते की नाही, ते कळू शकले नाही. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत तो प्रचंड कामे उरकीत असे, असे त्याचे सहकारी सांगतात.

दोन दिवसांपूर्वी दुसऱ्या मजल्यावर जिन्यानजीक उभा राहून तो बराच काळ स्वत:भोवती गोल गोल फिरला, आणि जिन्यात उडी टाकून मोकळा झाला. पुढल्याच क्षणी पहिल्या मजल्यावर त्याच्या धातुमय देहाचे तुकडे पडले होते. कामाचा ताण आणि अहर्निश कामाचे तास यामुळे सदर यंत्रमानवाचा बळी गेला, त्याने आत्महत्या केली अशी चर्चा आता कोरियातच नव्हे, तर जगभर सुरु झाली आहे. एका ‘चश्मेदीद गवाह’ असणाऱ्याने तर हा काहीतरी गूढ, भुताटकीचा प्रकार असावा, अशी भीती व्यक्त केली. एका कामगार युनियनच्या पुढाऱ्याने यंत्रमानवांवर अपरिमित अन्याय होत असून त्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी संघटना बांधण्याची गरज प्रतिपादित केली आहे.

कामाच्या ताणाने यंत्रमानव जीव द्यायला लागले, तर माणसांनी करायचे काय? असाही एक चाकरमानी सवाल केला जात आहे. अर्थात या घटनेवरुन समाजमाध्यमे ओसंडून वाहात आहेत. ‘‘त्या लोखंडी भंगाराला आता तरी शांती मिळो’’ अशी मासलेवाईक श्रद्धांजली काही महाभागांनी वाहिली आहे. हा रोबो कॅलिफोर्नियाच्या एका रोबो कंपनीने बनवला होता. सामान्यत: हॉटेलातील वेटर किंवा सेवक रोबोंची निर्मिती ही कंपनी करते. गुमी नगरपालिकेने मात्र त्यांचा हा कार्यक्षम यंत्रमानव चक्क नोकरीत घेतला होता. त्याने आत्महत्या नेमकी का केली असावी? ही आत्महत्याच होती की घातपात? कुणी दूरस्थ पद्धतीने व्हायरस सोडून या यंत्रमानवाच्या आज्ञाप्रणालीत गडबड केली नाही ना? कृत्रिम बुद्धिमत्तेने मंडित अशा या स्वयंविकासी यंत्रमानवांमध्ये माणसासारख्या भावभावना आरोपित करता येतात का? तशा त्या विकसित होऊ शकतात का? अशा अनेक शंकांचे भुंगे आता भिरभिरु लागले आहेत, आणि या घटकेला तरी त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही. तरीही अतिश्रम ज्यांच्यावर लादले जातात, त्या माणसांविषयीची करुणादेखील या घटनेच्या निमित्ताने जागी झाल्याशिवाय राहणार नाही.

रोबो तंत्रज्ञानात दिवसेंदिवस क्रांतिकारक बदल होताहेत. जीवरसायनशास्त्राच्या मदतीने माणसासारखा दिसणारा, वागणारा रोबो बनवण्याचा उपक्रम जवळपास यशस्वी ठरत आला आहे. अनेक प्रकारचे रोबो आता संरक्षण, युद्ध, विमान चालवणे, शस्त्रक्रिया करणे इतकेच नव्हे तर धुणीभांडी-झाडूपोछा अशाप्रकारची घरगुती कामे करणे, अशी अनेक कामे करतात. ‘टेस्ला’चे जनक इलॉन मस्क सध्या ‘ऑप्टिमस’ नावाचा सर्वात आधुनिक रोबो बनवण्यासाठी धडपडत आहेत. हा सर्वगुणसंपन्न, मानवसदृश रोबो तयार झाला की, त्यांची कंपनी २५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा सहज गाठेल, असा त्यांचा दावा आहे. हे घडेल तेव्हा घडेल. परंतु, या रोबोच्या आत्मघातामुळे आपला नजीकचा भविष्यकाळ कसा असेल, याची चुणूक मात्र दिसली. आत्मघाताची शक्कल शिकून घेणारा रोबो दिसला. पुढेमागे सर्दीपडसे किंवा ताप आल्यामुळे ‘सिक लीव्ह’वर गेलेला रोबो आपल्या आसपासच भेटला तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात रोबोंचे पडसेही डिजिटलच असणार! माणूस असो, वा यंत्रमानव, व्हायरसची ‘बिमारी’ कोणाला चुकली आहे?

रोबोच्या आत्महत्येमुळे आपला नजीकचा भविष्यकाळ कसा असेल, याची चुणूक दिसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.