‘ट्रेंड वॉर’ आणि आपण...

roshan kedar
roshan kedar

सध्याच्या काळात एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थन करताना किंवा विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीशी जुळवून घेताना अंधपणे प्रत्येक गोष्टीचे समर्थन करण्याची प्रवृत्ती बळावते आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्या रोज ‘ट्विटर’वर दिसणारे ट्रेंड. लोकसभा निवडणुकीच्या हंगामात दोन मोठे पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. या बाबतीत २०१४ पासून भाजपच्या कार्यप्रणालीत एक सातत्य आणि शिस्त आहे. तीच यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनेही अमलात आणली. यात कधी ‘चौकीदार चोर है’ असे ट्रेंड चालवले गेले, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’सारखे ट्रेंड बघायला मिळाले. पुढे या ट्रेंडचं ‘वॉर’च पाहायला मिळालं.

ट्रेंड आणि ट्रोलिंग ही खरंतर व्यावसायिक गणितं आहेत. व्यवसाय म्हणून बघणारे लोक हे काम तंत्रज्ञानाचा वापर करून आणि त्यासाठी पैसे आकारून करतात. त्यांच्या या कामात सर्वसामान्य लोकही सहभागी होतात. त्यांचा हेतू व्यावसायिक नसतो, तर त्या त्या विचारसरणीशी असलेलं त्यांचं समर्थन हा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणारा एक वर्ग आहे. हा वर्ग त्यांचा प्रत्येक निर्णय डोळे झाकून स्वीकारतो. इतकंच नाही तर एखादा निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी यातील चुका किंवा त्रुटींकडे तो सर्रास डोळेझाक करतो. राहुल गांधी यांचे समर्थकही काही वेगळे नाहीत. जे आपल्या विरोधात ते वाईट हे सिद्ध करण्यात या सर्वांची शक्ती खर्ची पडते. कळत-नकळत ही सर्व मंडळी ट्रोलिंग आणि इतर ट्रेंडसाठी काम करणाऱ्या व्यावसायिकांना पूरक अशी कामे करताना दिसतात.

सोशल मीडियामुळे वाढलेला हा विखार आता खोलवर बिंबायला सुरवात झाली आहे. पण मग समाज म्हणून आपण नेहमीच असे होतो काय, असा प्रश्‍न पडतो. प्रतिस्पर्धी विचारांना विरोध आज होत नाहीये. पण सतत चिखलफेक, दुसऱ्या विचारसरणीची टिंगलटवाळी व टोकाचा विरोध हा प्रकार नवा आहे आणि याला खतपाणी दिलं ते सोशल मीडियानं. सोशल मीडिया personalized आणि customized माहिती पुरवतात. त्यामुळे ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ किंवा ‘यू-ट्यूब’वर आपण जो पक्ष अगर विचारसरणीचं समर्थन करतो, त्याची महती गाणाऱ्या, तर विरोधातील विचारसरणीला कमी लेखणाऱ्या पोस्ट अधिक दिसतात. हा केवळ जाहिरातबाजीचा भाग नाही. यामागे Psychoanalysis नावाचं विज्ञान वापरून मोठ्या शिताफीनं आपल्याला यात गुंतवलं (फसवलं) जातं. ही एक प्रकारची डिजिटल हातचलाखी म्हणता येईल. अलीकडे सर्वच राजकीय पक्ष यात प्रावीण्य मिळविताना दिसतात आणि त्यांना यात मदत करणारे व्यावसायिक वाढत आहेत. प्रयोगशाळेतल्या नुकसानीबद्दल सगळे वर्गमित्र वर्गातल्या अबोल मुलाची वारंवार तक्रार करतात. तो स्वतःची बाजू मांडण्यास असमर्थ ठरतो. त्यातच एकदा खरोखरच त्याच्याकडून नुकसान होतं आणि नेमकं त्याचवेळी शिक्षक बघतात. तेव्हा हाच मुलगा प्रत्येक वेळी दोषी अशी त्यांची खात्री पटते. इथे शिक्षकांच्या मनात त्या विद्यार्थ्याबद्दल जी भावना तयार झाली, तिला म्हणतात पुष्टीकरण पूर्वग्रह. (confirmation bias). एखादी गोष्ट वारंवार विनापुरावा सांगितली जाते, तेव्हा तिच्यावर विश्‍वास बसेलच असं नाही. पण त्या घटनेला पुसटशी जरी पुष्टी मिळाली, तरी मोठा वर्ग त्याला सत्य मानू लागतो. समाजमनात लोकांबद्दल, तसेच घटनांबद्दल अनेक पूर्वग्रह असतात. राजकीय प्रचारात हे पूर्वग्रह पुन्हा पुन्हा अधोरेखित करून विरोधकांची विशिष्ट प्रतिमा तयार करण्याचं काम सर्वच पक्ष करतात. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून मते लादण्याचा सोपा व खात्रीशीर मार्ग म्हणजे पुष्टीकरण पूर्वग्रह. याचाच परिपाक म्हणजे राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणून हिणवणं असेल किंवा मोदींच्या विरोधातील ‘चौकीदार चोर है’चा ट्रेंड असेल. माहिती तंत्रज्ञानामुळे राजकीय प्रचाराची पद्धत बदलू लागली. मतदारराजा कधी ग्राहक बनला हे लक्षातही आलं नाही. मग या ग्राहकाला त्याच्या डिजिटल माध्यमांवरील वर्तणुकीनुसार (behavioral pattern) हाताळलं जाऊ लागलं. या क्षेत्रात रोज नवनवीन संशोधन होत आहे. सध्यातरी सर्व संशोधनांचा वापर मत लादणाऱ्या (manipulate) यंत्रणेसाठी केला जातोय. सर्वसामान्यांना योग्य-अयोग्य यातील फरक कळावा व सत्य पडताळून पाहता यावं यासाठी काही गट धडपडताना दिसतात. त्यामुळे येत्या काळात हे संशोधन अशा प्रकारच्या जागरूकतेसाठीही वापरलं जाईल, असा आशावाद वाटतो. तोवर सोशल मीडिया हाताळताना आपण कुणाच्या खेळातील प्यादे तर बनत नाही ना, हा विचार सर्वांनीच करायला हवा. विशेषतः तरुण पिढीनं राजकीय नेते अगर विचारसरणीचं समर्थन करताना अधिक डोळस असणं महत्त्वाचं आहे.
(लेखक आधुनिक शेतीसंबंधित अभियांत्रिकी प्रकल्पांचे सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com